You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंग्या खाल्ल्यामुळे खरंच दीर्घायुष्य लाभतं का?
- Author, पीटर यंग
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
कोलंबियातील अँडीज पर्वतरांगातलं बारिचेरा शहर. दरवर्षी या शहरात एक महत्त्वाचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव ख्रिसमस, नववर्ष किंवा ईस्टर यापैकी कोणताच नसतो.
या महोत्सवाला स्थानिक भाषेत 'ला सॅलिडा' किंवा 'द एक्झिट' असं संबोधलं जातं. जुलै महिन्यात हा उत्सव साजरा होतो.
या दिवशी बारिचेरामधले रस्ते सुनसान दिसून येतील. दुकानदार, व्यापारी साफसफाई करणारे या दिवशी कामगार सुटी घेतात. इथल्या शाळाही बंद असतात.
कोलंबियाच्या उत्तर-मध्य भागात सँटेंडर प्रांत वसलेला आहे. या भागात आढळून येणाऱ्या 'होर्मिगस कुलोनस' किंवा बिग-बट नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंग्यांच्या शोधात हे सगळे लोक जातात.
सध्याचा काळ हा या मुंग्यांचा विणीचा हंगाम आहे. त्यामुळे या काळात या मुंग्या जमा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने येतात.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
मार्गारिटा हिग्वेरा एक मानसोपचार तज्ज्ञ होत्या. पण आपलं क्षेत्र बदलून त्या आता शेफ बनल्या आहेत. त्या सांगतात, "इथं मुंग्या पकडण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, असा अलिखित नियम आहे. तुम्ही जर मुंग्यांच्या वारूळासमोर पहिल्यांदा तुमची बादली ठेवली, तर तुम्ही हव्या तितक्या मुंग्या गोळा करू शकता. मग त्या जमिनीवर तुमची मालकी असो की नसो."
या भागातला वसंत ऋतूचा काळ हा मुंग्यांचा विणीचा हंगाम मानला जातो.
सुमारे दोन महिने हा हंगाम सुरू असतो. यादरम्यान स्थानिक लोक जमेल तेवढ्या मुंग्या जमा करतात. या मुंग्या साधारणतः शेंगदाण्याप्रमाणे दिसतात. त्यातील राणी मुंगीचा आकार मोठ्या झुरळाएवढा असू शकतो. बाकीच्या मुंग्या आकाराने साधारण असतात.
या मुंग्यांची चव, शेंगदाणे, पॉपकॉर्नसारखी असते. मीठ टाकून तव्यावर भाजून या मुंग्यांची 'डिश' तयार केली जाते. त्यांचे वेगवेगळे फ्लेवरही बनवले जातात.
"मला या मुंग्यांची चव अतिशय आवडते," स्वयंपाक घरात एका लहान भांड्यांमध्ये भरलेल्या मुंग्यांमधून कागदी तुकडे बाजूला काढता-काढता हिग्वेरा म्हणाल्या.
त्या पुढे सांगतात, "या मुंग्या पाहून मला जुने दिवस आठवतात. एके दिवशी आमच्या आजोबांनी एक मोठं बॅरेल भरून या मुंग्या आणल्या होत्या. आमचं संपूर्ण कुटुंब त्या बॅरेलभोवती जमा झालं होतं. आम्ही त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले होते."
सैनिक मुंग्यांकडून राणीचं संरक्षण
'होर्मिगस कुलोनस' मुंग्यांमध्ये राणी मुंग्या अतिशय चवदार मानल्या जातात. या मुंग्या मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात.
कोलंबियाच्या जगप्रसिद्ध कॉफीपेक्षाही मुंग्यांना जास्त दर मिळतो. या मुंग्या 3 लाख पेसो (65 डॉलर) प्रति किलो दराने विकल्या जातात. त्यामुळे स्थानिकांसाठी उत्पन्नाचं एक चांगला स्रोत म्हणून मुंग्यांची ओळख आहे.
