You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाथरस बलात्कार : 'सीता सुरक्षित नाही तर राम मंदिराचा काय उपयोग?' - तृप्ती देसाई
हाथरसमध्ये दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला. त्यांनी दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असं म्हटलं.
या प्रकरणाच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली.
एसआयटी एका आठवड्यामध्ये अहवाल सादर करेल, असंही या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणी ज्यापद्धतीनं कारवाई झाली, त्यावरून उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
तृप्ती देसाई यांचे आदित्यनाथ यांना सवाल
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हीडिओ पोस्ट करून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारले आहेत.
"योगीजी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है," असा सवाल तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.
पालघर साधू प्रकरणी पुढाकार घेता. मग उत्तर प्रदेशच्या मुलींच्या सुरक्षेचं काय, असं विचारत हाथरस प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जेव्हा उत्तर प्रदेशमधील मुली सुरक्षित असतील, तेव्हाच प्रभू श्रीरामांना आनंद होईल,' असंही देसाई म्हणाल्यात.
परवानगीशिवाय अंतिम संस्कार?
पोलिस आणि प्रशासनानं पीडितेच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय तिच्यावर अंतिम संस्कार केल्याचा आरोप केला जात होता. हाथरसमध्ये आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने हा आरोप केला आहे.
स्थानिक पत्रकार अभिषेक माथुर यांनी बीबीसीला सांगितले की पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना चितेजवळ जाऊ दिले नाही.
पीडितेवर लवकर अंतिम संस्कार करण्यात यावेत असा दबाव आमच्यावर टाकण्यात आल्याचं पीडितेच्या भावाने म्हटलं आहे. जेव्हा आम्ही नकार दिला तेव्हा त्यांनी तिचा मृतदेह अॅंब्युलन्समध्ये टाकला आणि त्यावर अंत्यसंस्कार केले.
मात्र हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांनी म्हटलं की, कुटुंबाच्या परवानगीशिवाय अंतिम संस्कार केल्याचा आरोप फेटाळून लावला.
त्यांनी म्हटलं, "पीडितेचे वडील आणि भावानं रात्रीच अंतिम संस्कार करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यावेळी पीडितेचं कुटुंबही उपस्थित होतं. मृतदेह घेऊन आलेली गाडी रात्री 12.45 ते 2.30 वाजेपर्यंत होती."
उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये कथित सामूहिक बलात्कार झालेल्या 20 वर्षीय दलित युवतीचा सोमवारी दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या मुलीला सोमवारी (28 सप्टेंबर) अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्याआधी ती दोन आठवडे मृत्यूशी झुंज देत होती.
14 सप्टेंबरला आई आणि भावासोबत गवत कापण्यासाठी गेली असताना या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पीडितेच्या भावानं म्हटलं सांगितलं, "माझी बहीण आई आणि मोठा भाऊ गवत कापण्यासाठी गेले होते. भाऊ गवताचा एक भारा घेऊन घरी आला होता. आई गवत कापत होती आणि ती मागे होती. तिथेच तिला खेचून सामूहिक बलात्कार करण्यात आला. माझ्या आईला ती बेशुद्धावस्थेत सापडली."
कुटुंबीयांनी तिला बेशुद्धावस्थेत असतानाच आधी स्थानिक आरोग्य केंद्रात नेलं आणि तिथून पुढे अलिगढ मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलं. मेडिकल कॉलेजमध्ये ती 13 दिवस व्हेंटिलेटरवर होती. सोमवारी तिला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं, तिथेच तिने उपचारादरम्यान प्राण सोडले.
हाथरसच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर कठोर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं की, उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजनं आणखी एका तरूणीला मारून टाकलं.
"सरकारनं ही फेक न्यूज आहे, असं म्हणत पीडितेला मरण्यासाठी सोडलं. मात्र ही दुर्दैवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यू आणि सरकारचा निर्दयीपणाही खोटा नव्हता," असं राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.
प्रियंका गांधी यांनीही या घटनेवर ट्वीट करत उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षेचं कोणतंही चिन्ह नाहीये. अपराधी खुलेआम अपराध करत आहेत, असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं.
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही ट्वीट करून हाथरसमधील घटना ही अतिशय निंदनीय असल्याचं म्हटलं. मुली-बहिणी या राज्यात सुरक्षित नाहीत. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं, असं मायावती यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला आहे. तसंच पीडितेला जलद गती न्यायालयाद्वारे तातडीने न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीये.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणं आहे. असं कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे, असं कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केली आहे.
बॉलिवूडमधूनही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अभिनेत्री दीया मिर्झानं ट्वीट करून म्हटलं आहे की, आपण हाथरसच्या पीडितेला विसरलो आहोत. तिला प्रत्येक पातळीवर आपण अयशस्वी ठरवलं आहे. हा आपला सामूहिक विवेक आहे.
स्वरा भास्करनं म्हटलं की, ही हृदय हेलावून टाकणारी घटना आहे. आपल्या सर्वांनाच लाज वाटायला हवी.
अभिनेता अक्षय कुमारनं ट्वीट केलं, "हे सगळं केव्हा थांबणार? आपले कायदे आणि त्याची अंमलबजावणी एवढी कठोर हवी की, शिक्षेचा विचार करूनच बलात्काऱ्यांना धास्ती बसली पाहिजे."
पंतप्रधान गप्प का, स्मृती इराणी कुठे आहेत?- सोशल मीडियावर प्रश्न
हाथरस प्रकरणी पंतप्रधान गप्प का असा प्रश्नही सोशल मीडियावर विचारला जात आहे.
गुजरातमधील काँग्रेसने अर्जुन मोढवाडिया यांनी 2012 मध्ये निर्भया प्रकरणानंतरचे पंतप्रधान मोदींचे जुने ट्विट रिट्विट केले आहे.
मोदी गप्प का, असा सवालही त्यांनी केला आहे. 'हाथरसमधील ज्या तरुणीचा मृत्यू झाला तीही भारताची कन्या होती. निर्भयाच्या वेळी तुम्ही बोललात. पण आज कुठलाच आक्रोश का नाही?' असं ट्वीट त्यांनी केलं.
सोशल मीडियावर भाजप नेत्या स्मृती इराणी यांची जुनी वक्तव्यं आणि व्हीडिओही व्हायरल होत आहेत.
पूनम भारद्वाज नावाच्या युजरनं म्हटलं आहे की, आता काँग्रेसचं सरकार नाहीये. पण बलात्कार होतच आहेत. यावरही तुम्ही काहीतरी बोलाल याची वाट पाहत आहे.
स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशमधल्या घटनेविरुद्ध आवाज का नाही उठवला? त्या योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी का करत नाहीयेत? असे प्रश्न आयुष नावाच्या ट्वीटर युजरने उपस्थित केले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)