मुंबई कोरोना व्हायरस : 40 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अॅंटीबॉडी, कम्युनिटी स्प्रेड झाल्याचं डॉक्टरांना मान्य

फोटो स्रोत, ANI
मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या 57 टक्के आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या 18 टक्के लोकांच्या शरीरात कोव्हिड-19 विरोधात अॅंटीबॉडी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिका, निती आयोग आणि टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
मुंबईतील तीन वॉर्डमध्ये सिरो (SERO) सर्वेक्षण करण्यात आलं होतं. आर-उत्तर, एम-पश्चिम आणि एफ-उत्तर या वॉर्डमध्ये लोकांची एँटीबॉडी टेस्ट करण्यात आली होती.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

सिरो सर्वेक्षणाची माहिती
झोपडपट्टीतील 57 टक्के लोकांच्या शरीरात अॅंटीबॉडी तयार झाल्याचं स्पष्ट
इमारतीमध्ये राहणाऱ्या 18 टक्के लोकांच्या शरीरात अॅंटीबॉडी तयार झाल्याचं स्पष्ट
तीन वॉर्डमध्ये सरासरी 40 टक्के लोकांमध्ये अॅंटीबॉडी निर्माण झाल्या
पुरुषांच्या तुलनेत महिलामध्ये अॅंटीबॉडी तयार होण्याचं प्रमाण जास्त
दहिसर, चेंबूर आणि माटुंगा परिसरात सर्व्हेक्षणं
या सर्व्हेक्षणाबाबत बीबीसी मराठीशी बोलताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "40 टक्के जनतेची अॅंटीबॉडी चाचणी पॉझिटिव्ह आहे. कोव्हिडची लक्षणं दिसून न येणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. मुंबईमध्ये आपण लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होण्याच्या दिशेने चाललो आहे. याचाच अर्थ मुंबईत कोरोना व्हायरसची साथ हळूहळू नियंत्रणात येत आहे."
सिरो सर्वेक्षण
सिरो सर्वेक्षण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलं.
यात 6,936 लोकांचे नमुने घेण्यात आले होते.
आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले.
तीन विभागांमध्ये 40 टक्के लोकांची अॅंटीबॉडी चाचणी पॉझिटिव्ह आली याचा अर्थ मुंबईत कम्युनिटी स्प्रेड झालाय का? यावर बोलताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "याला कम्युनिटी स्प्रेड म्हणता येणार नाही. लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असते. अॅंटीबॉडी तपासणीचा दुसरा सर्व्हे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात येईल."
लक्षणं दिसून न येणाऱ्यांची संख्या जास्त
या सर्व्हेक्षणातून एक गोष्ट समोर आली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये अॅंटीबॉडी तयार होण्याचं प्रमाण इमारतींपेक्षा राहाणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट आहे.
जवळपास सात हजार लोकांपैकी एकाही व्यक्तीची कोव्हिड-19 ओळखण्यासाठी RT-PCR तपासणी करण्यात आली नाही. याचा अर्थ लोकांमध्ये लक्षणं दिसून आली नाहीत.
याबाबत राज्य सरकारच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, "सिरो सर्वेक्षणाचे आकडे पाहता असं म्हणता येईल की मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये काही प्रमाणात कम्युनिटी स्प्रेड किंवा कम्युनिटी ट्रान्समिशन झालं आहे. या सर्व्हेक्षणातून समोर आलेली चांगली गोष्ट म्हणजे, आपली रोकप्रतिकारक शक्ती चांगली आहे. ही रोकप्रतिकारक शक्ती लॉंग टर्म राहिली पाहिजे."
सिरो (SERO) सर्वेक्षण म्हणजे काय?
महाराष्ट्र मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांच्या माहितीनुसार,
सिरो (SERO) म्हणजे ब्लड किंवा रक्त. सेरो सव्हेक्षणात रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे याला सेरोलॉजिकल सर्वे किंवा सिरो सर्वे म्हंटलं जातं.
ते सांगतात, "सिरो सर्वेक्षणाचे आकडे मुंबईतील काही भागात कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा कम्युनिटी स्प्रेडकडे इशारा करत आहेत. या सर्वेक्षणातून समोर आलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊनही लोकांना लक्षणं दिसून येत नाहीयेत. त्यामुळे मृत्यूदरही कमी आहे."
पण असं असलं तरीही लोकांनी मास्क घातलं पाहिजे. हात स्वच्छ धुतले पाहिजेत आणि सोशल डिस्टंसिंग पाळलं पाहिजे, असं डॉ. उत्तुरे सांगतात.
"इमारतीमधील लोकांमध्ये अॅंटीबॉडी कमी प्रमाणात निर्माण झाल्या. याचा अर्थ कंटेनमेंट उपाययोजना आणि सोशल डिस्टंसिंगचा फायदा झाला," असं मतही डॉ. उत्तुरे व्यक्त करतात.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलमधले सिनिअर इंटेन्सिव्हिस्ट डॉ. राहुल पंडीत यांना मात्र हा कम्युनिटी स्प्रेड नसल्याचं वाटतं.
मुंबई हर्ड इम्युनिटीच्या दिशेने?
त्यांच्या मते, "सिरो सर्वेक्षणाच्या आकड्यांना कम्युनिटी स्प्रेड म्हणता येणार नाही. झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येने लोकं सार्वजनिक स्वच्छतागृह वापरतात. पाणी भरण्यासाठी एकच नळ असतो. एकाच घरात 8-10 लोक राहतात. या भागात सोशल डिस्टंसिंग शक्य नसतं. त्यामुळे झोपडपट्टीतील लोकांमध्ये मोठ्या संख्येने अॅंटीबॉडी तयार झाल्या आहेत."
"इमारतींमध्ये सोशल डिस्टंसिंग चांगल्या पद्धतीने पाळलं जातं. लोकांच्या घरात टॉयलेट आहेत. सॅनिटेशनच्या योग्य उपाययोजना आहेत. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये एँटीबॉडी निर्माण होण्याचं प्रमाण कमी आहे."
मग या आकड्यांवरून आपण मुंबईत हर्ड इम्युनिटी निर्माण होतेय असं म्हणू शकतो का?
यावर बोलताना डॉ. पंडीत म्हणाले, "हर्ड इम्युनिटीसाठी मोठ्या संख्येने लोकांमध्ये इन्फेक्शन व्हावं लागलं. त्यामुळे फक्त 7 हजार लोकांच्या तपासणीमुळे हर्ड इम्युनिटी तयार होईल असं म्हणता येणार नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








