कोरोना व्हायरस : कठोर लॉकडाऊन नसतानाही जपानमध्ये मृत्यूदर कमी कसा?

    • Author, रुपर्ट विंगफिल्ड-हेज
    • Role, बीबीसी न्यूज, टोकियो

जपानमध्ये कोव्हिड-19 मुळे अधिक लोकांचा मृत्यू का नाही झाला? या एका प्रश्नानं डझनभर तर्क, कहाण्या आणि थिअरींना जन्म दिला आहे. याची कारणं कोणी जपानी लोकांच्या शिष्टाचारात शोधतायत तर कोणी म्हणतंय की जपानी लोकांची प्रतिकारशक्ती इतरांच्या तुलनेत वरचढ आहे.

जपानमध्ये जगातला सगळ्यांत कमी मृत्यूदर नाहीये. या भागातल्या दक्षिण कोरिया, तैवान, हाँगकाँग आणि व्हिएतनाम या देशांचा कोव्हिड-19 चा मृत्यूदर जपानपेक्षाही कमी आहे. पण जपानमध्ये सरासरीपेक्षा कमी मृत्यू होत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे जपानने कोव्हिड-19च्या विरोधात लढा देण्यासाठी इतर देशांसारखी आक्रमक पावलंही उचलली नाहीत तरीही इथला मृत्यूदर कमी आहे.

जपानमध्ये नक्की काय घडलं?

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा चीनमधल्या वुहानमध्ये कोव्हिड-19ची भयानक साथ पसरली होती आणि जगभरातल्या देशांनी चीनमधून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली होती तेव्हा जपानने मात्र आपल्या सीमा बंद केल्या नव्हत्या.

जसाजसा कोरोना व्हायरसचा प्रसार वाढला तेव्हा हे समोर आलं की, हा व्हायरस वृद्ध लोकांसाठी अधिक धोकादायक आहे. जिथे गर्दी जास्त असेल तिथे हा व्हायरस वेगाने पसरतो हेही समोर आलं. जपानमध्ये जगातल्या कोणत्याही देशापेक्षा लोकसंख्येच्या तुलनेत वृद्धांची असणारी सरासरी जास्त आहे. जपानच्या मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येची घनताही जास्त आहे.

ग्रेटर टोकियोची लोकसंख्या तब्बल 3 कोटी70 लाख आहे. या यातले बहुतांश लोक येण्याजाण्यासाठी शहरातल्या खचाखच गर्दीने भरलेल्या ट्रेन्सवर अवलंबून आहेत. कोरोना व्हायरस हातपाय पसरायला लागला तेव्हाच WHO ने टेस्ट, टेस्ट, टेस्ट हा मंत्र दिला होता. पण तरीही जपानने मात्र WHOच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. आताही जपानमधल्या एकूण PCR टेस्टची संख्या 3,48,000 आहे म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 0.27 टक्के आहे.

जपानने युरोपियन देशांसारखा कडक लॉकडाऊनही जाहीर केला नाही. एप्रिलच्या सुरुवातीला सरकारने आरोग्य आणीबाणी घोषित केली खरी पण घरीच राहण्याचा निर्णय ऐच्छिक होता. अत्यावश्यक नसलेले उद्योगधंदे बंद ठेवावे असं सरकारने म्हटलं होतं पण बंद न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार नव्हती.

जिथे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला अशा न्यूझीलंड, व्हिएतनामसारख्या देशांनी कडक निर्बंध लादले होते. देशांच्या सीमा बंद करणं, कडक लॉकडाऊन करणं, मोठ्या प्रमाणावर टेस्ट करणं आणि क्वारंटाईनची कठोर अंमलबजावणी करणं अशी पावलं या देशांनी उचलली. पण जपानने यापैकी काहीही केलं नाही.

