रेड पांडाला वाचवण्यासाठी सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवलं जाणार

नेपाळमधील रेड पांडा नामशेष होण्याची कारणं शोधण्यासाठी आता त्यांच्यावर उपग्रहावरुन लक्ष ठेवण्यात येत आहे.

पूर्व हिमालय आणि नैऋत्य चीनमध्ये आढळणारी ही प्रजाती धोकादायक स्थिती असून त्यांची संख्या काही हजार इतकीच उरली आहे.

कांचनगंगा हिमशिखराच्या परिसरामध्ये दहा रेड पांडांना जीपीएस कॉलर लावण्यात आलेली आहे. त्याद्वारे त्यांच्या हालचाली टिपता येतील. या जीपीएसद्वारे रेड पांडांची भरपूर माहिती गोळा केली जात आहे.

कॅमेरा ट्रॅप आणि जीपीएस कॉलरद्वारे यांचे निरीक्षण केले जात आहे. यामध्ये सहा माद्या आणि चार नर रेड पांडांचा समावेश आहे. या प्रकल्पामध्ये शास्त्रज्ञ, प्राण्यांचे डॉक्टर, नेपाळ सरकारमधील अधिकारी आणि रेड पांडा नेटवर्क या ग्रुपमधील संशोधक सहभागी झाले आहेत.

नेपाळमधील वन आणि मृदा खात्याचे महासंचालक मान बहादुर खड्का यांच्यामते जीपीएस कॉलर हा रेड पांडा संवर्धनाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे.

पारु, डोल्मा, चिंतापू, माच्छा, भुमो, सेनेहांग, गिमा, ब्रायन, निनाम्मा, प्रलादेवीय या रेड पांडांना कॉलर लावण्यात आली आहे. पूर्वी रेड पांडा (Aliurus fulgens) रॅकूनचे नातेवाईक समजले जात. मात्र नंतर ते अस्वलाचे नातलग असल्याचं लक्षात आलं.

आता त्याचं स्वतःचा वेगळा परिवार असल्याचं लक्षात आलं आहे. जगभरात नष्ट होत चाललेल्या प्रजातींमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांना खायला बांबू आणि राहायला जंगल लागतं. तेच कमी होत असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यांना वाचवण्यासाठी या नव्या पद्धतीचा उपयोग होईल असं संशोधकांना वाटतं.

रेड पांडाबद्दल

1) अस्वलासारखे दिसतात. मात्र त्यांचं Ailurinae हे वेगळंच कुटुंब आहे.

2) अधिवास कमी होणे, शिकार, प्रजोत्पादन कमी यामुळे संख्या घटत चालली आहे.

3) त्यांच्या त्वचेपासून टोप्या तयार करणं आणि त्यांची शेपटी बाळगणं शुभ समजलं जात असल्यामुळे चीनमध्ये त्यांची मोठी शिकार होते.

4) झाडांवर राहाणारे हे रेड पांडा बांबू खातात. फांद्या पकडण्यासाठी त्यांच्या पंज्यांची विशिष्ट रचना असते.

5) जायंट पांडाशी हे संबंधित नाहीत.

6) ज्या देशांमध्ये शिकार अनधिकृत समजली जाते अशा सर्व देशांत ते संरक्षित म्हणून घोषित केले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)