अर्णब गोस्वामी यांच्या मदतीसाठी राम कदम एवढे का धावून जात आहेत?

फोटो स्रोत, Twitter
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यापासून भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडीसरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे.
सुरुवातीला त्यांनी मंत्रालयाबाहेर उपोषण करत ठिय्या आंदोलन केलं. मंत्रालयाबाहेर बसलेला राम कदम यांचा फोटोही व्हायरल झाला. याप्रकरणी त्यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
महाविकास आघाडीचं सरकार अर्णब गोस्वामी यांच्यावर सूबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोपही राम कदम यांनी केला आहे.
अर्णब गोस्वामी यांची सुटका करावी अशी मागणी करत घाटकोपर ते प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर अशी पदयात्रा सुद्धा राम कदम यांनी काढली.
या प्रकरणात राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालावे अशीही विनंती त्यांनी केली होती. तर सोमवार (9 नोव्हेंबर) गोस्वामी यांना भेटण्यासाठी राम कदम तळोजा जेलपर्यंत पोहोचले. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली.
तेव्हा भाजपचे इतर नेते या प्रकरणात केवळ ट्विट करून निषेध करत असताना राम कदम मात्र आक्रमकपणे यासंदर्भात आंदोलन का करत आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो. हे केवळ राजकीय आंदोलन आहे की यामागे काही वेगळे कारण आहे? अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणात राम कदम यांना एवढा रस का आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
राजकारण की प्रसिद्धी?
महाराष्ट्रात भाजप विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष सुरू असताना भाजपची बाजू अर्णब गोस्वामी आपल्या कार्यक्रमांमध्ये अधिक ठळकपणे दाखवतात तसंच भाजपचीच भूमिका घेतात अशी टीका केली जाते.
साधारण 2014 सालापासून मराठी टीव्ही माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चासत्रांत दिसणारे राम कदम गेल्या काही काळापासून राष्ट्रीय माध्यमावर दिसू लागले.
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत या न्यूज चॅनेलवर होणाऱ्या चर्चा सत्रात राम कदम सहभागी होताना दिसले.
महाराष्ट्र सरकार सूडबुद्धीने अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करत असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी 8 नोव्हेंबर रोजी रिपब्लिक न्यूज चॅनेलवर झालेल्या चर्चा सत्रात केला.
तर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणीसुद्धा राम कदम सातत्याने रिपब्लिक या चॅनेलच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे नेते महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेधही नोंदवत आहेत. पण भाजप आमदार राम कदम विविध मार्गांनी करत असलेल्या आंदोलनांमुळे चर्चेत आहेत.
सुरुवातीपासून राम कदम यांची भूमिका आक्रमकच राहिली आहे. 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार असलेल्या राम कदम यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात हिंदीतून शपथ घेत असल्याने अबू आझमी यांचा पोडियम हिसकावून घेतला होता.
याप्रकरणी मनसेच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं.
तर 2018 मध्ये 'मुलींना पळवून आणण्यासंदर्भातील' वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं. यामुळे त्यांना भाजपच्या प्रवक्तेपदावरूनही हटवण्यात आलं होतं.

