अमेरिकन निवडणुकीत उतरलेल्या भारत-पाकिस्तानच्या 'या' महिला

सबीना जफर
    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, वॉशिंग्टनहून

अमेरिकेत 3 नोव्हेंबर 2020 ला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासात ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असेल, असं सांगण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत आतापर्यंत दोन लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच लाखो जणांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. सध्याच्या काळात अमेरिका राजकीय आणि सामाजिक दृष्टीने विभागलेला दिसत आहे.

ब्लॅक लाईव्ह्स मॅटर्सचं आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी या मुद्यावरून दंगली घडल्या होत्या.

3 नोव्हेंबर रोजीच राज्यांची निवडणूकसुद्धा होऊ घातली आहे.

या निवडणुकीत अनेक भारतीय आणि पाकिस्तानी महिला आपलं नशीब आजमावणार आहेत. या महिलांशी बीबीसीने बातचीत केली.

सबीना जफर

पाकिस्तानी वंशाच्या सबीना जफर सॅन रेमनच्या महापौर पदासाठी मैदानात आहेत.

सॅन रेमन हे शहर पश्चिम कॅलिफोर्निया राज्यातील सॅनफ्रॅन्सिस्को शहरापासून पूर्वेच्या दिशेने 35 किलोमीटर अंतरावर आहे.

सबीना जफर

सबीना जफर सध्या उपमहापौर असून त्या महापौरपदासाठी निवडणूक लढवत आहेत.

त्यांचे वडील राजा शाहिद जफर बेनझीर भुट्टो सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते.

झूमवर बोलताना सबीना म्हणाल्या, "मी माझ्या वडिलांच्या कामाचं कौतुक होताना पाहून मोठी झाले आहे."

लग्नानंतर त्या अमेरिकेला आल्या. इथं सॅन रेमन शहरात त्या वास्तव्यास आहेत.

वैविध्यपूर्ण अशा या शहराची लोकसंख्या 82 हजार इतकी आहे. यामध्ये वेगाने वाढ होत आहे. सदर शहरात 52 टक्के कृष्णवर्णीय असून सबीना इथल्या सिटी कौन्सिलमध्ये निवडून आलेल्या पहिल्या आशियाई महिला आहेत.

सबीना सांगतात, "सात-आठ वर्षांपूर्वी खासदार एरिक स्वालवेल यांच्यासोबत काम केल्यानंतर सामाजिक सेवेत उतरण्याची इच्छा झाली.

एका परिचिताने डेमोक्रॅट महिलांना निवडणुकीत उतरवण्यासाठी इमर्ज कॅलिफोर्नियाच्या अभियानाबाबत माहिती दिली.

या प्रशिक्षणात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील महिला सहभागी झाल्या होत्या.

तुम्ही एका मोठ्या व्यवस्थेचा भाग होऊन जाता. निवडणूक कशी लढवायची, महिलांचा पाठिंबा कसा मिळवायचा आदी गोष्टी इथं शिकायला मिळतात, असं त्या सांगतात.

त्यानंतर 2018 मध्ये सबीना यांनी शहराच्या सिटी काऊंसिलमध्ये विजय मिळवून प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.

कॉर्पोरेट तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग झाल्याचं त्या सांगतात.

त्यां सांगतात, "आवाज उठवण्यापूर्वी शिकणं आणि ऐकणं महत्त्वाचं आहे. सुरक्षा, वाहतूक, जलवायू परिवर्तन अशा विषयांवर काम करायला मला आवडेल.

राधिका कुन्नेल

राधिका कुन्नेल या भारतीय वंशाच्या आहेत. त्या नेवाडा राज्यातच्या असेंब्लीमध्ये डिस्ट्रिक्ट 2 साठी मैदानात आहेत.

राधिका या शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाबद्दल माहिती देताना त्या 9/11 हल्ल्याचा उल्लेख करतात.

राधिका कुन्नेल

त्या सांगतात, "मी एका प्रयोगावर काम करत होते, तितक्यातच लोकांचा गोंधळ ऐकू आला. ट्रेड टॉवर्सवरच्या हल्ल्याची दृश्य टीव्हीवर सगळीकडे दिसत होती."

त्यानंतर आपापल्या देशात परत जा, असं लोक म्हणू लागले. शेजारीही नीट बोलत नव्हते. त्याचा माझ्यावर प्रभाव पडला आणि मी अधिक संवेदनशील बनले. इथं आपलं प्रतिनिधीत्व असावं असा विचार त्यावेळी केला."

