You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानातील हिंदूंच्या अवस्थेबद्दल तिथले अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष काय म्हणाले?
पाकिस्तानात हिंदू-अल्पसंख्याकांना बरोबरीचा दर्जा प्राप्त आहे. भारतातच मोदी सरकार अल्पसंख्याकांना चुकीची वागणूक देतं. त्यांनी अल्पसंख्याकांवरचे अत्याचार थांबवावेत, अशी टीका पाकिस्तानचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष चेला राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
बुधवारी (21 ऑक्टोबर) इस्लामाबादमध्ये झालेल्या एका परिषदेत चेला राम बोलत होते.
"पाकिस्तानात अल्पसंख्याक समाजाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण भारतात अल्पसंख्याकांना वाईट वागणूक मिळते. पाकिस्तानचे हिंदू भारतात धार्मिक स्थळांना भेट देण्यास घाबरतात. मोदी सरकार त्यांच्यावर अत्याचार करतं," असं चेला राम म्हणाले.
मोदी यांच्या धोरणाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत, असं म्हणत त्यांनी भारतात 11 पाकिस्तानी हिंदूंच्या हत्येप्रकरणी टीका केली.
पाकिस्तानात अल्पसंख्याक समाजाला कशा प्रकारे संरक्षण देण्यात येतं, ही बाब लवकरच आंतरराष्ट्रीय माध्यमांना सांगण्यात येईल.
सरकार अल्पसंख्याक समाजातील लोकांचं धर्मांतर रोखण्यासाठी कठोर पावलं उचलत आहेत. पाकिस्तानच्या अल्पसंख्याक आयोगाने धार्मिक सद्भावना जपण्यासाठी एका कायद्याचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा संसदेकडे पाठवण्यात आला आहे, असं चेला राम यांनी सांगितलं
हिंदूंच्या मानवाधिकार उल्लंघनाच्या बातम्या
पाकिस्तानचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष चेला राम सरकारचं कौतुक करताना दिसत आहे. पाकिस्तानात हिंदूंची परिस्थिती चांगली असल्याचा त्यांचा दावा आहे.
पण पाकिस्तानातून हिंदूंच्या मानवाधिकार उल्लंघन होत असल्याच्या अनेक बातम्या येताना दिसतात.
पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर तसंच त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात.
नुकतेच सिंध प्रांतात एक मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करून एका संशयिताला अटकही करण्यात आली होती.
सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्यात कडियू घनौर शहरात घटना घडली होती.
कडियू घनौर शहरात हिंदू धर्मातील कोल्ही, मेघवाड, गुवारिया आणि कारिया समाजाचे नागरिक राहतात. इथल्या राम पीर मंदिरात ते पूजा-अर्चा करतात.
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये पंज तिर्थ नामक एका प्राचीन हिंदू मंदिराला गेल्या वर्षी राष्ट्रीय वारसास्थळ घोषित करण्यात आलं होतं.
पूजेसाठी हे मंदीर पुन्हा उघडण्याची घोषणासुद्धा करण्यात आली होती. पण दोन्ही पक्षांच्या वादग्रस्त दाव्यांमुळे मंदीर पुन्हा उघडण्याचं काम थांबवण्यात आलं. आजपर्यंत हे मंदीर उघडू शकलं नाही.
हिंदू तरुणींचं जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या त्यांचं मुस्लीम तरूणांसोबत लग्न लावून दिल्याच्या बातम्याही पाकिस्तानातून नेहमीच येत असतात.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या सिंध प्रांतातच एका वाळवंटी प्रदेशात अशाच प्रकारची घटना घडल्याचं समोर आलं होतं.
गेल्या वर्षी कथितरित्या बलात्कार झाल्यानंतर हिंदू मुलीने 3 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीला धमकी देण्यात येत होती. तिला ब्लॅकमेल करण्यात येत होतं. ही घटना थरपारकर जिल्ह्यात डालान-जो-टर्र गावात घडली होती. पीडित मुलीने कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. संबंधित तरुणीला आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी या अंतर्ग एका व्यक्तीला अटकसुद्धा झाली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)