कोरोना लस: स्पुटनिक लसीची परिणामकारकता 92 टक्क्यांची, लॅन्सेटचा निर्वाळा

रशिया कोरोना लस

फोटो स्रोत, Reuters

रशियाची स्पुटनिक- 5 ही कोरोना लस 92 टक्के परिणामकारक असल्याचे लॅन्सेट या प्रसिद्ध जर्नलन म्हटले आहे. ही लस दिल्यास लोकांचे प्राण वाचू शकतील आणि रुग्णालयातही जाण्याची गरज पडणार नाही असं देखील लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी या लसीबाबत वाद निर्माण झाला होता. लसीबाबतचा डेटा पूर्णपणे उपलब्ध नव्हता पण आता याबाबतच्या शंका शास्त्रज्ञांनी दूर केल्या आहेत. या लसीचे फायदे आहेत असं शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे.

फायजर, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेंका, मॉडर्ना आणि जेनसेन या लसींची योग्यता आधीच सिद्ध झाली आहे आता या पंक्तीत स्पुटनिक-5 देखील आली आहे.

रशिया डॉ. रेड्डी लॅबला पुरवणार स्पुटनिक-5 लसीचे 10 कोटी डोस

स्पुटनिक-5 ही लस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचं रशियाने म्हटलं आहे. स्पुटनिक-5 या लसीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचं रशियाने स्पष्ट केलं आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने या लशीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी तसंच वितरणासाठी सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि डॉ. रेड्डी लॅब यांच्यात सामंजस्य करार झाला असून, भारतात लशीचे 30 कोटी डोस तयार करण्यात येतील. डॉ. रेड्डी ही देशातल्या अग्रगण्य फार्मा कंपन्यांपैकी एक असून, लवकरच ही कंपनी सरकारच्या परवानगीनंतर फेज-3 क्लिनिकल ट्रायल सुरू करेल.

लसीचा पुरवठा 2020 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. लशीसंदर्भातील चाचण्या आणि नियम यांच्या पूर्ततेनंतरच अधिक तपशील स्पष्ट होईल. फेज-3 ट्रायल पूर्ण होण्यापूर्वीच रशियाने लशीला परवानगी दिली. जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांमध्ये यामुळे साशंकतेचं वातावरण होतं.

चाचणीच्या फेझ-1, फेझ-2 टप्पे आश्वासक आणि आशादायी आहेत असं डॉ. रेड्डी लॅबचे जी.व्ही. प्रसाद यांनी सांगितलं. कोरोनाविरुद्धच्या लढतीत स्पुटनिक-5 लस निर्णायक ठरू शकते. या लशीची किंमत किती असेल याबाबत माहिती कळू शकलेली नाही.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. काही ठिकाणी ऑक्सिनजचा पुरवठा योग्य वेळेत होऊ शकलेला नाही. अशा परस्थितीत कोरोनावर लस उपलब्ध झाल्यास असंख्य रुग्णांची वेदनांमधून सुटका होऊ शकते.

देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 50 लाखांचा दुर्देवी टप्पा ओलांडला. ज्येष्ठ नागरिक आणि खूप धोका असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना आपत्कालीन पातळीवर लस देण्याचा सरकार विचार आहे.

रशियाच्या या संस्थेने याआधी कझाकिस्तान, ब्राझील आणि मेक्सिकोला लस देण्याचं मान्य केलं आहे. कोरोनावरची जगातली पहिली नोंदणीकृत लस असं रशियाने स्पुटनिक व्ही लशीचं वर्णन केलं आहे. फेझ3 ट्रायल 40,000 लोकांवर घेण्यात आली. 26 ऑगस्टला हे ही प्रक्रिया सुरू झाली जी अजूनही पूर्ण झालेली नाही.

जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगातील विविध देशांमधील शास्त्रज्ञ लस, औषधं यांसाठी संशोधनं करत आहेत. यातील रशियात सुरू असलेलं संशोधन यशाच्या दिशेनं जाताना दिसतंय.

रशियातील शास्त्रज्ञांनी 'द लान्सेट' या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लशीच्या संशोधनाबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालातील दाव्यानुसार, रशियात लशीच्या ज्या सुरुवातीच्या चाचण्या झाल्या, त्यात लशीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत.

