प्रतीक कुहाडः बराक ओबामा यांच्यामुळे प्रतीक कुहाड कसे बनले स्टार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मार्क सेवेज
- Role, बीबीसी म्यूझिक रिपोर्टर
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रतीक नवी दिल्लीतील आपल्या घरी निवांत बसलेले होते. अचानक त्यांच्या फोनवर शेकडो मेसेज येऊ लागले.
तू हे पाहिलंस का, ही खूप मोठी गोष्ट आहे, असं सांगत अनेकांनी त्यांना मेसेज केले होते.
याबाबत सांगताना गायक प्रतीक कुहाड म्हणतात, "लोक कोणत्या गोष्टीबाबत बोलत आहेत, मला काहीच कळत नव्हतं."
पण नंतर संपूर्ण प्रकरण प्रतीक यांना समजलं.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रतीक यांचे फॅन झाले आहेत. त्यांचं गाणं 'कोल्ड मेस' बराक ओबामा यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत समाविष्ट झालं आहे, अशी माहिती प्रतिक यांना मिळाली.
खरं तर प्रतीक यांचं हे गाणं अमेरिकेच्या चार्टबीट्समध्येही नव्हतं. पण ओबामा यांच्या 35 आवडीच्या गाण्यांमध्ये हे गाणं होतं.
ओबामा यांच्या आवडीच्या गाण्यांमध्ये ब्रूस स्प्रिंगटीन, दबेबी, लिजो आणि बियोन्से यांचेही गाणे आहेत.

फोटो स्रोत, Sambit biswas
प्रतीक पुढे सांगता सांगतात, "मला माहीत नाही हे गाणं बराक ओबामा यांच्यापर्यंत कसं पोहोचलं. पण मला माझ्या करिअरमध्ये याचा प्रचंड फायदा झाला. मला अजूनही आश्चर्य वाटतं. हे सगळं अचानक घडलं."
प्रतीक यांचं गाणं 2016 मध्ये पहिल्यांदा रिलीज झालं होतं. पण बॉलीवूडच्या भडक आणि उडत्या चालीच्या गाण्यांपेक्षा हे गाणं अतिशय वेगळं आहे.
हे गाणं इंग्रजीत आहे. शांत संगीत वापरून हे गाणं बनवण्यात आलं आहे.
यामध्ये दोन प्रेमींची कहाणी आहे. त्यांच्या नात्यात तणाव आहे. पण ते वेगळेही होऊ शकत नाहीत, अशी ही कहाणी आहे.
कोल्ड मेस अल्बम
प्रतीक कुहाड यांनी चार वर्षांपूर्वी एका कॉन्सर्टमध्ये हे गाणं गायलं होतं. त्यावेळी लोकांना हे गाणं फारच आवडलं.
ते सांगतात, "लोकांकडून मला या गाण्याबाबत चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळीच मला हे गाणं खास ठरेल, असं कळून चुकलं होतं."

फोटो स्रोत, Prateek kuhad
यातूनच प्रेरणा घेऊन प्रतीक यांनी आणखी सहा गाणी तयार केली. कोल्ड मेस नावाचं एक अल्बम प्रतिक यांनी बनवलं. नातेसंबंधांवरच आधारित ही सगळी गाणी आहेत.
भारतात आधीपासूनच लोकप्रिय
ओबामा यांच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत येण्यापूर्वीपासूनच भारतात प्रतीक यांचं गाणं लोकप्रिय होतं.
या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे आश्चर्यही व्यक्त केलं जात होतं.
भारतात साधारणपणे कोणतंही गाणं यशस्वी होण्यासाठी ते हिंदी असणं गरजेचं आहे. इंग्रजी गाणी फक्त दिल्ली आणि मुंबईतील एक छोट्या विशेष वर्गासाठीच तुम्ही बनवू शकतात. पण कोल्ड मेसने हे गृहितक मोडून काढलं," असं प्रतीक सांगतात.

