कोरोना लस कोव्हॅक्सिन : महाराष्ट्रात स्वदेशी कोरोना लशीच्या चाचणीला नागपुरात सुरुवात

फोटो स्रोत, Getty Images
भारत बायोटेकच्या आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या कोव्हिड-19 विरोधातील लशीच्या चाचणीला महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे.
नागपूरच्या डॉ. गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणि रिसर्च सेंटरमध्ये दोन दिवसात 7 जणांना पहिल्या टप्प्यातील चाचणीत 'कोव्हॅक्सिन'लशीचा डोस देण्यात आला आहे.
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. गिल्लूरकर मल्टीस्पेशालीटी रुग्णालय आणि रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, "कोव्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे. सोमवारी 3 तर मंगळवारी 4 जणांना लशीचा पहिला डोस दिण्यात आला आहे. आत्तापर्यंत 70 जणांची यासाठी नोंदणी झाली असून त्यांच्या रक्ताचे नमुने दिल्लीला पाठवण्यात आले आहेत."

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

पहिल्या टप्प्यात 30 ते 40 जणांना कोव्हॅक्सिनचा डोस डॉ. गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणि रिसर्च सेंटरमध्ये देण्यात येणार आहे.
"पहिला डोस दिल्यानंतर 14 व्या दिवशी दुसरा डोस देण्यात येईल. 14 व्या दिवशी रक्ताचे नमुने तपासून त्यात रोकप्रतिकारक शक्ती म्हणजे एँटीबॉडी तयार झाल्यात का हे तपासलं जाईल. एँटीबॉडी किती दिवसात तयार होतात. लोकांच्या शरीरात किती दिवस राहतात. त्यांना बूस्टरजी गरज आहे का? यांचा अभ्यास केला जाईल. पहिल्या टप्प्याचील चाचणीसाठी एक महिन्याचा अवधी लागेल," असं डॉ. गिल्लूरकर म्हणाले.
पहिला डोस दिल्यानंतर लोकांना काही त्रास झाला का? काही साईड इफेक्ट दिसून आले का? याबाबत डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, "पहिला डोस दिल्यानंतर त्यांना 2 तास रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात आलं. त्यांना काहीच त्रास किंवा साइड इफेक्ट दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं. आमची रिसर्च टीम या लोकांच्या सातत्याने संपर्कात आहे.
नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये 25 आणि 31 वर्षांच्या 2 तरुणांचा समावेश आहे. तसंच 53 वर्षीय महिलेनंही यात सहभाग घेतला आहे.
डॉ गिल्लूरकर यांच्या माहितीनुसार, हे लोक चाचणीसाठी घालून दिलेल्या निकषांनुसार योग्य आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे इतर आजार नाहीत.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, या ट्रायलसाठी पुढे आलेल्यांना दैनंदिन कामं करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. मास्क घालणं, सोशल डिस्टंसिंग, हाथ स्वच्छ धूणं याबाबत माहिती देण्यात आली आहे.
देशातील 12 संस्थांमध्ये कोव्हॅक्सिनची ट्रायल होणार आहे. नागपुरातील डॉ. गिल्लूरकर हॉस्पिटल यापैकी एक आहे.
दिल्लीत पाठवण्यात आलेले लोकांचे रिपोर्ट आल्यानंतर येत्या काही दिवसात आणखी 4 जणांना या लशीचा डोस देण्यात येणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








