You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान: कथित बलात्कार पीडित हिंदू मुलीची आत्महत्या
- Author, रियाज सोहैल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात 'थर' वाळवंटी प्रदेशात गेल्या वर्षी एका हिंदू मुलीवर कथितरित्या बलात्कार झाला होता. या मुलीने आता आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला धमकी दिली जात होती तसंच ब्लॅकमेलसुद्धा केलं जात होतं. या पीडित मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. थरपारकर जिल्ह्यातील डालान-जो-टर्र गावात ही घटना घडली.
पीडितेच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, "पहाटे त्यांना जाग आली तेव्हा मुलगी तिच्या अंथरूणावर नव्हती. त्यांनी शेजाऱ्यांना उठवून शोधाशोध सुरू केली. पण ती कुठेच आढळून आली नाही. तिच्या पायाचे ठसेही कुठे दिसून आले नाहीत.
पुढे मुलीला शोधत आरोपीच्या घराजवळ गेले असता तिथं मुलीचे तसेच आरोपीच्या पायांचे ठसे आढळून आले. याठिकाणी त्यांनी घेराव घातला, तेव्हा आरोपी त्याठिकाणी उपस्थित होता.
बलात्कार प्रकरण
मुलीच्या वडिलांनी सांगितलं, "त्यावेळी रात्री दोन वाजले होते. त्याचवेळी आम्हाला विहिरीकडून आवाज आला. तिथं मुलीची पावलंही उमटली होती. नंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह बाहेर काढला."
ही घटना चेलहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
चेलहार पोलीस ठाण्याचे प्रभारी मुश्ताक मलिक यांच्या मते, "मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिरीच्या आजूबाजूला इतर कुणाच्याही पायांचे ठसे सापडलेले नाहीत."
पीडितेच्या वडिलांना सात मुलं आहेत. गेल्या वर्षी आपल्या 18 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार त्यांनी दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये तीन जणांवर बलात्काराचा आरोप होता.
डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं नव्हतं, अशी माहिती पोलीस अधिकारी अब्दुल्ला अहमद यांनी दिली होती.
मुलीला धमकी
पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, तिन्ही आरोपींना त्यावेळी अटक करण्यात आली. पण तीन महिन्यांनंतर सर्वांना जामीन मिळाला. तेव्हापासूनच ते पीडितेला आणि कुटुंबीयांना धमक्या देत होते.
कोरोनामुळे नंतर या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. 15 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी लेखी जबाब घेण्यात येणार होता आणि पीडिता आपल्या म्हणण्यावर ठाम होती. या प्रकरणात पीडिता आणि आरोपी एकाच गावातील आहेत.
ते सांगतात, "मुलीला घाबरवण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. या सगळ्याचा कंटाळूनच तिने आत्महत्येचा मार्ग निवडला."
डालान-जो-टर्र गाव हे थर वाळवंटी प्रदेशात आहे. याठिकाणी हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)