कोरोना व्हायरसः स्पॅनिश फ्लूच्या साथीतून आपण काही शिकलो का?

    • Author, फर्नांडो दुआर्ते
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1918 ते 1920च्या काळात सगळ्या जगात एक फ्लू पसरला. जगातल्या एक तृतीयांश लोकसंख्येला या फ्लूचा संसर्ग झाला. या फ्लूची साथ संपली तेव्हा या तापामुळे 2 ते 5 कोटी लोकांचा बळी गेल्याचं स्पष्ट झालं. या भीषण साथीतून बाहेर पडणारं जग कसं होतं? कोरोना व्हायरस नंतरचं जग कसं असेल, याची काही झलक यामध्ये होती का?

कदाचित स्पॅनिश फ्लूच्या भयंकर साथीविषयी तुम्ही यापूर्वी ऐकलं नसेल. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे जो हाहाःकार उडालाय त्यामुळे कदाचित या स्पॅनिश फ्लूविषयी तुम्हाला जाणून घ्यावंस वाटेल.

या फ्लूला अनेकदा 'मदर ऑफ ऑल पँडेमिक्स' म्हणजे सगळ्यात मोठा साथीचा रोग असं म्हटलं जातं. फक्त दोन वर्षांच्या काळात (1918-1920) 2 ते 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

त्यावेळी जगाची लोकसंख्या सुमारे 1.8 अब्ज होती आणि त्यातल्या 33% लोकांना या फ्लूचा संसर्ग झाला होता असं संशोधक आणि इतिहासकारांचं म्हणणं आहे.

पहिलं महायुद्ध तेव्हा नुकतंच संपलं होतं. पण या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या तेव्हा महायुद्धात मारल्या गेलेल्या लोकांपेक्षाही जास्त होती.

सध्या जग कोव्हिड 19 च्या संकटाला सामोरं जात असताना इतिहासाकडे मागे वळून पाहूयात. त्यावेळी जगात काय परिस्थिती होती आणि या साथीनंतर जगात काय काय बदललं होतं?

1921 मधलं बदललेलं जग

गेल्या 100 वर्षांमध्ये जगात नक्कीच खूप काही बदललंय.

कोणत्याही रोगाचा सामना करण्यासाठी आज औषधं आहेत, विज्ञानाची साथ आहे. पण त्याकाळी हे सगळं मर्यादित होतं.

सूक्ष्म जंतूंमुळे स्पॅनिश फ्लू होत असल्याचं डॉक्टर्सना समजलं होतं. हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो हे देखील डॉक्टर्सना समजलं होतं. पण ही साथ एका व्हायरसमुळे निर्माण झाली नसून एका बॅक्टेरियामुळे उद्भवल्याचं मानलं जात होतं.

यासाठीचे उपचारदेखील तेव्हा मर्यादित होते. जगातल्या पहिल्या अँटीबायोटिकचा शोध 1928 मध्ये लागला.

तर पहिलं फ्लू व्हॅक्सिन म्हणजेच फ्लूची लस उपलब्ध झाली 1940मध्ये. सगळ्यांवर उपचार करता येईल इतकी मोठी व्यवस्था तेव्हा उपलब्ध नव्हती. अगदी श्रीमंत देशांमध्येही 'पब्लिक सॅनिटेशन' ही चैनीची गोष्ट होती.

विज्ञान लेखिका आणि 'पेल रायडर : द स्पॅनिश फ्लू ऑफ 1918 अँड हाऊ इट चेंज्ड द वर्ल्ड'च्या लेखिका लॉरा स्पिनी सांगतात, "औद्योगिक देशांमध्ये बहुतेक डॉक्टर्स एकतर स्वतःसाठी काम करत किंवा मग त्यांना चॅरिटी वा धार्मिक संस्थानांकडून पैसा मिळत असे. बहुतेक लोकांना उपचार घेणं परवडत नसे."

