कोरोना लसीवर शंका उपस्थित करणाऱ्यांना रशियाचं प्रत्युत्तर

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या लसीबाबत जगभरातून उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका निराधार असल्याचं रशियाने म्हटलंय.
आपण लस तयार केली असल्याचा दावा रशियाने मंगळवारी (11 ऑगस्ट) केला होता. दोन महिने मानवी चाचण्या करण्यात आल्यानंतर या लशीला मान्यता देण्यात आल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं होतं.
पण इतक्या वेगाने लस तयार करण्याबद्दल तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली होती. जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिकेतल्या संशोधकांनी याबद्दल सावध राहण्यास सांगितलं होतं.
यानंतर रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी बुधवारी (12 ऑगस्ट) इंटरफॅक्स वृत्तसंस्थेला सांगितलं, "असं वाटतंय की औषधाच्या या स्पर्धेत रशिया आघाडीवर असण्यातला फायदा आमच्या परदेशी सोबत्यांना लक्षात आला आणि म्हणून ते निराधार चर्चा करत आहेत."
या लसीची पहिली बॅच पुढच्या दोन आठवड्यांत उपलब्ध होईल आणि सुरुवातीला ही लस मुख्यत्वे डॉक्टर्सना देण्यात येणार असल्याचं रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
ऑक्टोबरपासून ही लस मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना देण्याचं काम सुरू होणार असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सध्या जागतिक आरोग्य संघटनेनी 6 लसींची नावे जाहीर केली आहेत. ज्या लसी फेज 3 पर्यंत पोहोचल्या आहेत त्यांचीच नावे जागतिक आरोग्य संघटनांनी दिली आहेत आणि त्यामध्ये रशियाची लस नाही.
लस तयार झाल्याची माहिती मंगळवारी पुतिन यांनी दिली होती. पुतिन यांच्या मुलीला त्याचा डोस देण्यात आल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
या लशीचं लवकरच मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात येईल असं वृत्त रशिया टुडेनं दिलं होतं.
रशियामध्ये ही लस ऐच्छिक ठेवण्यात आली आहे, ती घेण्यासाठी कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, असं पुतिन यांचं म्हणणं आहे.
सुरुवातीला ही लस आरोग्य सेवक, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे, त्यानंतर जानेवारीपासून ही लस सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
"ही लस प्रभावीपणे काम करते. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, आणि मी पुन्हा सांगतो की या लशीनं सर्व महत्त्वाच्या चाचण्या पार केल्या आहेत," असं पुतिन यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या सरकारी संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिट्यूट इथं कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू होतं. जुलै महिन्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल, असं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं होतं.
कोरोनाच्या लशीकरता रशियाच्या वेगावर पाश्चिमात्य देशांनी साशंकता दर्शवली आहे. राष्ट्राभिमानासाठी रशियाने शास्त्रोक्त प्रक्रिया आणि सुरक्षितता यांना झुगारून तर दिलं नाही ना अशी चर्चा सुरू आहे.
लस शोधण्याचं काम नियंत्रित करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लस झटपट तयार व्हावी यासाठी शास्त्रीय तसंच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.
बीबीसीचे वैद्यकीय प्रतिनिधी फर्ग्युस वॉल्श यांचं विश्लेषण
रशियाच्या लस निर्मितीचा वेग अचाट करणारा आहे. त्यांनी 17 जूनला पहिली क्लिनिकल ट्रायल केली होती. चीन, अमेरिका आणि युरोप यांच्यानंतर त्यांची ही ट्रायल झाली होती.
इतर देशांप्रमाणे गमेलिया इंस्टिट्यूटने या ट्रायल्सचा डेटा आणि संशोधन खुलं केलं नाही त्यामुळे हे सांगणं कठीण आहे की ही लस नेमकी किती परिणामकारक आहे आणि सुरक्षित आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लस जाहीर करून जगाला संदेश दिला आहे की रशिया वैज्ञानिक क्षेत्रात पाठीमागे नाही पण लस निर्मितीमध्ये केवळ पहिलं येणं पुरेसं नाही.
आतापर्यंत अशी कोणतीच लस तयार झालेली नाही जी कोरोना व्हायरसविरोधात हमखासपणे मुकाबला करू शकेल. त्यामुळे जरी ही लस तयार झाली असं म्हटलं तर खरंच ही आपल्याला कोरोनाविरोधात संरक्षण देऊ शकेल का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच राहतो.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

जगभरात सध्या शंभरहून अधिक वेगवेगळ्या लशींवर संशोधन सुरू आहे, काही अगदी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आहेत तर काहींच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत.
ही प्रगती जलद असली तरी जाणकारांना वाटतं की 2021च्या मध्यापर्यंत सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध होणार नाही.
"अनेकदा एक-दोन शास्त्रज्ञ दावा करतात की त्यांच्या हाती काही लागलं आहे. ही नक्कीच एकदम चांगली बातमी आहे. पण लशीचा शोध लागणं किंवा लस सापडल्याची चिन्हं दिसू लागणं, आणि त्या लशीने खरोखरंच चाचणीचे सर्व टप्पे पार करणं, यात खूप मोठं अंतर आहे," असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवकते ख्रिश्चन लिंडमायर यांनी 4 ऑगस्टला सांगितलं होतं.
सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची किंमत225 रुपये
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था कोव्हिड-19 आजारावरील लशीचे 10 कोटी डोस 2021 सालच्या सुरुवातीपर्यंत बनवणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली.
पुनावाला यांनी प्रसिद्धी पत्रक काढून ही माहीती दिली आहे. भारतासह कमी राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोरोना लशीचे हे डोस पाठवले जाणार आहेत. यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची मदत घेतली जाणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातल्या संस्थेने 10 कोटी कोरोनावरील लशीच्या डोसेसची निर्मिती करण्यासाठी गावी (Gavi), बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत करार केला आहे.
गेट्स फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक फंडमार्फत 15 कोटी अमेरिकन डॉलर्स या लशीच्या निर्मितीच्या कामात वापरले जाणार आहेत.

फोटो स्रोत, Serum Institute
या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत 3 अमेरिकन डॉलर म्हणजे 225 रुपये असणार आहे. 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देणार असल्याचंही सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