तरीही,कोव्हिड-19चा पहिला पेशंट सापडल्यानंतर पाच महिन्यांनी,जपानमध्ये 20 हजारापेक्षा कमी कन्फर्म केसेस आहेत तर एक हजारापेक्षा कमी मृत्यू झालेले आहेच. आणिबाणी मागे घेतली गेलीये आणि जनजीवन वेगाने रुळावर येतंय.

जपानने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्याच ठेवल्याचे शास्त्रीय पुरावेही समोर येत आहेत. निदान आत्तापर्यंत तरी जपानमधला प्रादुर्भाव आटोक्यात आहे.

जपानमधला टेलिकॉम क्षेत्रातली कंपनी सॉफ्टबँकने आपल्या 40 हजार कर्मचाऱ्यांवर अँटिबॉडी टेस्टिंग केलं ज्यातून लक्षात आलं की, यापैकी फक्त 0.24 टक्के लोक व्हायरसच्या सान्निध्यात आले होते. टोकियोत 8000 लोकांचं रँडम टेस्टिंग केलं ज्यातून लक्षात आलं की, फारच थोडे लोक व्हायरसच्या सान्निध्यात आले होते. यातले फक्त 0.1 टक्के लोक पॉझिटिव्ह निघाले.

जपानमधली आणीबाणी मागे घेताना पंतप्रधान शिझो आबे यांनी अभिमानाने 'जपान मॉडेल'बद्दल सांगितलं. इतर देशांनी जपानकडून शिकलं पाहिजे असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता.

जपानमध्ये असं काही खास आहे का?

जपानचे उपपंतप्रधान तारो असो यांच्या मते जपानी लोक 'इतरांपेक्षा वरचढ' आहेत. एका अहमंन्य वाटू शकणाऱ्या वक्तव्यात त्यांनी म्हटलं, "मला इतर देशांच्या प्रमुखांनी विचारलं की, तुम्ही असं काय वेगळं केलं की ज्यामुळे जपानमध्ये कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला? मी म्हणालो तुमच्या आणि आमच्या लोकांच्या मिंडोमध्ये (लोकांची पातळी) फरक आहे."

मिंडोचा शब्दशः अर्थ होतो लोकांची पातळी. पण काही जण याचा अर्थ सांस्कृतिक पातळी असाही लावतात. मिंडोची संकल्पना जपानमध्ये फार जुनी आहे. जपानी लोक इतर लोकांपेक्षा वरचढ आहेत, त्यांची लायकी इतर लोकांपेक्षा चांगली आहे असा अर्थ यातून ध्वनित होतो. या वक्तव्यावरून आता तारो असो यांच्यावर टीकाही होत आहे.

पण तरीही अनेक जपानी लोकांना आणि काही संशोधकांनाही असं वाटतंय की जपानमध्ये काहीतरी खास आहे. कुठलातरी'X' फॅक्टर आहे जो जपानी लोकांना कोव्हिड-19च्या संकटापासून वाचवतो आहे.

जपानी लोकांमध्ये खरंच विशेष रोगप्रतिकारक शक्ती आहे?

टोकियो विद्यापीठातले प्राध्यापक तात्सुहिको कोडामा जपानी कोव्हिड-19च्या पेशंट्सनी व्हायरसचा कसा प्रतिकार केला यावर अभ्यास करत आहेत.त्यांच्यामते जपानी लोकांना याआधी कोव्हिडचा संसर्ग होऊन गेलाय. म्हणजे कोव्हिड-19 चा नसेल पण या गटातल्या व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळेच या लोकांमध्ये या रोगाविरूद्ध आधीपासूनच प्रतिकारशक्ती आहे.

"मानवी शरीरात व्हायरस शिरला की, शरीर आपोआप अँटीबॉडीज तयार करतं.मी जेव्हा माझ्या पेशंट्सचे टेस्ट रिझल्ट पाहिले तेव्हा मला धक्का बसला. सगळ्या पेशंट्सच्या शरीरात एका विशिष्ट प्रकारच्या अँटिबॉडीज होत्या ज्यावरून हे लक्षात येत होतं की त्यांना या स्वरूपाच्या व्हायरसचा संसर्ग आधी होऊन गेलेला आहे," कोडामा म्हणतात.

