You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात सिंध प्रांतात हिंदू मंदिराची तोडफोड
- Author, रियाज सोहैल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात एका मंदिराची तोडफोड करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
सिंध प्रांतातील, बदीन जिल्ह्यात घनौर शहरातील मंदिरात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.
कडियू घनौर शहरात कोल्ही, मेघवाड, गुवारिया, कारिया असे हिंदूधर्मीय राहतात. या समाजाची माणसं राम पीर मंदिरात पूजाअर्चा करतात.
दानाच्या माध्यमातून आलेल्या पैशातून मंदिर उभारण्यात आलं होतं असं स्थानिक शिक्षक मनू लंजूर यांनी बीबीसीला सांगितलं. लोकांनी दानासाठी पैसा द्यावा याकरता त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. दीड वर्षापूर्वी मंदिराचं काम पूर्ण झालं.
मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांनी लंजूर यांना घटनेची माहिती दिली. लंजूर आपल्या मित्रांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने संशयिताला अटक केल्याचं लंजूर यांनी सांगितलं.
अशोक कुमार यांच्यासह तिघांकडे या मंदिरांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांनी नेमकं काय घडलं त्याविषयी सांगितलं. ते म्हणाले, "शनिवारी सकाळी मंदिराच्या प्रांगणात बसलो होतो. त्यावेळी मोहम्मद इस्माइल शैदी नावाचा माणूस साधारण दहा वाजता आला. शैदी याआधीही तिथे जाऊन येऊन असतो. थोड्या वेळाने, मंदिरातून आवाज आला. तो मूर्ती पाडून टाकत होता. लोखंडी सळीने तो मूर्तीची नासधूस करत होता. मी तिकडे धावलो आणि ओरडू लागलो तसा तो पळून गेला".
"मोहम्मद इस्माइल शैदीने मूर्तीची विटंबना करून हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवं", असं अशोक म्हणाले.
कडियू घनौर पोलिसांनी पाकिस्तान दंड संहिता कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इस्माइल शैदीला अटक करण्यात आली आहे.
एसएचओ असगर सठेव यांनी सांगितलं की, "आरोपी आपला जवाब बदलत आहे. त्याचा कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंध नाही. त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. चौकशीसाठी कोठडीत ठेवलं जाईल".
राम पीर मंदिराची उभारणी कशी झाली होती?
राम पीर यांचा जन्म पाचशे वर्षांपूर्वी जोधपूरपासून दीडशे किलोमीटरवर असणाऱ्या रानो जय शहरात झाला होता. तिथेच त्यांची समाधी आहे.
त्यांच्या अनुयायांमध्ये मेघवाड, कोल्ही, भील संन्यासी, जोगी, बागडी, खत्री, लोहार समाजाच्या माणसांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत.
सिंध प्रांतातील हैदराबाद शहरापासून 30 किलोमीटरवर असणाऱ्या टंडवालिया या ठिकाणी राम पीर यांचं मोठं मंदिर आहे.
खत्री समाजातील व्यक्ती मूल होत नसल्याने राम पीर यांच्या समाधीच्या ठिकाणी गेला होता असं धार्मिक नेते ईश्वर दास यांनी सांगितलं. तिथे त्या माणसाने एक आवाज ऐकला. त्यातूनच त्यांना टंडवालिया इथे मंदिर उभारण्यासाठी प्रेरणा मिळाली. राम पीर यांच्या अनुयायांना जोधपूरजवळच्या गावी जाणं कठीण होतं. म्हणून त्यांनी टंडवालिया इथे मंदिर उभारलं.
या मंदिरात भाविकांनी व्यक्त केलेल्या इच्छाआकांक्षा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. खत्री समाजाचा तो माणूस नेसत्या वस्त्रानिशी इथे आला आणि त्याने मंदिर उभारलं, असं सांगितलं जातं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)