चाचणीत सहभागी झालेल्या ज्या ज्या लोकांवर लशीची चाचणी घेण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. विशेष म्हणजे, या चाचणीमुळे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्स सुद्धा झाले नाहीत. असाही दावा रशियन शास्त्रज्ञांनी 'द लान्सेट'मधील अहवालात केलाय.

रशिया कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ रशियातील लशीबाबत अद्याप साशंक आहेत. त्यांच्या मते, कोरोना विषाणूशी लढण्यासाठी रोगप्रतिकार प्रतिक्रिया लशीतून तयार होण्याचे संकेत मिळाल्याचा दावा करणं घाईचं होईल, कारण प्रभाव आणि सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी जेवढ्या चाचण्या व्हायला हव्यात, तेवढ्या झाल्या नाहीत. चाचण्यांची संख्या फार कमी आहे.

त्यानंतर रशियन शास्त्रज्ञांनी टीकाकारांना उत्तर म्हणून परीक्षणाचे निकालच जाहीर केला. मात्र तरीही काही पाश्मिमात्य तज्ज्ञांनी रशियाच्या कामाबाबत शंका व्यक्त केलीय.

दोन टप्प्यात असं झालं परीक्षण

रशियात Sputnik-V नावाने जून आणि जुलैमध्ये दोन परीक्षणं झाल्याचं 'द लान्सेट'मध्ये म्हटलंय. प्रत्येक परीक्षणात 38 पूर्णपणे निरोगी लोक सहभागी झाले. या लोकांना तयार करण्यात आलेली लस देण्यात आली. त्यानंतर तीन आठवड्यांच्या अंतराने बूस्टर लस देण्यात आली.

रशिया कोरोना लस

फोटो स्रोत, EPA

परीक्षणात सहभागी झालेले लोक 18 ते 60 या वयोगटातील होते. त्यांचं 42 दिवस सातत्यानं निरीक्षण करण्यात आलं. या सगळ्यांमध्ये तीन आठवड्यात अँटीबॉडी तयार झाल्याचा दावा करण्यात आलाय. डोकेदुखी आणि सांधेदुखी यापलिकडे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्स या लोकांना जाणवले नाहीत.

ज्यांच्यावर परीक्षणं करण्यात आली, त्यांना सगळ्यांना जाणीव होती की आपल्याला लस देण्यात येत आहे. कुणालाही अंधारात ठेवण्यात आलं नव्हतं.

कोरोना
लाईन

आता रशियात तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण होणार आहे आणि यात 40 हजार जणांवर परीक्षण केलं जाईल. हे वेगवेगळ्या वयोगटातील लोक असतील, असा दावा अहवालात करण्यात आलाय.

ऑक्टोबरपासून ही लस मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना देण्याचं काम सुरू होणार असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

रशिया कोरोना लस

फोटो स्रोत, Reuters

विशेष म्हणजे, सध्या जागतिक आरोग्य संघटनेनी 6 लसींची नावे जाहीर केली आहेत. ज्या लसी फेज 3 पर्यंत पोहोचल्या आहेत त्यांचीच नावे जागतिक आरोग्य संघटनांनी दिली आहेत आणि त्यामध्ये रशियाची लस नाही.

कोरोना लस कधी येणार आणि कुणाला मिळणार?

लस तयार झाल्याची माहिती 11 ऑगस्ट रोजी पुतिन यांनी दिली होती. पुतिन यांच्या मुलीला त्याचा डोस देण्यात आल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

या लशीचं लवकरच मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात येईल असं वृत्त रशिया टुडेनं दिलं होतं.

रशियामध्ये ही लस ऐच्छिक ठेवण्यात आली आहे, ती घेण्यासाठी कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, असं पुतिन यांनी सांगितलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सुरुवातीला ही लस आरोग्य सेवक, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे, त्यानंतर जानेवारीपासून ही लस सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

"ही लस प्रभावीपणे काम करते. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, आणि मी पुन्हा सांगतो की या लशीनं सर्व महत्त्वाच्या चाचण्या पार केल्या आहेत," असं पुतिन यांनी म्हटलं होतं.

रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या सरकारी संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिट्यूट इथं कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू होतं. जुलै महिन्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल, असं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं होतं.

लस शोधण्याचं काम नियंत्रित करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लस झटपट तयार व्हावी यासाठी शास्त्रीय तसंच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )