काँडमपासून ते टायरपर्यंत : जाणून घ्या रबराचा रक्तरंजित इतिहास

फोटो स्रोत, Getty Creative
रबराच्या इतिहासाकडे अनेकदा कर्ज घेऊन आणि सतत अपयशी होऊनही राबरला टणक बनवण्याची प्रक्रिया शोधणाऱ्या अमेरिकी अभ्यासकाच्या दृष्टिकोनानं पाहिलं जातं.
या शोधानं जगाला कार, ट्रक, विमानं आणि इतर मशिन्समध्ये टायर बनवण्याचा मार्ग दाखवला. या शोधकर्त्याचं व्यक्तीचं नाव होतं चार्ल्स गुडइयर.
बहुराष्ट्रीय कंपनी 'द गुडइयर टायर अँड रबर कंपनी'नं चार्ल्स यांच्या आडनावाला जगभरात पोहोचवलं.
पण, गुडइयर यांच्या अगोदर रबराविषयी कुणालाचा माहिती नव्हतं, असं नाहीये. दक्षिण आफ्रिकेतल्या मूलनिवासींना या रबराची कल्पना होती.
1490च्या दरम्यान त्यांनी झाडांपासून एकप्रकारचं मेण तयार केलं होतं. या झाडांना चिरा पाडल्यास त्यातून 'दूध' यायचं आणि मग त्यापासून मेण तयार केल जात असे.
हे 'दूध' म्हणजे एकप्रकारची घट्ट गोंद असे आणि त्या झाडाचं नाव होतं 'हेविया ब्रासीलिएंसिस'. याला रबर नाव मिळण्याचीही एक वेगळीच कहाणी आहे.
फ्रेंच नागरिक जेव्हा अमेझॉनच्या जंगलात पोहोचले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्थानिक मूलनिवासी याला 'काउचोउक' म्हणतात. ज्याच्या अर्थ 'रडणारं झाड' असा व्हायचा.
पण, 19व्या शतकापर्यंत रबराविषयी अख्ख्या जगाला जाणून घ्यायचं होतं.
बीबीसीचे पत्रकार टीम हरफोर्ड यांनी '50 थिंग्स दॅट मेड द मॉडर्न इकॉनॉमी' नावाची एक सीरिज केली होती. यात अशा शोधांविषयी माहिती सांगण्यात आली होती, ज्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले.
चार्ल्स गुडइयर यांचा शोध
1820च्या दशकात रबराविषयी जगात उत्सुकता वाढायला लागली होती. ब्राझीलपासून युरोपपर्यंत मोठ्या प्रमाणावर रबराची देवाणघेवाण सुरू होती.
बुट, टोपी, कोट, लाइफ जॅकेट आदी रबरांपासून तयार होत होते. इतकंच काय तर चार्ल्स गुडइयर यांचा पहिला अयशस्वी प्रयोगसुद्धा इन्फ्लेटर ट्यूब बनवण्याविषयीचाच होता. यामुळे लाइफ जॅकेटमध्ये हवा भरता येऊ शकेल.

फोटो स्रोत, Getty Images
पण, हे इन्फ्लेटर ट्यूब हिवाळ्याच्या दिवसांत एकदम कडक होत असे आणि उन्हाळ्यात लवचिक.
टीम हरफोर्ड सांगतात, "गरमीच्या दिवसांत गुडइयर यांच्या लक्षात आलं, की त्यांनी शोध लावलेली वस्तू विरघळत आहे आणि त्यापासून दुर्गंधही येत आहे."
पण, या अपयशातही त्यांनी संधी शोधली. त्यानंतर रबरला स्थिर ठेवण्याचा पर्याय शोधण्यासाठी त्यांनी 5 वर्षं मेहनत घेतली.
यात अडचण ही होती की त्यांना केमिकल इंजीनियरिंगविषयी काही माहिती नव्हतं. त्यामुळे मग त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालला होता आणि त्यांना अनेकदा तुरुंगातही जावं लागलं होतं.
शेवटी 1839मध्ये रबर एकदम स्थिर किंवा कडक कसं राहिल, याविषयीची प्रक्रिया त्यांनी शोधून काढली.
रबर, सल्फर आणि आगीचा वापर करून त्यांनी जो पर्याय शोधला त्यामुळे आधुनिक जगात आमूलाग्र बदल झाले.

फोटो स्रोत, Getty Images
पण, एका गोष्टीचा शोध लागणं अजून बाकी होतं. 1880च्या दशकात स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन बॉयड डनलप यांनी तो शोध लावला. त्या गोष्टीचं नाव होतं टायर.
रबराशिवाय जगणं शक्य नाही
सायकल आणि गाडींचे टायर बनवण्याशिवाय रबराचा वापर कारखान्यांमध्ये स्वयंचिलत कामासाठी वापरण्यात येणारे ट्रान्सपोर्ट बेल्ट बनवण्यासाठी होऊ लागला.
हे बेल्ट विद्यूत रोधक होते. त्यामुळे केबल वायरच्या कव्हरमध्ये त्याचा वापर व्हायला लागला. त्यापासून काँडमसुद्धा तयार करण्यात येऊ लागले.
अशा अनेक गोष्टी होत्या ज्यांच्यासाठी रबराचा वापर आवश्यकच नाही, तर अपरिहार्य बनला होता. त्यामुळे मग रबराची मागणी इतकी वाढली की युरोपीय देश जगभरात त्याचे स्रोत शोधायला लागले.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रयत्नांचा भाग म्हणून आशियात मोठ्या प्रमाणावर जंगलांची तोड करण्यात आली. रबर प्लांट (हेविया ब्रासीलिएंसिस) चालू करण्याचा यामागे हेतू होता.
पण, ही झाडं वाढण्यासाठी बराच वेळ घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीच्या झाडांविषयी माहिती मिळाली, ज्यातून कमी प्रमाणात रबर मिळत असे.
पाश्चिमात्य देशांसाठी रबराशिवाय काम करणं अवघड होतं. रबराचा सगळ्यांत मोठा स्रोत आफ्रिकेत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
जगभरात या भागाला आज 'डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो' या नावानं ओळखलं जातं.
टीम हरफोर्ड सांगतात, "रबराचं अधिकाधिक उत्पादन कमीतकमी वेळेत कसं मिळवायचं,' हा प्रश्न पाश्चिमात्य देशांसमोर होता.
"नैतिकतेचा विचार बाजूला ठेवला तर याचं सरळ उत्तर होतं की, एखाद्या शहरात सशस्त्र लोकांना पाठवा, महिला आणि मुलांना पळवून न्या आणि पुरुषसुद्धा मोठ्या प्रमाणात रबर आणू शकले नाही, तर त्याचे हातपाय तोडा किंवा त्यांच्या एखाद्या नातेवाईकाचा जीव घ्या."
या हिंसक योजनेचे सूत्रधार होते, इतिहासातील सगळ्यांत बदनाम राज्यकर्त्यांपैकी एक असलेले बेल्जियमचे राजे लियोपॉल्ड द्वितीय.
दहशतीचं राज्य
कांगोला त्या काळात 'कांगो फ्री स्टेट' (ELC) या नावानं ओळखलं जायचं. या स्टेटचा निजाम मर्यादेत वावरेल असा नव्हता.
तोही लियोपॉल्ड द्वितीयसारखाच होता.
इतिहासकार सियान लँग यांनी बीबीसी हिस्ट्री मॅगझिनमध्ये लिहिलं होतं, "स्वातंत्र्य आणि समृद्धीचं एक मॉडेल म्हणून ELC ला जगासमोर ठेवण्यात आलं होतं. पण, कांगोमधल्या लोकांना गुलाम बनवण्यात आल्याचं हळूहळू जगाच्या लक्षात आलं. कांगोजवळ हत्तीचे दात, रबर यांचं मोठं भांडार होतं."
"लियोपॉल्डने एकीकडे या वस्तूंची लूट सुरू केली तर दुसरीकडे कांगोच्या लोकांचं शोषण सुरू झालं. निर्धारित उद्दिष्टापैकी कमी रबर मिळवणाऱ्या मजूरांचे हात-पाय तोडले जाऊ लागले. कधीकधी तर गावच्या गावं उद्ध्वस्त करण्यात आली."
किंशासामधले बीबीसी प्रतिनिधी मार्क डमेट यांनी 2004मध्ये एका रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, "लियोपॉल्ड राजानं आपल्या ELCचं रुपांतर मोठ्या लेबर कॅम्पमध्ये केलं. इथून रबर मिळवून त्यांनी गडगंज संपत्ती जमा केली. पण, ते करताना इथं जवळपास 1 कोटी नागरिकांचा त्यांनी जीव घेतला."

फोटो स्रोत, Getty Images
एक कोटीच्या आकड्यावर वादविवाद होऊ शकतो, पण पण लियोपॉल्डच्या काळात झालेला हिंसाचार कुणीच नाकारू शकत नाही.
जंगलांची तोड
जगभरात आज रबराचं जितकं उत्पादन होत आहे, त्यापैकी अर्ध्याहून अधिक रबर सिंथेटिक पदार्थांपासून तयार केलं जातं.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान सिंथेटिक रबराचा विकास करण्यात आला. हे रबर स्वस्त होतं आणि पारंपरिक रबरांपेक्षा चांगलंही होतं.
उदाहरणार्थ सायकलच्या टायरमध्ये वापरण्यात येणारं सिंथेटिक रबर अधिक चांगलं समजलं जातं.
पण, असे काही उद्योग असतात ज्यांच्यासाठी हेविया ब्रासीलिएंसिस झाडापासून निघणारं रबर अनिवार्य असतं.
या झाडांपासून तयार होणाऱ्या तीन-चतुर्थांश रबरांचा भाग अवघड वाहनांचे टायर बनवण्यासाठी वापरण्यात येतो.

फोटो स्रोत, Getty Images
जितकं जास्त आपण कार, ट्रक आणि विमानांचा वापर करू, तितक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला रबराची गरज लागेल. पण, रबराचा पुरवठा कोणत्याही वादाशिवाय शक्य नाही.
2015 मध्ये युनिवर्सिटी ऑफ ईस्ट एंगलियाच्या पर्यावरण विभागानं एक अभ्यास केला होता.
या अभ्यासाचे प्रमुख एलियानोर वॉरेन थॉमस यांचं म्हणणं होतं, रबर टायरांची मागणी जसजशी वाढत जाईल, तसतसं दक्षिण-पूर्व आशियातील जंगलांची तोड वाढत जाईल.
त्यांनी बीबीसीला सांगितलं होतं, "2024पर्यंत रबराचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी 43 ते 80 लाख हेक्टर जमिनीवर नवीन वृक्ष लागवड करावी लागेल. यामुळे आशियातील जंगलांची तोड वाढायची धोका आहे. वन्यप्राण्यांवरही त्याचा परिणाम होईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