फोटो स्रोत, Sambit biswas
गेल्या वर्षा-अखेरला प्रतीक कुहाड यांनी दिल्लीच्या गार्डन ऑफ फाईव्ह सेंसेसमध्ये नऊ हजार प्रेक्षकांसमोर हे गाणं गायलं.
2011 साली 'समथिंग राँग' हे प्रतिक यांचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आठ वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर त्यांच्या करिअरने हळू-हळू वेग पकडला.
जयपूरमध्ये गेलं बालपण
प्रतीक कुहाड यांचा जन्म जयपूरमध्ये झाला. त्यांचं बालपणही तिथंच गेलं. सहा वर्षांचे असतानाच प्रतीक यांनी गिटार वाजवणं शिकायला सुरुवात केली. पण सुरुवातीला त्यांना ते आवडायचं नाही.
याबाबत ते सांगतात, "मी काही दिवस गिटारचे क्लास लावले. पण नंतर ते खूप अवघड असल्याचं वाटून मी ते सोडून दिले. नंतर हाय स्कूलमध्येही गिटारचे क्लास लावले, पण त्यात नापास झालो होतो."
पण, संगीतात रस असल्यामुळे जिथं मिळेल तिथं त्यांनी संगीत शिकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इंटरनेट नव्हतं. त्यामुळे त्यांची बहिण किंवा मित्रमंडळी त्यांना संगीत शिकण्यासाठी मदत करायची.

फोटो स्रोत, Getty Images
2008 मध्ये प्रतीक यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये प्रवेश घेतला. तिथं त्यांनी गणित, अर्थशास्त्र विषयात संयुक्त डिग्री मिळवली. ते फायनान्स क्षेत्रात काम करण्याचा विचार करत होते.
पण अमेरिकेत राहत असताना ते एलेएट स्मिथ, लॉरा मार्लिंग आणि निक ड्रेक यांच्यासारख्या गायक-गीतकारांना भेटले. तिथून ते पुन्हा संगीताकडे खेचले गेले.
त्यांनी पूर्ण आवडीने गिटार वाजवणं, गाणी लिहिणं आणि लाईव्ह परफॉर्मन्स देणं सुरू केलं.
नोकरी आणि संगीत यामध्ये संभ्रम
यानंतरसुद्धा प्रतीक कुहाड संगीतात करिअर बनवण्याबाबत योग्य निर्णय करू शकले नाहीत.
त्यांनी एक ठिकाणी कंन्सल्टंट म्हणून नोकरी सुरू केली. पण काही महिन्यातच त्यांना कळलं की ते या कामासाठी बनलेले नाहीत.
याबाबत बोलताना ते सांगतात, "काहीच ठीक होत नव्हतं. मला स्वतःवरच संशय येत होता. तेव्हाच माझ्या हृदयातून समथिंग राँग हे गाणं बाहेर आलं."
नोकरी सोडल्यानंतर हेच त्यांचं पहिलं गाणं होतं. यानंतर ते दिल्लीत परतले.
प्रतिक यांना 2013 साली आलेलं त्यांचं 'रात राजी' हे गाणं अतिशय आवडतं. हे त्यांचं पहिलं गाणं होतं. हे हिंदीत होतं. या गाण्याने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली.
जेफ भास्कर यांच्याकडून मिळाला सल्ला
संगीत क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे जेफ भास्कर यांनी दिलेला सल्ला प्रतिक यांच्या कामी आला.
जेफ भास्कर यांनी एकदा प्रतिक यांचं गाणं ऐकलं होतं. त्यांनी प्रतीक यांच्या गाण्यातील संगीत आणि मेलडी यांची गरज त्यांना समजावून सांगितली.
प्रतीक कुहाड सांगतात, "यामुळे मला खूप मदत मिळाली. त्यानंतर मी गाण्याच्या मेलडीवर लक्ष देण्यास सुरुवात केली."
त्यांच्या एक्टेंडेड प्ले नामक छोट्या अल्बमने प्रतीक यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. पण कोल्ड मेस लोकप्रिय झालं असलं तरी ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं नाही. त्याचंच दुःख प्रतिक यांना अजूनही आहे.
हे गाणं इलेक्ट्रा रेकॉर्डकडून पुन्हा एकदा रिलीज करणार असल्याचं प्रतिक यांनी सांगितलं.
यादरम्यान, प्रतीक यांनी कसूर हे गाणंही भारतात रिलीज केलं आहे. लॉकडाऊनशी संबंधित हे गाणं असल्याचं सांगितलं जात आहे. पण प्रतिक यांच्या मते, त्यांना एका वर्षापूर्वीच या गाण्याची कल्पना सुचली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








