पाकिस्तानात शिया मुस्लिमांना 'टार्गेट' का केलं जातंय? पत्रकार बिलाल फारूखी यांच्या अटकेवरून वादंग

पाकिस्तानात 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'चे पत्रकार बिलाल फारूखी यांना गेल्या आठवड्यात लष्करावर टीका आणि धार्मिक द्वेष पसवरवण्याच्या आरोपांवरून अटक करण्यात आलं. फारूखी यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात सोशल मीडियावर इमरान खान सरकारवर जोरदार टीका झाली. काही तासांनंतर फारूखी यांना सोडण्यात आलं.

बिलाल हे सातत्याने धार्मिक कट्टततावाद आणि सरकारच्या कारभारावर सोशल मीडियावरून टीका करत असतात. 18 सप्टेंबरला त्यांनी दोन ट्वीट केले. पाकिस्तानात शिया मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या भाषणांबाबत हे दोन्ही ट्वीट आहेत.

बिलाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये इस्लामाबादमध्ये शियाविरोधी सभेचा एक व्हीडिओ पोस्ट करताना लिहिलं, "द्वेष पसरवणारे हे मुल्ला पाकिस्तानच्या राजधानीत शिया मुस्लिमांचा बहिष्कार करण्यासाठी सभा घेत असताना मी शांत बसून राहू शकत नाही. याआधीही एक शियाविरोधी सभा झाली होती. यात त्यांना काफीर संबोधण्यात आलं. पाकिस्तानची काळजी असणाऱ्यांना यातील धोका लक्षात येईल. जाणूनबुजून धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सभेत सहभागी संघटना गृहमंत्रालयाच्या प्रतिबंधित यादीत आहेत. असं असतानाही त्यांना इतकी मोकळीक कशी मिळते?"

शिया मुस्लिमांच्या बहिष्काराचं आवाहन

बिलाल यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हीडिओत एका मोठ्या व्यासपीठावरून शिया मुस्लिमांचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं जात आहे.

शिया मुस्लिमांसोबत सौहार्दतेने वागणाऱ्या लोकांनाही परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीसुद्धा व्हीडिओत देण्यात आली आहे.

बिलाल यांच्या या ट्वीटवर पाकिस्तानच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या इस्मत राजा शहाजहाँ यांनीही प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणतात, "माझ्या मते, चीन-इराणमध्ये 400 अब्ज डॉलरचा करार आणि इराणच्या पोर्ट सिटी बंदार अब्बासला महत्त्व दिल्याने अमेरिका-सौदीसोबत आखाती देश संतापले आहेत. पाकिस्तानच्या शियांविरुद्ध जनरल बाजवा, ISI प्रमुख रियाद दौरे आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाला."

इस्मत यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय विश्लेषक आयेशा सिद्दिकी यांनी म्हटलं, "याची अनेक कारणं आहेत. पण 400 कोटींचा करार हा एक मुद्दा असू शकतो."

ईशनिंदेचा आरोप

शियांविरुद्धच्या या सभा मोहरमच्या मिरवणुकीनंतर घेण्यात येत आहेत. कट्टरपंथी सुन्नी गटांनी शियांवर ईशनिंदेचा आरोप लावला आहेत. तेव्हापासून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

AFP वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आता आणखी ईशनिंदा सहन केली जाणार नाही, असं 11 फेब्रुवारी रोजी कराचीच्या शियाविरोधी रॅलीत इस्लामिक जमिअत उलेमा-ए-इस्लामच्या कारी उस्मान यांनी म्हटलं होतं.

या सभेत सिपाह-ए-सहाबा या शियाविरोधी संघटनेचे कार्यकर्ते बॅनर घेऊन उभे होते. या संघटनेवर अनेक शिया नागरिकांच्या हत्येचे आरोप आहेत.

शिया मुस्लिमांविरोधात द्वेष आणि हिंसा परसवण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या संसदेतही आवाज उठवण्यात आला.

शियांविरुद्धच्या द्वेषाला खतपाणी घालण्याचा प्रकार धोकादायक असून हे तत्काळ थांबवण्यात यावं, अशी मागणी पाकिस्तान पीपर्स पार्टीने (पीपीपी) केली.

पीपीपीचे सभागृह नेते संसदेत म्हणाले, "पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येत 20 टक्के नागरिक शिया आहेत. शियांवर सातत्याने हल्ले होत आहेत. देशाच्या स्थैर्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. शिया नागरिकांच्या धार्मिक आस्थेवरून त्यांना लक्ष्य बनवल्याची 20 प्रकरणं समोर आली आहेत. पण सरकार याबाबत गंभीर नाही."

