अमेरिका निवडणूकः कमला हॅरिस यांची काश्मीरविषयीची विधानं चर्चेत का आहेत?

फोटो स्रोत, Reuters
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, वॉशिंग्टन
कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे.
जम्मू काश्मीरमधून हटवण्यात आलेलं कलम 370 आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या निर्बंधांविषयीची कमला हॅरिस यांची मत भारत सरकारच्या विरुद्ध आहेत.
टेक्सासमधल्या ह्युस्टनमध्ये सप्टेंबर 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना काश्मीरमधले फोन आणि इंटरनेटवरचे निर्बंध आणि लोकांना ताब्यात घेण्याविषयी विचारण्यात आलं होतं.
यावर कमला हॅरिस म्हणाल्या, "आम्हाला लोकांना हे सांगायचंय, की ते एकटे नाहीत, आमचं त्यांच्यावर लक्ष आहे. मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत बोलत राहणं, गरज असेल तिथे हस्तक्षेप करणं या गोष्टी एक देश म्हणून आमच्या मूल्यांचा एक भाग आहेत."
काश्मीरबाबतचं हे एक कठोर विधान असल्याचं काहींनी म्हटलं तर काहींच्या मते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारा कोणताही अमेरिकन नेता आपल्या कॅम्पेनदरम्यान तेच म्हणाला असता जे कमला हॅरिस म्हणाल्या.
डिसेंबर 2019मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांची भेट घेतली नव्हती. त्यावरही कमला हॅरिस यांनी टीका केली होती. प्रमिला जयपाल याही मोदी सरकारवर टीका करत आल्या आहेत.
कमला हॅरिस यांनी ट्वीट केलं होतं, "बैठकीमध्ये कोण सहभागी होणार हे कोणत्याही परदेशी सरकारने काँग्रेसला सांगणं चूक आहे. मी प्रमिला जयपाल यांच्या बाजूने आहे. आणि सदनातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनीही असंच केल्याचा मला अभिमान आहे."
स्थलांतरित, शरणार्थी आणि मुसलमानांवरच्या निर्बंधांवरूनही कमला हॅरिस यांनी ट्रंप प्रशासनाच्या धोरणांवर टीका केली आहे
मोदीचं केलं होतं स्वागत
पण या सगळ्या गोष्टी म्हणज कमला हॅरिस यांची एक बाजू असल्याचं म्हटलं जातंय.
कमला हॅरिस यांनी 2017मध्ये एक ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अमेरिकेत स्वागत केलं होतं.
कमला हॅरिस यांचे विचार दोन्ही पक्षांसाठीही अगदी टोकाचे नसल्याचं हडसन इन्स्टिट्यूट इंडिया इनिशिएटिव्हच्या संचालक अपर्णा पांडे सांगतात.
अपर्णा म्हणतात, "काश्मीरमध्ये काय चाललंय असं त्यांनी विचारलं का? इतकंच काय अमेरिकेचा परराष्ट्र विभागही काश्मीरबद्दल बोलत आलेला आहे."
पण पाकिस्तान अमेरिकन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीचे डॉ. राव कामरान अली सांगतात, "पाकिस्तानी अमेरिकन असल्याने आम्ही खूप खुश आहोत. काश्मीरबद्दलचं त्यांचं विधान स्पष्ट आहे. त्यांनी काश्मीरींचे हक्क फेटाळलेले नाहीत. त्या हाऊडी मोदी कार्यक्रमालाही गेल्या नाहीत."