फेडरिको पेड्रेझा बारिचेरामधले एक सफाई कामगार आहेत. "होर्मिगस मुंग्यांच्या विक्रीतून मी माझ्या आठवड्याच्या पगाराइतकी रक्कम एका दिवसात कमावू शकतो. पण हे काम अवघड आहे. वारुळातल्या सैनिक मुंग्या त्यांच्या राणीला सहजासहजी घेऊन जाऊ देत नाहीत," असं ते सांगतात.
या कामासाठी गुडघ्यापर्यंत लांबीचे रबरी बूट आणि लांब हातमोजे वापरले जातात. मुंग्या गोळा करणाऱ्या व्यक्तीने कामात चपळाई दाखवणं अत्यंत आवश्यक आहे.
राणी मुंगीचं संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या मुंग्या कोणत्याही प्रकारचा धोका दिसल्यास तातडीने सक्रीय होतात. त्या जोरदार चावा घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला प्रचंड जळजळ होण्याची शक्यता असते. पण चवदार राणी मुंग्यांसाठी स्थानिक लोक हा धोका पत्करण्यास तयार असतात.
या मुंग्या प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहेत. यांच्यात 'अनसॅच्युरेटेट फॅटी अॅसिड' मोठ्या प्रमाणात आढळून येतात. रक्तातील कोलेस्टेरॉल वाढ रोखण्याचं काम त्या करतात.
'फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन' नावाच्या जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं होतं. या मुंग्यांमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो, असा अहवाल यात प्रसिद्ध झाला आहे.
या कारणामुळेच बारिचेरामध्ये राहणारे लोक दीर्घायुषी, सुदृढ आणि निरोगी असतात, असं सेसिला गोंझालेज क्विंटेरो सांगतात. सेसिला या बारिचेरा परिसरात एक दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात या मुंग्या विकत मिळतात. त्या 20 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत.
त्या पुढे सांगतात, "या मुंग्यांच्या सेवनाने तुम्हाला एक विशिष्ट उर्जा मिळते. विशेषतः रसाळ अशा बिग-बट पासून तुम्हाला अनेक पौष्टीक घटक मिळतात."
सँटेंडर आणि परिसरातील लोक गेल्या 1400 वर्षांपासून होर्मिगस कुलोनस मुंग्याचा आहारात वापर करत आहेत.
ऐतिहासिक नोंदीनुसार, 7 व्या शतकात मध्य कोलंबियामध्ये या मुंग्यांचा आहारामध्ये वापर सुरू झाला. त्यांचा वापर जखम लवकर भरून येण्यासाठी केला जायचा. नंतर स्पेनमधील आक्रमणकर्त्यांनीही हीच पद्धत पुढे नेली.
शिवाय, या मुंग्या कामोत्तेजक म्हणूनही ओळखल्या जातात. लग्नाच्या वेळी सिरॅमिक भांड्यांमध्ये या मुंग्या भरून भेट म्हणून देण्याची परंपरा इथल्या काही भागात पाळली जाते.
या देशातील मूळ रहिवासी असलेल्या अँडीयम समुदायामध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणात पाळली जाते.
जवळच्या बुकारमांगा शहरात तर या मुंग्यांच्या धातूच्या प्रतिकृतीही बनवण्यात आल्या आहेत, तसंच शहरात अनेक ठिकाणी मुंग्यांची भित्तीचित्रेही रंगवण्यात आली आहेत.
या परिसरातून प्रवास करणारे लोक इथं थांबून हमखास या मुंग्यांच्या विविध डिशेसचा नाश्ता करतात.
या मुंग्यांच्या आकाराची खेळणीही लहान मुलांसाठी तयार केल्या जातात. गेल्या काही वर्षांत या मुंग्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. प्रत्येक विणीच्या हंगामादरम्यान ट्रक भरभरून या मुंग्या कोलंबियाच्या विविध भागात पाठवल्या जातात.
'होर्मिगस कुलोनस' मुंग्या कोलंबियाच्या खाद्यसंस्कृतीतला एक महत्त्वाचा भाग आहे, असं कोलंबियातील एका रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करणारे एडवर्डो मार्टिनेझ सांगतात.
एडवर्डो आपल्या कुटुंबीयांसोबत सँटेंडर परिसरात पर्यटनासाठी गेले असता त्यांनी पहिल्यांदा होर्मिगस मुंग्यांच्या डिशची चव घेतली होती. त्यावेळी ते फक्त नऊ वर्षांचे होते.
या मुंग्यांच्या डिशचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करून इतरत्र याचा प्रसार केला जावा, असं एडवर्डो यांना वाटतं.
मुंग्यांच्या प्रजननातील अडचणी
पण गेल्या काही दशकांमध्ये बेसुमार जंगलतोड आणि वाढत्या शहरीकरणामुळे या मुंग्या आणि मानवामध्ये अधिवासाबाबत संघर्ष निर्माण होत असल्याचं चित्र आहे.
लोकसंख्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात शहरांची हद्द वाढू लागली आहे. यामुळे मुंग्यांच्या अधिवासात मानवाचं अतिक्रमण होत आहे.
त्यामुळे नव्या इमारतींच्या पायाजवळच्या भागात या मुंग्यांची मोठमोठी वारूळं दिसून येतात. शिवाय जंगलातून शेतीमध्ये घुसलेल्या मुंग्यांमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठं नुकसान होत असल्याचं आढळून येत आहे.
शिवाय, वातावरणातील बदलामुळे मुंग्यांच्या प्रजननावर त्याचा परिणाम होत आहे.
परिणामी, ऊन वाढत असतानाचा काळ मुंग्यांचा विणीचा हंगाम मानला जातो. पण प्रतिकूल हवामानामुळे होणारी अतिवृष्टी किंवा आर्द्रता यांमुळे मुंग्यांच्या विणीच्या हंगामात बाधा येतात.
राणी मुंगीला प्रजनन करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हवामानासोबतच मऊ कोरडी माती लागते. जमीन मऊ नसेल तर त्यांना आपल्या वारूळातून बाहेर येण्यास अडचणी येतात.
त्यामुळे जंगलतोड आणि शहरीकरणाचे दुष्परिणाम मुंग्यांच्या अधिवासावर होत असून त्यांच्या वाढीवर मर्यादा येत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
बुकारमांगामध्ये राहणाऱ्या ऑरा ज्युडीट कुड्रोस या एक संशोधक आहेत. मुंग्यांचं प्रजनन या विषयावर त्यांचं संशोधन सुरू आहे.
त्यांच्या मते, परिस्थिती अनुकूल नसेल तर या मुंग्या जन्मणार नाहीत किंवा जन्मल्या तरी त्यांना वारूळातून बाहेर जमिनीवर येता येणार नाही.
पण दुसरीकडे, या मुंग्यांच्या प्रजातींना अद्याप कोणताही धोका नसल्याचं काहींचं मत आहे.
आम्ही या भागात माहिती घेण्यासाठी गेलो तेव्हा तिथले स्थानिक अॅलेक्स जिमेनेझ यांनी आम्हाला एक प्रयोग करून दाखवला.
अॅलेक्स यांनी हार्मिगोस मुंग्यांच्या वारूळाच्या तोंडातून एक झाडाची फांदी आतमध्ये घातली. यानंतर चिडलेल्या सैनिक मुंग्या काय घडतंय हे पाहण्यासाठी लागलीच बाहेर आल्या.
अॅलेक्स यांच्या मते, "हार्मिगोस मुंग्यांच्या प्रत्येक वारूळात हजारो मुंग्या असतात. यांची संख्या कधी कधी सुमारे 50 लाखांपर्यंत असू शकते. जमिनीखाली कित्येक मैल पसरलेल्या बिळांमध्ये ते लपून बसलेल्या असतात.
विशेष म्हणजे, राणी मुंगी 15 वर्ष जगू शकते. पण ती मरते तेव्हा इतर मुंग्या आपलं घर बदलून इतर ठिकाणी राहायला जातात.
"या मुंग्यां नैसर्गिकपणे अतिशय हुशार असतात. धोक्याच्या वेळी त्या सर्व एक होऊन लढतात. त्या कधीच नष्ट होऊ शकणार नाहीत. पुढची कित्येक वर्षं आपण त्या खाऊ शकतो," अलेक्स सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)