याबाबत पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतेही माध्यमांमध्ये स्पष्ट भूमिका घेत होते. चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन लोकांपर्यंत पोहचण्याची शैली अनेक नेत्यांनी वापरली आहे. हे राम कदम यांनीही हेरलं आहे."
आक्रमक भूमिका घेऊन माध्यमांचं लक्ष वेधून घेणं आणि माध्यमांमध्ये प्रभावी बोलल्यावर नेत्यांची जनमानसात एक प्रतीमा उभी राहण्यास मदत होत असते.
ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, "राम कदम नियमितपणे रिपब्लिक चॅनेलच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याने संपादकांशी चांगले संबंध असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेनंतर राम कदम टोकाच्या भूमिका घेत असण्याची शक्यता आहे."
राजयकीय फायदा
केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद अनेक घटनांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. तसंच राज्यात ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे.
तेव्हा भाजपची बाजू राष्ट्रीय पातळीवर मांडणे, विविध मार्गांनी आंदोलन करून पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहचवणे अशा अनेक गोष्टींचा फायदा राजकीय नेत्यांना पक्षातलं आपलं स्थान बळकट करण्यासाठी होत असतो.
हेमंत देसाई याबाबत सांगतात, "अर्णब गोस्वामी प्रकरणात राम कदम आक्रमक भूमिका घेत असल्याचं कारण म्हणजे त्यांना पक्षात स्थान मजबूत करायचं आहे. केवळ महाराष्ट्रापुरतं बोलणारे राम कदम सुशांत सिंह, अर्णब गोस्वामी अशा प्रकरणांमुळे राष्ट्रीय पातळीवरील नेते बनले आहेत. त्यासाठीच ते चर्चासत्रांमध्येही थेट आरोप करत असतात."

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
अभिनेत्री कंगना राणावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना राम कदम यांनी तिला झाशीच्या राणीची उपमा दिली होती.
राम कदम हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. घाटकोपर पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ आहे. मराठी बहुल मतदारसंघ असला तरी अमराठी मतदारही मोठ्या संख्यने आहेत.
"2009 मध्ये जेव्हा ते मनसेचे आमदार होते तेव्हाही त्यांनी अनेकदा मर्यादा ओलांडून काम केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे यांची मर्जी संपादन करण्यासाठी ते अशा भूमिका घेत होते. त्यामुळे आताही याचा त्यांना पक्षाअंतर्गत फायदा होऊ शकतो," असं कुलकर्णी सांगतात.
केंद्रापासून ते राज्यभरातील भाजपच्या नेत्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या. ठाकरे सरकार लोकशाहीला धोका निर्माण करत असल्य़ाची टीका केली.
"राम कदमसारख्या आक्रमक नेत्यांचा फायदा पक्षाला एक नरेटीव्ह उभं करण्यासाठी होत असतो," असंही धवल कुलकर्णी सांगतात.
राम कदम यांनी 2009 मध्ये मनसेमध्ये प्रवेश केला. ते घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून विधानसभेत निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला.

फोटो स्रोत, RAM KADAM/TWITTER
उपोषण ते पदयात्रा
अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी इंटिरिअर डेकोरेटर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली आहे. कोर्टाने अर्णब गोस्वामी यांची 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राम कदम दररोज विविध मार्गांनी अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेची मागणी करत आहेत.
अगदी राज्यपालांची भेट घेण्यापासून ते जेलमध्ये जाऊन गोस्वामी यांना भेटण्याचा प्रयत्न करेपर्यंत सर्व पर्याय राम कदम यांनी अवलंबले.
अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचा निषेध केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी केला.
अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर याविरोधात राम कदम यांनी सुरुवातीला घाटकोपरमध्ये आंदोलन केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला.
राम कदम यांचं स्पष्टीकरण
याबाबत राम कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "अर्णब गोस्वामी यांच्यावर केलेली कारवाई म्हणजे राज्यघटनेवर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. लोकतंत्र आणि प्रजातंत्रावर घाला घातला जात आहे. यामुळेच या घटनेचा विरोध करणं गरजेचे आहे."
प्रसिद्धीसाठी तुम्ही अशी आंदोलन करत आहात अशी टीका केली जात आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "पत्रकारांसोबत उभं राहणं हा स्टंट वाटत असेल तर त्यांचे विचार त्यांना लखलाभ असो."
अर्णब गोस्वामी यांच्याशी तुमचे व्यावसायीक संबंध आहेत का, असा सवाली आम्ही त्यांना केला.
त्यावर "आमचा एकच व्यवहार आहे सत्य मांडण्याचा. त्यांच्या बोलण्याच्या शैलीबाबत चर्चा होऊ शकते. पण ते सत्य मांडत आहेत याबाब दुमत नाही," असं राम कदम यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








