अफगाणिस्तान हल्ला : मुलाच्या प्रसुतीनंतर किंकाळीचा आवाज येत होता आणि अचानक स्फोट आणि गोळीबार सुरू झाला

अफगाणिस्तानात मंगळवारी (12 मे) काबुलमधल्या दश्त-ए-बारची हॉस्पिटलमधल्या मॅटर्निटी वॉर्डवर अतिरेकी हल्ला झाला. या हल्लयात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 24 झाली आहे.

मृतांमध्ये हॉस्पिटलच्या नर्सेससोबतच नवजात बाळं आणि त्यांच्या मातांचाही समावेश आहे. 19 बाळांवर आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. पण यातल्या अनेकांची आई या अतिरेकी हल्ल्यात दगावलेली आहे.

मॅटर्निटी हॉस्पिटलवर झालेल्या या हल्लाचा जगभरातून निषेध करण्यात येतोय. कोणत्याही अतिरेकी संघटनेने अजून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

बीबीसी अफगाणच्या संपादक मीना बख्ताश या गेली अनेक वर्षं अफगाणिस्तानातल्या परिस्थितीचं वार्तांकन करत आहेत.

मॅटर्निटी हॉस्पिटलवर झालेल्या या हल्ल्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "मी अफगाण आहे. गेली अनेक वर्षं युद्धाचं वार्तांकन करतेय. हा हल्ला अतिशय धक्कादायक होता."

अफगाणिस्तानात आतापर्यंत वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये हजारो लोक मारले गेले आहेत. यापैकी बहुतेक सामान्य नागरिक होते. पण या आठवड्यामध्ये या हल्ल्यांनी खालची पातळी गाठली.

मीना बख्ताश आणि त्यांच्या लंडन तसंच काबुलमधल्या सहकाऱ्यांनी या हल्ल्याचं वार्तांकन केलं. ज्या मॅटर्निटी हॉस्पिटलवर हल्ला झाला तिथली दृश्यं हृदयद्रावक होती.

"यामध्ये एका सैनिकाचा फोटो आहे, तो पाहून मला समुद्र किनाऱ्यावर वाहत आलेल्या त्या रेफ्युजी लहान मुलाची (अलान कुर्दी) ची आठवण झाली," त्या सांगतात.

"मी पाहिलेल्या दृश्यांमध्ये एक सैनिक आहे, हातात बाळ घेऊन अॅम्ब्युलन्सच्या दिशेने चाललाय...

'याबद्दल बोलणं सोपं नाही'

मंगळवारी सकाळी 10 वाजता या हल्ल्याला सुरुवात झाली. दोन स्फोट झाले आणि त्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाल्याचं घटनास्थळाजवळ असणाऱ्या लोकांनी सांगितलं.

बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला तेव्हा या हॉस्पिटलमध्ये 140 जण होते असं या हल्ल्याच्या वेळी स्वतःचा बचाव करणाऱ्या एका डॉक्टरने बीबीसीला सांगितलं.

अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सेसनी 100 महिला आणि मुलांची सुटका केल्याचं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्यांच्या वेशातल्या 3 हल्लेखोरांनी या हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवला. हॉस्पिटलमध्ये अनेक तास चाललेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी या हल्लेखोरांना ठार केलं.

"प्रसुतीगृहावर हल्ला करून माता आणि नवजात बाळांना मारणाऱ्या लोकांच्या मनात काय असतं, माहीत नाही. मला समजतच नाही. भयंकर आहे हे," बख्ताश सांगतात.

या मॅटर्निटी हॉस्पिटलवर हल्ल्याची बातमी आल्यानंतर काहीच वेळात आणखी एका हल्ल्याची बातमी आली. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नानगरहर भागामध्ये आत्मघातकी बॉम्बरने केलेल्या हल्ल्यात 32 जण मारले गेले.

या हल्ल्यामागे आपला हात असल्याचं इस्लामिक स्टेट (IS) ने म्हटलंय. एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झालेली असताना हा हल्ला झाला.

"मशिदीत जमलेली कुमारवयीन,तरूण मुलं मारली गेली," बख्ताश सांगतात.

का सुरु आहे हा हिंसाचार?

"अचानक सगळ्या देशभरात रक्तपात होतोय. हा काळ सगळ्यांसाठीच कठीण आहे हे माहितेय मला. पण कालचा दिवस अगदीच वेदनादायक होता."

अमेरिका आणि तालिबानदरम्यान फेब्रुवारीमध्ये करारावर सह्या झाल्यानंतर अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्यात आलं. यानंतर अफगाणिस्तानासाठीच्या आशांमध्ये वाढ झाली होती.

पण अफगाण सरकार आणि तालिबानमधली चर्चा कैद्यांच्या मुद्द्यांवरून फिस्कटली आणि हिंसाचार सुरूच राहिला.

देशात शांतता प्रस्थापित होण्याच्या आशा फारशा नव्हत्याच. पण मंगळवारच्या हल्ल्यांनी हे आणखीन स्पष्ट झालं.