पण सगळ्यांनाच प्रा कोडामांची मतं पटलेली नाहीयेत.

"जर अशा प्रकारचा व्हायरस आधी आशिया खंडात येऊन गेला होता तर तो फक्त या देशांपुरताच कसा काय मर्यादित राहिला?"असा प्रश्न किंग्स कॉलेजच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक प्रा केंजी शिबुया विचारतात.

जगातल्या वेगवेगळ्या भागात राहाणाऱ्या लोकांची इम्युनिटी वेगळी असू शकते किंवा काही लोकांच्या जीन्समुळे त्यांना कोव्हिड-19चा धोका अधिक असू शकतो ही शक्यता शिबुया मान्य करतात पण जपानी लोकांमध्ये काही 'X' फॅक्टर असेल ही शक्यता ते फेटाळून लावतात.

त्यांच्या मते ज्या देशांनी कोरोना व्हायरसला आटोक्यात ठेवलं त्या देशांमध्ये एकच सारखी गोष्ट आहे,संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत कडक निर्बंध लादणं.

जपानी लोकांमध्ये मास्क घालण्याची पद्धत 1919 च्या स्पॅनिश फ्लुच्या जागतिक साथीपासूनच आहे. आजही(कोरोनाच्या आधीही) कोणाला सर्दी झाली तर इतरांना त्रास होऊ नये म्हणून मास्क घालतात.

"मास्कमुळे अनेक गोष्टींपासून बचाव होतो,पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे काहीतरी काळजी घेण्यासारखं कारण आपल्या आसपास आहे याची लोकांना आठवण राहाते," फ्लू स्पेशालिस्ट आणि हाँगकाँगच्या सार्वजनिक आरोग्य कॉलेजचे संचालक केंजी फुकुदा सांगतात.

जपानच्या ट्रॅक आणि ट्रेस व्यवस्थेलाही70 वर्षांचा इतिहास आहे. 1950 साली आलेल्या टीबीच्या लाटेत तिथल्या सरकारने संपूर्ण देशात सार्वजनिक आरोग्य केंद्रं उभारली. या केंद्रांचं मुख्य काम नवीन केसेस शोधणं आणि त्यांची माहिती सरकारला देणं हा होता. ह्युमन कॉन्टॅट ट्रेसिंग आणि आयलोलेशनचं एका विशेष टीमकडून केलं जायचं.

तीन C लवकर शोधले

तज्ज्ञांचं मत आहे की जपानने तीन C - बंद जागा (क्लोज्ड स्पेसेस),गर्दीच्या जागा (क्राऊडेड स्पेसेस) आणि क्लोज कॉन्टॅक्ट स्पेसेस(जिथे लोकांचा जवळून संबंध येतो तशा जागा) -लवकर ओळखले आणि त्यावर बंधन आणली.

क्योटो विद्यापीठातले मेडिकल रिसर्चर डॉ काझुआकी जिंदाई म्हणतात की, देशातले एक तृतीयांश संसर्ग अशा जागांमध्ये उद्भवले.

"तीन C शोधण्याच्या कामासाठी नियुक्त केलेल्या टीम्सने जिथे लोक एकमेकांच्या खूप जवळ श्वासोच्छास करतात, म्हणजे क्लब्स, कॅरिओकी,जिममध्ये एकत्र व्यायम करणे अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. सरकारने अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये म्हणून देशव्यापी मोहीम चालवली. लोकांना फक्त घरी बसा सांगण्याऐवजी कुठे जाऊ नका हे सांगितल्याने खूप फरक पडला," जिंदाई नमूद करतात.

