इस्रायल, यूएई आणि बहारीनमध्ये करार : मध्य-पूर्वेत नवी पहाट - ट्रंप

व्हाईट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

फोटो स्रोत, Anadolu Agency

फोटो कॅप्शन, व्हाईट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनने इस्रायलसोबत आपले संबंध प्रस्थापित करण्यासाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे.

दोन आखाती देशांनी करार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी "नव्या मध्यपूर्वेची सुरुवात" अशा शब्दांत कौतुक केलंय.

करारावर स्वाक्षरी केल्याचा एक व्हीडिओ राष्ट्राध्यक्ष ट्रंप त्यांनी शेअर केला आहे. ते म्हणतात, "मध्य पूर्वेत कित्येक दशकांपासून चालत आलेल्या संघर्षानंतर आज आम्ही एक नवीन सुरुवात केली आहे. इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनच्या लोकांचं अभिनंदन. ईश्वर तुम्हा सर्वांचे भलं करो!"

मंगळवारी (15 सप्टेंबर) व्हाईट हाऊसमध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना संबोधित करताना डोनाल्ड ट्रंप म्हणाले, "आज दुपारी आम्ही एक नवा इतिहास रचणार आहोत. इस्रायल, युएई आणि बहारीन आता दुतावास सुरू करू शकतील. राजदूत नियुक्त करतील आणि सहकारी देश म्हणून काम करतील. आता ते मित्र आहेत."

व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांसोबत ट्रम्प

फोटो स्रोत, Alex Wong

फोटो कॅप्शन, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांसोबत ट्रंप

पॅलेस्टाईनचा आक्षेप, व्यक्त केली नाराजी

अमेरिका, यूएई आणि बहारीनने या कराराला ऐतिहासिक म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनला या करारासाठी एकत्र आणण्यात डोनाल्ड ट्रंप यांनी मोठी भूमिका बजावली.

1948 साली इस्रायलची स्थापना झाल्यापासून इस्रायलला मान्यता देणारे यूएई आणि बहारीन तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे अरब देश बनले आहेत.

गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईने इस्रायलसोबत आपले संबंध प्रस्थापित करण्याचं मान्य केलं. तेव्हापासून बहारीन सुद्धा ही भूमिका घेईल असा अंदाजव्यक्त करण्यात येत होता.

या करारानंतर उर्वरित अरब देशही याच दिशेने वाटचाल करतील अशी आशा राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी व्यक्त केलीय. तर पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील वाद मिटेपर्यंत अरब देशांनी प्रतिक्षा करावी असं आवाहन पॅलेस्टाईननं केलं आहे.

युएई, बहरीन आणि इस्रायल करार

फोटो स्रोत, Alex Wong

ट्रंप यांचं यश की तडजोड?

अनेक दशकांपासून अरब देश इस्रायलचा बहिष्कार करत आलेत. इस्रायल जेव्हा पॅलेस्टाईनसोबतच्या वादावर तोडगा काढेल तेव्हाच आम्ही इस्रायलसोबत आमचे संबंध प्रस्थापित करू अशी बहुतेक अरब देशांची भूमिका आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. त्यांनी सांगितलं, "आज ऐतिहासिक कराराचा दिवस आहे. हा करार शांतीची नवीन पहाट घेऊन येईल."

पॅलेस्टाईनमध्ये ताबा मिळवलेल्या जागांमधून इस्रायल माघार घेईल तेव्हाच मध्य पूर्वेत शांती नांदेल असं पॅलेस्टाईनचे नेते महमूद अब्बास यांनी म्हटलं आहे.

एफपी वृत्तसंस्थेनुसार, करारावर स्वाक्षरी केल्यानंतर महमूद अब्बास म्हणाले, "मध्य पूर्वेत शांती, सुरक्षा आणि स्थैर्य तेव्हाच प्रस्थापित होईल जेव्हा इस्रायल माघार घेईल."

करारावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम सुरू असताना गाझा पट्टीहून इस्रायलच्या दिशेने दोन क्षेपणास्त्र सोडली गेली, असा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे.

परराष्ट्र संबंधांबाबत वार्तांकन करणाऱ्या बीबीसीच्या प्रतिनिधी बारबरा प्लेट सांगतात, बहारीन आणि यूएईच्या कारारासाठी मदत करणे हे राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि त्यांचे जावई जॅरेड कशनर यांचं राजकीय यश आहे.

मध्यपूर्वेतल्या दौऱ्यावरून परतल्यानंतर कशनर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं, ट्रंप प्रशासनाने सगळीकडे एक "सकारात्मक ऊर्जेचा" प्रसार केला आहे. हे"उत्कृष्ट" आहे.

युएई, बहरीन आणि इस्रायल करार

फोटो स्रोत, Alex Wong

ट्रंप यांना निवडणुकीत फायदा?

या आंतरराष्ट्रीय यशाचा वापर ट्रंप आपल्या निवडणूक प्रचार मोहिमेसाठी करणार असल्याचे संकेत व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुद्यांमधून मिळतात.

इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाधिक अरब आणि मुस्लीम देश पुढे येऊ शकतात. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रंप हे मध्यपूर्वेतील शांतता आणि समृद्धीसाठी अग्रेसर आहेत असा प्रचार करण्यात येईल. यंदा त्यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं आहे.

यामुळे ते अपयशी ठरलेल्या इस्रायल-पॅलेस्टाईन शांतता करारापासून सर्वांचे लक्ष हटवू शकतील. या मोहिमेवर मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात आली. कारण ही मोहीम इस्रायलच्या बाजूने असल्याचं सांगितलं जात होतं. म्हणून पॅलेस्टिनने ती फेटाळली.

बीबीसी प्रतिनिधी बारबरा प्लेट सांगतात, ट्रंप प्रशासन बाहेरच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करून पॅलेस्टाईनच्या जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आता इस्रायलसोबत संबंध मर्यादित ठेवू शकत नाही.

ऑगस्टमध्ये यूएईने केलेल्या घोषणेपूर्वी इस्रायलचे अरब देशांशी कोणतेही राजकीय संबंध नव्हते. पण अलीकडच्या काळात इराणसोबत तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने यूएई आणि इस्रालयमध्ये अनौपचारिक संपर्क आला.

डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंप आणि जावई जॅरेड कशनर

फोटो स्रोत, SAUL LOEB

गेल्या महिन्यात इस्रायल आणि यूएई यांच्यात पहिली अधिकृत विमान वाहतूक सुरू झाली. संबंध सामान्य करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक मोठं पाऊल मानलं जात होतं.

विमानात बसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे जावई आणि त्यांचे वरिष्ठ सल्लागार जॅरेड कशनर यांनी सांगितलं, "संयुक्त अरब अमिरातच्या करारात मध्य पूर्वेची संपूर्ण दिशा बदलण्याची क्षमता आहे."

इस्रायल आणि यूएई दरम्यानच्या उड्डाणांसाठी आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी देणार असल्याचं बहारीनने गेल्या आठवड्यातच मान्य केले.

1999 मध्ये उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील अरब लीगचा सदस्य मॉरिटानियानं इस्रायलसोबत राजकीय संबंध प्रस्थापित केले होते. पण 2010 हे संबंध तोडण्यात आले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)