फोटो स्रोत, EPA
काही महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. तर ट्रंप यांनी ह्यूस्टनमध्ये झालेल्या हाऊडी मोदी या दिमाखदार कार्यक्रमात लोकांमध्ये मिसळत अभिवादन केलं होतं.
काहींच्या मते कमला हॅरिस अतिशय समजूतदार आहेत आणि त्यांना स्वतःची समर्थक किंवा विरोधक अशी कोणतीही एक प्रतिमा निर्माण करायची नाही.
कमला हॅरिस यांच्या भूमिकेकडे लक्ष
विविध मुद्दे आणि विषयांबद्दलीची कमला हॅरिस यांनी यापूर्वी व्यक्त केलेली मतं आणि विधानं सध्या विश्लेषक खोदून काढत आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातल्या मोदी सरकारला काश्मीरमधून कलम 370 हटवणं, त्यानंतर तिथे निर्बंध लावणं, CAA, दिल्ली दंगली आणि मॉब लिंचिंग, मुसलमानांवरचे अत्याचारावरून अमेरिकेच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.
प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष ट्रंप याविषयी फार काही बोलणं टाळत आले असले तरी बर्नी सँडर्स आणि एलिझाबेथ वॉरेन यांच्यासारख्या आघाडीच्या डेमोक्रॅट नेतल्यांनी काश्मीरविषयीच्या भारताच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे.
कमला हॅरिस यांना जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा उमेदवार म्हणून निवडलेलं आहे. म्हणून दक्षिण आशियातल्या वादग्रस्त मुद्द्यांविषयीचे त्यांचे विचार तपासले जात आहेत.

फोटो स्रोत, APARNA PANDE
अपर्णा पांडे सांगतात, "आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही अल्पसंख्याकांचं संरक्षण करू असं आपल्या घटनेत म्हटलंय. अमेरिकेची घटनाही हेच सांगते. जर एखादा उमेदवार सीरिया, लेबनन, वीगर यांच्याविषयी बोलत असेल तर त्याला भारतातल्या मानवी हक्कांबाबतही बोलावं लागेल."
पण मग त्यांच्याकडे मोदींच्या टीकाकार आणि भारताच्या काश्मीर धोरणांविषयी बोलणाऱ्या नेत्या म्हणून पहावं का?
त्यांच्या आतापर्यंतच्या विधानांवर असे कोणतेही संकेत मिळत नसल्याचं एक विचारसरणी सांगते.
तर भारत कोणत्याही प्रकारच्या टीकेबाबत संवेदनशील असल्याचं दुसरे सांगतात.
एका विश्लेषकांनी सांगितलं, "जर मी तुमचा मित्र असेन तर मग तुमची प्रत्येक गोष्ट मला आवडायला हवी. काश्मीरचा उल्लेख जरी केला तरी तुम्ही शत्रू ठरता. घटनेतल्या मूल्यांचं पालन करावं इतकंच अमेरिकेचं म्हणणं आहे."
जो बायडन यांचं व्हिजन डॉक्युमेंट
जो बायडन यांच्या व्हिजन डॉक्युमेंटमधला काश्मीर आणि NRCचा उल्लेख अनेक लोकांना आवडला नाही. काही जण याचा संबंध कमला हॅरिस यांच्या विचारांशीही लावत आहेत.
'अमेरिकेतल्या मुसलमान समाजासाठी जो बायडन यांचा अजेंडा' या मथळ्याखाली त्यांच्या व्हिजन डॉक्यमेंटमध्ये म्हटलंय, "काश्मीरमध्ये भारत सरकारने काश्मीरच्या लोकांना अधिकार देण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलायला हवीत."
डॉक्युमेंटमध्ये म्हटलंय, "असहमतीवर निर्बंध घालणं, म्हणजे विरोधातली शांततापूर्ण निदर्शनं थांबवणं किंवा इंटरनेट बंद करणं किंवा त्याचा वेग कमी करणं या गोष्टी लोकशाहीला कमकुवत करतात."
वादग्रस्त NRC विषयी यात म्हटलंय, " भारत सरकारने ज्या पद्धतीने आसाममध्ये एनआरसी लागू केलं आणि त्यानंतर ज्या प्रकारे नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला याबद्दल जो बायडन नाराज आहेत."
यामुळेच आता हिंदू अमेरिकन्सनबद्दलही अशाच प्रकारे पॉलिसी पेपर जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येतेय.
जो बायडन कॅम्पेननुसार चुरशीची लढत असणाऱ्या 8 राज्यांमध्ये महत्त्वाची ठरणारी भारतीय अमेरिकन्सची मतं आहेत.
जो बायडन यांनी काश्मीर आणि एनआरसीचा उल्लेख करूनही त्यांची प्रचार मोहीम भारतीय अमेरिकन्सची मतं आपल्या बाजूने वळवण्याचे जोरदार प्रयत्न करत आहेत.
भारतीय आणि पाकिस्तानी अमेरिकन्सना आकर्षित करण्यासाठी बायडन कॅम्पने 14 आणि 15 ऑगस्टला व्हर्च्युअल इव्हेंट्सही ठेवले आहेत.
तर भारतीय अमेरिकन्सची मतं आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतील अशी आशा ट्रंप यांच्या कॅम्पेनलाही आहे.
ट्रंप व्हिक्टरी इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीच्या अंदाजानुसार सुमारे 50 ठक्के संभाव्य भारतीय अमेरिकन मतदार हे "डेमोक्रॅट्सना सोडतील" आणि "राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यासाठी मतदान करतील."
एक जाणकार सांगतात, "भारतामध्ये मुसलमानांसोबत जे होतंय ते सारं जग बघतंय आणि त्यामुळे आपली जागतिक प्रतिमा खराब होत आहे. तुम्हाला लिंचिंगबाबत ऐकू येतं, लोकांना पकडून मारलं जातं, ही आपली प्रतिमा आहे."
पण निवडणुकीसाठीच्या कागदपत्रांत काश्मीर आणि एनआरसीचा उल्लेख असणं हे फक्त निवडणुकीपुरतं असू शकतं, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे.
याविषयी अपर्णा पांडे सांगतात, "लोक प्रचारादरम्यान खूप काही बोलतात, जे ते राष्ट्रपती झाल्यानंतर बोलत नाहीत. जगामध्ये इतकं सगळं घडत असेल तर तुम्ही परराष्ट्र धोरणं किती बदलणार. सात दशकांपासून प्रलंबित मुद्द्यांच्या तुलनेत यामध्ये तुमचा जास्त वेळ जाईल."
हॅरिस यांचा भारताशी संबंध
कमला हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात झाला होता आणि आपल्या भारतीय वारशाबद्दल त्या कायम बोलतात. पाकिस्तानातल्या विश्लेषकांच्या एका गटात यामुळे काहीशी चिंता निर्माण झाली आहे.

