फ्रान्समध्ये चाकूहल्ल्यात महिलेसह तीन जणांचा मृत्यू

फ्रान्समधील नीस शहरात चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. काही लोक जखमी झाल्याचे वृत्त फ्रेंच माध्यमांनी दिले आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं डोकं कापण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

नीस शहराचे महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी एका व्यक्तीला अटक केल्याचं सांगितलं आहे.

ही घटना दहशतवादी घटना असल्याची चिन्हं आहेत असं ते म्हणाले.

घटना घडल्याच्या प्रदेशातून जाणं लोकांनी टाळावं असे फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी लोकांना सांगितले आहे.

पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्सच्या एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देशांची नाराजी ओढवली आहे.

मॅक्रॉन यांनी आपल्या वक्तव्यात 'कट्टरवादी इस्लाम'वर टीका केली होती आणि शिक्षकाची हत्या म्हणजे 'इस्लामिक दहशतवादी हल्ला' असं म्हटलं होतं.

त्यानंतर अनेक अरब देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांचा बहिष्कार सुरू केला आहे. कुवेत, जॉर्डन आणि कतारमधील काही दुकानांमधून फ्रान्समधील उत्पादनं हटवण्यात आली आहे. लिबिया, सीरिया आणि गाझा पट्टीत फ्रान्सच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत.

यावर फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, बहिष्काराच्या गोष्टी अल्पसंख्याक समुदायातील कट्टर गटच करू शकतो.

पैगंबर मोहम्मद यांचं वादग्रस्त कार्टून वर्गात दाखवल्याप्रकरणी एका शिक्षकाची हत्या झाल्यानंतर मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद सुरू झाला आहे.

एका विशेष समुदायाच्या भावनेचा विचार करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येऊ शकत नाही, असं म्हणत मॅक्रॉन यांनी स्वत:चा बचाव केला आहे.

यामुळे धर्मनिरपेक्ष फ्रान्सची एकता कमी होते, असंही त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)