'जिना म्हणायचे, तुम्ही मशिदीतही जाऊ शकता, अन् मंदिरातही'

शेरी रहमान सिनेटमध्ये म्हणाले, "शिया मुस्लिमांविरुद्ध सभा घेतल्या जात आहेत. प्रक्षोभक घोषणा दिल्या जातात. हा प्रकार अतिशय संवेदनशील आहे. यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. आपण दहशतवाद संपवण्यासाठी बरंच बलिदान केलं आहे. हा जिना यांचा पाकिस्तान आहे. तुम्ही मंदिरातही जाऊ शकता, मशिदीतही जाऊ शकता, असं जिना म्हणायचे. धर्माच्या आधारे सरकार भेदभाव करू शकत नाही. शियांच्या हक्कांच संरक्षण सरकारने करावं."

साऊथ एशिया टेररिझ्म पोर्टलवरील माहितीनुसार, 2001 ते 2018 दरम्यान 4,847 शिया मुस्लिमांची हत्या झाली होती. काही अहवालांमध्ये ही संख्या 10 हजार असल्याचं सांगितलं जातं.

शिया लोकांवर हल्ले

द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या एका बातमीनुसार, यावर्षी मोहरमनंतर शियांवरील हल्ले वाढू लागले आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये कराचीत शिया लोकांवर सर्वाधिक हल्ले झाले आहेत.

13 फेब्रुवारी रोजी कराचीमध्ये एक सभा झाली. यामध्ये हजारो शियाविरोधी लोक सहभागी झाले होते. या सभेचे फोटो AFP वृत्तसंस्थेने दिले होते. यामध्ये मोहम्मद अली जिन्ना रोडवरील सईद मंजिल रोड परिसरात शियाविरोधी घोषणा दिल्या जात होत्या.

या सभेचं नेतृत्व करत असलेल्या लोकांमध्ये सरकारच्या रुयते हिलाल कमिटेचे अध्यक्ष मुनीब उर रहमान यांचासुद्धा समावेश होता. ही समिती ईद कधी होणार याबाबत घोषणा करत असते.

याचवर्षी जुलै महिन्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेने तहफुज-ए-बुनियाद-ए-इस्लाम विधेयक मंजूर केलं होतं.

त्यामध्ये पाकिस्तानात सुन्नी इस्लामच स्वीकारार्ह असेल, असं म्हटलं होतं. स्वाभाविकपणे शिया मुस्लिमांनी याचा विरोध केला.

पंजाब विधानसभेच्या बहुतांश सदस्यांना हे विधेयक न वाचताच त्याच्या पक्षात मतदान केलं.

फक्त ऑगस्ट महिन्यात ईशनिंदेचे 42 गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे प्रामुख्याने शियांच्या विरोधात होते. याच महिन्यात 3 वर्षाच्या शिया मुलावरही ईशनिंदेचा गुन्हा दाखल झाला होता.

1980 च्या दशकात लष्करी हुकुमशहा जिया-उल-हक यांच्या कार्यकाळात शियांविरुद्ध हिंसा सुरू झाली होती.

मोहम्मद अली जिना शिया की सुन्नी?

विशेष म्हणजे, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना हे सुद्धा इस्माइली शिया होते. पण जिया उल हक यांच्या काळात हल्ले वाढले. जिना शिया होते की सुन्नी यावरूनही पाकिस्तानात वाद निर्माण झाला होता.

पाकिस्तानचे इतिहासकार मुबारक अली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "जिना यांना दफन करताना मुस्लीम लीगशी संबंधित शब्बीर अहमद उस्मानी नामक एक मौलवी होते. त्यांनी जिना यांचा दफनविधी सुन्नी पद्धतीने करण्याचा हट्ट केला. वादानंतर जिना यांचा अंत्यविधी शिया आणि सुन्नी अशा दोन पद्धतींनी करण्यात आला."

मुबारक अली सांगतात, "जिना हे इस्मायलीवरून शिया बनले होते. इस्मायली 6 इमामांना मानतात तर शिया 12 इमामांना मानतात. ते धार्मिक नसले तरी त्यांच्यात अहंगार खूप होता. खरंतर इस्मायली आगा खाँ यांना मानतात. पण जिना त्यांना इमाम मानत नसत. अशातच त्यांनी स्वतःला शिया बनवलं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)