हाथरस: संजय राऊत म्हणतात दलित मुलीवर बलात्कार होतो आणि कोणीही उसळून उठत नाही

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. हाथरस : उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटलं जातं आणि तिथं आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो - संजय राऊत

उत्तर प्रदेशाला रामराज्य म्हटलं जातं. तिथं हाथरससारख्या जिल्ह्यात मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, असा मत क्शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या घटनेवर ते बोलत होते.

या देशात एकेकाळी खंबीरपणे लढणारी दलित चळवळ निस्तेज होताना दिसत आहे, एका दलित मुलीवर अत्याचार, बलात्कार होतो आणि कोणीही उसळून उठत नाही, असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशाला रामराज्य म्हटलं जातं. तिथे राम मंदिरची उभारणी होत आहे. तिथे हाथरससारख्या जिल्ह्यात मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. एरव्ही महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा दुसरीकडे अशी घटना घडली, कोणाच्या घराची कौलं जरी उडवली, एखाद्या नटीवर अन्याय, अत्याचार झाला म्हणून आंदोलन चालवतात ते आज कुठे आहेत? तो मीडिया कुठे आहे? एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? न्याय मागण्यासाठी एखादी नटी, अभिनेत्री सेलिब्रेटीच हवी आहे का?

"हाथरसमधील मुलगी आपली कोणी लागत नाही का? तीसुद्धा आपलीच आहे. रामदास आठवले जे नटीच्या घरी जाऊन सुरक्षा देत होते, नटीच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्ते गेले ते कुठे आहेत?" असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.

2. 'बाबरी मशीद निकालामुळे लोकांचा न्यायालयांवरचा विश्वास उडेल'

अयोध्या, बाबरी मशीद प्रकरणावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून त्यात लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 लोकांची निर्दोष मुक्तता केली आहे.

मात्र बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयने दिलेला निकाल हा देशहिताचा नाही. अशाने लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल, असं मत वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

आंबेडकर म्हणाले, बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते. त्यामुळे 32 लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र, आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल.

टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

3. पुढील तीन-चार दिवसांत मोठी बातमी देऊ - एकनाथ खडसे

आपल्या पक्षांतरासंदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे दिली.

भाजपाच्या बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

29 सप्टेंबर रोजी महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसऱ्या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपची ऑनलाइन बैठक झाली.

दरम्यान, एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

4. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसची आधुनिक आवृत्ती आहे. त्याची मारक क्षमता 400 किलोमीटर इतकी आहे.

पीजे-10 प्रकल्पाच्या अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याची माहिती डीआरडीओनं दिली. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

ओदिशातल्या चांदिपूरमध्ये ब्रह्मोसची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात करण्यात आली आहे. क्षेपणास्त्राची एअरफ्रेम आणि बूस्टर भारतातच तयार करण्यात आलं आहे.

ब्रह्मोसची अत्याधुनिक आवृत्ती डीआरडीओ आणि एनपीओएमनं तयार केली आहे. नवं ब्रह्मोस क्षेपणास्त्र जमिनीसोबतच युद्धनौका, पाणबुडी, लढाऊ विमानांमधूनही डागता येऊ शकतं.

5. कृषी कायद्यांच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती

केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषीविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय बुधवारी (30 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

या कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात येणार असून त्याआधारे योग्य त्या सुधारणांचा मसूदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करण्यात येईल व त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा 2020, शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासित किंमत आणि सेवा करार कायदा, अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा यांचे सादरीकरण करण्यात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)