कथित TRP घोटाळ्याप्रकरणी BARC संस्थेचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना अटक

अर्णब गोस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

कथित TRP घोटाळ्याप्रकरणी अटकसत्र महाराष्ट्र पोलिसांकडून सुरुच आहे.

या प्रकरणात आज (25 डिसेंबर) BARC संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पार्थो दासगुप्ता यांना पुणे येथून अटक करण्यात आली. दासगुप्ता यांना 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवाना करण्यात आलं आहे.

विकास खानचंदानी

फोटो स्रोत, Twitter/Vikas Khandchandani

फोटो कॅप्शन, विकास खानचंदानी

13 डिसेंबर रोजी रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विकास खानचंदांनी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

24 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कथित TRP घोटाळ्याप्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं.

व्हीडिओ कॅप्शन, अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीचे CEO अटकेत, टीआरपी घोटाळ्या प्रकरणी अटक

आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेनं TRP घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचे वितरण उपाध्यक्ष घनश्याम सिंह, सीईओ खानचंदानी यांच्यासह 13 आरोपींना अटक केली होती. आता दासगुप्ता यांच्यामुळे अटकेत असलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे.

परमबीर सिंह
फोटो कॅप्शन, परमबीर सिंह

विकास खानचंदानी यांच्या अटकेनंतर 13 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीप्रमाणे, "कथित TRP घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेलं हे पहिलं आरोपपत्र आहे. याप्रकरणी आतापर्यंत 140 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. यापुढेही या प्रकरणाचा तपास अटक आरोपींविरोधात सुरू रहाणार असून, येत्या काळात दुसरं आरोपपत्र दाखल करण्यात येईल."

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,"घनश्याम सिंह यांनी रिपब्लिक टीव्हीचा TRP वाढावा आणि जास्तीत जास्त जाहिराती मिळाव्यात यासाठी गैरकायदेशीर मार्गाने रिपब्लिक भारत आणि रिपब्लिक टीव्ही यांचा टीआरपी वाढवण्यासाठी इतर अटक आरोपींना पैसे दिले. याचा पुरावा पोलिसांना मिळालेला आहे."

अर्णब गोस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

"भारतातील विविध शहरातील केबल ऑपरेटरसोबत संगनमत करून TRP वाढवण्यासाठी दोन वेगवेगळ्या चॅनल क्रमांकावर रिपब्लिक भारत आणि रिपब्लिक टीव्ही हे चॅनल चालवले," अशीही माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

याआधी कथित TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे सीओओ आणि सीईओंना चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स पाठवले होते. तर अर्णब गोस्वामींना चौकशीसाठी बोलावण्याआधी समन्स पाठवावं अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली होती.

दोन दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचलनालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

कथित TRP घोटाळ्याप्रकरणी 'फक्त मराठी', 'बॉक्स सिनेमा' आणि 'रिपब्लिक टीव्ही' ही नावं समोर आली होती.

परमबीर सिंह

फोटो स्रोत, Hindustan Times

तोंडावर काळा कपडा का बांधला?

घनश्याम सिंह यांना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर केलं. कोर्टात नेत असताना मुंबई पोलिसांनी त्यांचा चेहरा काळा कपड्याने झाकला होता. रिपब्लिक टिव्हीने घनश्याम यांच्या चेहऱ्यावर काळा कपडा बांधण्यास आक्षेप घेतलाय.

घनश्याम दहशतवादी किंवा गुंड नाहीत. मग त्यांचा चेहरा काळ्या कपड्याने झाकण्याचं कारण काय? असा सवाल उपस्थित करत रिपब्लिक टिव्हीने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

आरोपीचा चेहरा कपड्याने का झाकतात?

आरोपींना कोर्टात नेताना त्यांचा चेहरा काळ्या कपड्याने झाकल्याची दृश्यं तुम्ही टिव्ही चॅनलवर पाहिली असतील. खून, हत्या, रॉबरी, चोरी, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस आरोपीचा चेहरा झाकून त्यांना कोर्टासमोर हजर करतात. लोकांना आरोपीचा चेहरा दिसू देत नाहीत.

मात्र, असं करण्याचं कारण का? याबाबत बोलताना निवृत्त माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र निकम सांगतात, "आरोपीची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पोलीस त्याचा चेहरा झाकतात. आरोपीला अटक केल्यानंतर त्याची ओळख परेड महत्त्वाची असते. अटक आरोपीची योग्य ओळख परेड पोलिसांसाठी खटल्याच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरावा असतो. त्याआधी त्याचा चेहरा दिसल्यात कोर्टात आरोपीचे वकील आक्षेप नोंदवू शकतात. साक्षीदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे आरोपीला कोर्टात नेताना चेहरा झाकलेला असतो."

प्रतिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र

आरोपींची ओळख परेड जेलमध्ये केली जाते. सारखी चेहरेपट्टी असलेल्या 4-5 आरोपींमध्ये त्या आरोपीला उभं केलं जातं. त्यानंतर साक्षीदाराला आरोपी ओळखण्यासाठी सांगितलं जातं. याला आयडेन्टिफिकेशन परेड असं म्हणतात.

कायद्यात आरोपीची ओळख गुप्त ठेवण्याबाबत सांगण्यात आलं आहे. मात्र, चेहऱ्यावर मास्क किंवा चेहरा कपड्याने झाकण्याबाबत ठोस सांगण्यात आलेलं नाही.

"कायद्यात आरोपीची ओळख गुप्त ठेवण्यास सांगण्यात आलंय. काहीवेळा समाजकंटकांपासून आरोपीला धोका असतो. सुपारी देऊन आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस आरोपीचा चेहरा कपड्याने झाकून नेतात," असं माजी सहाय्यक पोलीस आयुक्त निकम सांगतात.

TRP घोटाळ्याचा तपास

मुंबई क्राइम ब्रांचने कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे. TRP घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी हंसा रिसर्चच्या कर्मचाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर हा कथित धोटाळा उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी हंसाच्या कर्मचाऱ्यांनी रिपब्लिक न्यूज चॅनलला पाहण्यासाठी पैसे दिल्याचं साक्षीदारांनी मान्य केल्याची माहिती दिली होती. रिपब्लिक न्यूजसोबत फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांच्या मालकांनाही पोलिसांनी अटक केली होती.

टीआरपी

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई क्राइम ब्रांचने या प्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे मुख्य फायनेंस ऑफिसर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर यांना चौकशीसाठी बोलावून जबाब नोंदवला आहे. तर, हायकोर्टाने अर्णब गोस्वामी यांची चौकशी करायची असल्यास, आधी त्यांना समन्स पाठवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

यूपी सरकारने दिली सीबीआयला चौकशी

मुंबई पोलिसांनी कथित टीआरपी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर यूपी पोलिसांनी TRP घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशीसाठी सीबीआयकडे सूपूर्द केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सीबीआयला राज्यात चौकशीसाठी दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आता सीबीआयला राज्यात कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीआधी राज्यसरकारची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)