"आपण लोकांना हा हल्ला विसरू देता कामा नये. याकडे लक्ष वेधून घ्यायला हवं. मॅटर्निटी हॉस्पिटलवर हल्ला करणं, नवमाता, नर्सेस आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळांना ठार मारणं... हे सहन करण्याजोगं नाही," बख्ताश म्हणतात.

"काबुलमधली लोकं आता घायकुतीला आलेली आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर हे जाणवतं. कारण हे सत्र संपतच नाहीये.

"लोकं मरतायत. तरूण मारले जात आहेत. आया आपल्या लेकरांना गमवत आहेत...अगदी नुकत्याच जन्मलेल्या तान्हया बाळांनाही."

तालिबानविरुद्ध कारवाईचे आदेश

दश्त - ए - बारची हॉस्पिटलवरच्या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं तालिबानने म्हटलंय. पण हिंसाचार कमी करण्यासाठीच्या आवाहनांकडे दहशतवादी दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी तालिबानच्या विरुद्ध आक्रमक कारवाईचे आदेश दिले आहेत.

मीन बख्ताश यांच्यावर त्यांच्या पत्रकारांच्या टीमची जबाबदारी आहे. अनेकदा त्यांचे सहकारी घरापासून आणि मित्रांपासून दूर, धोकादायक परिस्थिती काम करत असतात.

आता त्यांना हिंसाचारासोबतच कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीचाही धोका आहे.

"मी टीममधल्या प्रत्येकाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ते ही परिस्थिती कशी हाताळत आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करते."

आधीच कठीण परिस्थितीचा मुकाबला करणाऱ्या अनेक अफगाण नागरिकांच्या अडचणीत आणि काळजीत कोरोना व्हायरसच्या साथीने भर घातलीय.

साथीचा उद्रेक होण्यापूर्वी अफगाणिस्तान लोकांना मोबादला देणारं काम मिळवणं कठीण जात होतं.

"अफगाणिस्तान हा जगातल्या सर्वांत असुरक्षित देशांपैकी एक आहे. इथे गरीबी आहे आणि त्याबद्दलची योग्य आकडेवारी उपलब्ध नाही," बख्ताश म्हणतात.

मंगळवारच्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानात अनेक लोक मारले गेले.

उत्तरेकडच्या बल्ख प्रांतात अमेरिकन सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 10 जण मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

बळी पडलेल्यांमध्ये सामान्य नागरिक होते असं स्थानिकांचं आणि तालिबानचं म्हणणं आहे. पण हे सगळे अतिरेकी होते असं अफगाणच्या संरक्षण विभागाने म्हटलंय.

"मंगळवारची स्थानिक माध्यमांची बातमीपत्रं त्रासदायक होती. बातम्यांची सुरुवात हॉस्पिटल हल्ल्यांनी झाली, त्यानंतर देशाच्या पूर्वेला झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची बातमी. आणि यानंतर मग बातमी होती उत्तरेत झालेल्या हवाई हल्ल्याची." मीन बख्ताश म्हणतात.

"हा एकच मुद्दा नाही. तुम्ही जेव्हा अफगाणिस्तानाचं वार्तांकन करता, तेव्हा त्यात 'पॉझिटिव्ह स्टोरी' - सकारात्मक अशी कोणतीच बातमी नसते. असं वाटतं की कान आणि डोळे बंद करून या बातम्यांपासून दूर जावं.

"पण पत्रकारांना असं करता येत नाही. त्यांना या बातम्या सांगाव्याच लागतात."

नेमक काय घडलं?

काबुलमधल्या या हॉस्पिटलमधला मॅटर्निटी वॉर्ड MSF - मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्स या आंतरराष्ट्रीय चॅरिटी संस्थेतर्फे चालवण्यात येतो. काही परदेशी व्यक्तीही इथे काम करतात.

हल्ला सुरू झाल्याबरोबर इथे घबराट उडाल्याचं एका डॉक्टरने AFP वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

हा हल्ला होताना पाहणाऱ्या रमजान अली या विक्रेत्याने रॉयर्टस वृत्त संस्थेला सांगितलं, "हल्लेखोर कोणत्याही कारणाशिवाय हॉस्पिटलमधल्या कोणावरही गोळीबार करत होते."

हा हल्ला सुरू असतानाच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याचं MSF ने सांगितल्याचं AFP वृत्तसंस्थेने म्हटलंय.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार झैनाब नावाच्या आणखी एका महिलेची हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच प्रसुती झाली होती. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर झालेल्या या बाळाचं तिने नाव ठेवलं - ओमिद (Omid - दारी भाषेत - आशा)

हल्ला झाला तेव्हा झैनाब बाथरूममध्ये होत्या. गोंधळ ऐकून त्या बाहेर बाळाकडे आल्या; पण तोपर्यंत त्यांचं चार तासांचं बाळ आणि सात वर्षांच्या आशा मालवल्या होत्या.

"प्रसुतीदरम्यान बाळ गमावू नये म्हणून मी माझ्या सुनेला काबुलला घेऊन आले. आता आम्ही या बाळाचा मृतदेह घेऊन बामियानला परत जाऊ," अतीव दुःखाने झैनाबच्या सासू - जाहरा मुहम्मदी यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)