फोटो स्रोत, FAIZ RAHMAN
अमेरिकेमध्ये 35 वर्षं वास्तव्य असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक फैज रहमान सांगतात, " भारताशी नातं असणारी व्यक्ती भारत समर्थक आणि पाकिस्तान विरोधी असेल अशी काळजी वाटू शकते, पण इथे राहणाऱ्या बहुतांश पाकिस्तानींना असं वाटत नाही."
फैज रहमान पुढे सांगतात, "उपराष्ट्राध्यक्ष पद प्रतिकात्मक असतं. सगळी सूत्रं राष्ट्राध्यक्षाच्या हातात असतात. असं म्हटलं जातंय की बायडन यांचं वय जास्त असल्याने कदाचित उपराष्ट्राध्यक्षांना जास्त संधी मिळू शकते."
पण काँग्रेशनल पाकिस्तान कॉकस फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आणि डेमोक्रॅट नेता ताहिर जावेद यांना काळजी वाटत नाही.
ते सांगतात, "त्या माझ्याही उपराष्ट्राध्यक्ष आहेत. जेव्हा जेव्हा मानवी हक्कांचं उल्लंघन होईल, त्या आवाज उठवतील."

फोटो स्रोत, RAO KAMRAN
मी ज्या ज्या पाकिस्तानी आणि भारतीय अमेरिकन्ससोबत बोललो, त्यांनी हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे आपण खुश असल्याचं सांगितलं.
पाकिस्तानी अमेरिकन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीचे डॉ. राव कामरान अली सांगतात, "माझी मुलगी खूप खुश आहे. जर कमला हे करू शकतात, तर ती देखील राष्ट्राध्यक्ष बनू शकते. माझ्या मुलीसाठी सुझन राईस यांच्यापेक्षा कमला हॅरिस यांच्याकडून प्रेरणा घेणं जास्त सोपं आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