ऑफिसेस आणि कामाच्या ठिकाणांना तीन C च्या नियमातून सूट दिलेली असली तरी या मोहिमेमुळे संसर्गाचा दर कमी होईल, परिणामी मृत्यूचा दर कमी होईल आणि लॉकडाऊन लागू करावा लागणार नाही अशी शासनाला आशा होती. सुरुवातीला असं झालंही. पण मार्चच्या मध्यात टोकियोमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला. आता या शहराचीही अवस्था मिलान,लंडन,न्यूयॉर्कसारखी होणार असं वाटलं होतं.पण तसं झालं नाही.असं कशामुळे झालं असावं?काही म्हणतात या क्षणी जपान एकदम हुशार ठरलं,तर काही म्हणतात जपानला नशिबानेच वाचवलं. नेमकं काय, कुणालाही माहीत नाही.

वेळेचं महत्त्व

प्रा शिबुया यांच्या मते जपानच्या यशाचं रहस्य, इतर यशस्वी देशांसारखंच, वेळेवर पावलं उचलण्यात आहे. पंतप्रधान शिंझो आबे यांनी 7एप्रिलला देशात आणिबाणी जाहीर केली आणि नागरिकांना घरातच थांबायची विनंती केली.अर्थात घरात थांबण्याचा निर्णय ऐच्छिक होता.

"हे निर्णय घ्यायला उशीर केला असता तर जपानमध्येही मृत्यूदर वाढला असता.कोलंबिया विद्यापीठाच्या एका ताज्या अभ्यासानुसार न्यूयॉर्कमध्ये जर दोन आठवडे आधी लॉकडाऊन लागू केला असता तर हजारो लोकांचे प्राण वाचले असते," शिबुया म्हणतात.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं समोर आलंय की, ज्यांना लठ्ठपणा, हृदयरोग, डायबेटिस असे त्रास असतात त्यांना जर कोव्हिड-19 चा संसर्ग झाला तर अशांना दवाखान्यात अॅडमिट व्हावं लागण्याची शक्यता सहापट जास्त असते तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता 12 पट जास्त असते.

जपानमध्ये विकसित देशांपैकी स्थूलता आणि हृदयविकाराचं प्रमाण सगळ्यांत कमी आहे.

"अशा प्रकारच्या शारीरिक फरकांचा काही अंशी फायदा होत असेल पण इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोव्हिडकडून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकलो ते म्हणजे प्रत्येक गोष्टीवर साधं सोपं उत्तर नसतं," प्रा फुकुदा म्हणतात.

सरकारने सांगितलं,लोकांनी ऐकलं

मग प्रश्न उरतोच की ज्या 'जपानी मॉडेलचं'पंतप्रधान शिंझो आबे यांनी कौतुक केलं ते नक्की आहे तरी काय?

जपानने संपूर्ण देशात लॉकडाऊन न लावता कोरोना व्हायरसचा संक्रमण तसंच मृत्यूदर आटोक्यात ठेवला,मग यातून इतर देशांनी काय शिकण्यासारखं आहे? तिथल्या लोकांनी सरकारचं ऐकलं हे.

आणिबाणी जाहीर केली तरी जपानमध्ये लोकांनी घरीच थांबावं अशी सक्ती करण्यात आली नव्हती. तरीही लोक थांबले. सरकारने सांगितलं,त्यांनी ऐकलं.

"तुम्हाला संक्रमण थांबवायचं असेल तर संसर्ग झालेल्या व्यक्ती आणि संसर्ग न झालेल्या व्यक्ती यांचा एकमेकांशी संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.त्यासाठी तुम्हाला लोकांचंच सहकार्य लागतं. हेच जपानमध्ये घडलं. हे तुम्हाला इतर देशात नाही दिसणार," फुकुदा नमूद करतात.

जपानने लोकांना काळजी घ्यायला सांगितलं,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असं सांगितलं,मास्क घालायला सांगितलं,आणि सतत हात धुवायला सांगितलं...पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जवळपास सगळ्यांच नागरिकांनी सरकारचं ऐकलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)