राधिका यांनी 1996 मध्ये मायक्रोबायोलॉजी विषयात पीएचडी केल्यानंतर त्या अमेरिकेला गेल्या. त्यांचं संशोधन कँसर बायोलॉजी विषयावर होतं.

त्यानंतर एक अनिवासी म्हणून तिथं राहू लागल्या.

राजकारणात उतरण्याचं दुसरं कारण म्हणजे या क्षेत्रात शास्त्रज्ञांचं प्रतिनिधीत्व कमी आहे. त्यामुळे राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं त्या सांगतात.

निर्णयप्रक्रियेत शास्त्रज्ञ असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळेतील विज्ञानाचा उपयोग समजावून सांगण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधीत्वाला महत्त्व आहे.

राधिका यांना आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्यासोबतच राज्यातील विविधतेला आणखी सर्वसमावेशक बनवण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे.

फराह खान

पाकिस्तानी वंशाच्या फराह खान कॅलिफोर्नियाच्या अरवाईन शहरात महापौरपदाच्या निवडणुकीत उभ्या आहेत.

फराह खान तिसऱ्या वर्षी अमेरिकेत आल्या होत्या. त्यांची आई लाहोरची आहे. तर वडील कराचीचे आहेत. 2004 ला कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्या शिकागो आणि सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये वाढल्या.

फराह खान

स्थानिक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम केल्यानंतर त्यांनी सिटी काऊंसिलच्या सदस्यपदासाठी प्रयत्न करण्याचा विचार केला.

2016 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली पण पराभूत झाल्या. मात्र, यातून अनुभव मिळाल्याचं त्या सांगतात.

त्यांच्या मते, "निवडणूक लढवणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं केलं जातं. कठोरपणे वागवलं जातं. तुम्हाला अनेक गोष्टी सुनावल्या जातात. त्यामुळे तुम्ही निवडून येणार नाहीत, असं तुम्हाला वाटू लागतं. पण तुमच्या समर्थकांचा विचार करा. त्यांना राजकारणात आपलं प्रतिनिधित्व हवं आहे."

याच प्रेरणेसह फराह खान पुन्हा 2018 ला निवडणुकीत उतरल्या आणि त्यांनी विजय मिळवला.

सर्व प्रकारच्या वर्गाला सोबत घेऊन काम करणार असल्याचं त्या सांगतात.

पद्मा कुप्पा

भारतीय वंशाच्या पद्मा कुप्पा मिशिगन राज्यात ट्रॉय आणि क्लॉसनचं प्रतिनिधित्व पुन्हा करण्याच्या घोडदौडीत सहभागी झाल्या आहेत.

70 च्या दशकात त्या आपल्या आईसह अमेरिकेत दाखल झाल्या. त्यांचे वडील आधीपासूनच अमेरिकेत राहायचे.

पद्मा यांना पुस्तकं वाचण्याचा छंद आहे. त्या एक लेखिकाही आहेत. तसंच गणितावरही त्यांचं प्रेम आहे.

पद्मा कुप्पा

1981 मध्ये त्यांच्या आई-वडिलांनी अमेरिका सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना आपली स्वप्न भंग पावत असल्याचा विचार आला. त्यावेळी त्या 16 वर्षांच्या होत्या.

पण 1998 ला पद्मा उच्च शिक्षणासाठी पुन्हा अमेरिकेला गेल्या. त्यांचे वडील आणि भाऊ दोघांनीही पीएचडी केलेली आहे.

पद्मा सांगतात, "मी मिशिनगला आले तेव्हा इथले लोक इतर संस्कृतींशी परिचित नव्हते. आपण दुसऱ्या देशातून आहोत, त्यामुळे स्थलांतरितांप्रमाणे वेगळे राहतो."

पद्मा यांचं करिअर ऑटोमोटिव्ह, फायनान्स तसंच आयटी क्षेत्राशी संबंधित राहिलं.

त्यांनी महानगर डेट्रॉयटमधील एका मंदिरात स्वेच्छेने काम करत लोकांना जोडण्याचं काम केलं.

पद्मा सांगतात, "मी माझ्या मुलांना आपलेपणा वाटावा यासाठी तिथं काम केलं. त्यांनी हिंदू धर्म पूर्णपणे समजून घ्यावा, असं मला वाटायचं. आपण तर आपल्या घरांमध्ये धर्माबद्दल चर्चाही करत नाही."

स्थानिक राजकीय नेत्यांसोबत काम करताना त्यांना बराच अनुभव मिळाला. त्यांनी 2018 मध्ये निवडणुकीत विजय मिळवला. आता पुन्हा त्या मैदानात आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)