तरूण आणि गरीब पडले बळी

स्पॅनिश फ्लूचा प्रसार झपाट्याने झाला. पूर्वी कोणत्याही साथीबाबत असं घडलं नव्हतं. उदाहरणार्थ, यापूर्वी 1889 - 90मध्ये पसरलेल्या साथीमध्ये जगभरात 10 लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले होते. पण या साथीचा फैलाव स्पॅनिश फ्लूसारखा नव्हता.

स्पॅनिश फ्लूमुळे मरणाऱ्यांमध्ये बहुतेक जण 20 ते 40 वयोगटातले होते. सोबतच पुरुषांवर याचा जास्त परिणाम झाला होता. पश्चिमेतल्या देशांच्या लष्करी तळांमध्ये या रोगाची सुरुवात झाली आणि पहिल्या महायुद्धानंतर परतणाऱ्या सैनिकांसोबत ही साथ पसरली, असं मानलं जातं.

या जागतिक साथीचा फटका गरीब देशांना जास्त बसला.

हार्वर्ड विद्यापीठातले संशोधक फ्रँक बॅरो यांनी 2020मध्ये एक संशोधन केलं. यानुसार अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 0.5% लोक या आजारामुळे त्यावेळी मारले गेले. ही संख्या जवळपास 5,50,000 होते.

तर दुसरीकडे भारतामध्ये तेव्हाच्या लोकसंख्येच्या 5.2% म्हणजेच सुमारे 1.7 कोटी लोकांचा बळी गेला.

'पँडेमिक 1918' या पुस्तकाच्या लेखिका कॅथरीन आर्नल्ड सांगतात, "पहिलं महायुद्ध आणि स्पॅनिश फ्लूमुळे आर्थिक संकट निर्माण झालं होतं."

आर्नल्ड यांचे आजी-आजोबा या साथीला बळी पडले होते.

त्या म्हणतात, "अनेक देशांमध्ये घराची जबाबदारी पेलणारा, शेती करणारा, व्यापार करणारा कोणी तरूणच उरला नाही. लाखो तरूण मारले गेले होते. योग्य लोकांच्या अभावामुळे एकट्या राहिलेल्या बायकांसाठी समस्या निर्माण झाली. लाखो महिलांना कोणीही साथीदार नव्हता."

महिलांवर पडली जबाबदारी

स्पॅनिश फ्लूच्या साथीमुळे फार मोठा सामाजिक बदल झाला नाही. याआधी 14व्या शतकात ब्लॅक प्लेगमुळे सरंजामशाही संपुष्टात आली होती आणि यानंतर एक मोठा सामाजिक बदल पहायला मिळाला होता.

पण स्पॅनिश फ्लूमुळे अनेक देशांमधलं लिंग गुणोत्तर ढासळलं. 'टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी'मधल्या संशोधक क्रिस्टीन ब्लॅकबर्न म्हणतात की अमेरिकेत मजुरांची कमतरता निर्माण झाल्याने महिलांना काम करणं भाग झालं.

त्या सांगतात, "फ्लू आणि पहिल्या महायुद्धामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी महिलांचा काम करायचा मार्ग मोकळा झाला. 1920 पर्यंत देशातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांपैकी महिलांचं प्रमाण वाढून 21 टक्क्यांपर्यंत पोहोचलं होतं."

त्याचवर्षी अमेरिकन काँग्रेसने देशाच्या घटनेत 19वा बदल केला आणि याद्वारे अमेरिकन महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.

ब्लॅकबर्न म्हणतात, "असे अनेक दाखले आहेत, ज्यावरून हे दिसून येतं की 1918च्या फ्लू मुळे अनेक देशांमध्ये महिलांच्या हक्कांवर परिणाम झाला."

शिवाय मजुरांचा तुटवडा असल्याने या कामगारांना पगारवाढही मिळाली.

अमेरिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार 1915मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पगार होता ताशी 21 सेंट. 1920मध्ये हा दर वाढून ताशी 56 सेंट्स झाला.

स्पॅनिश फ्लूच्या दरम्यान जन्माला आलेल्या मुलांविषयीही संशोधन करण्यात आलं. या साथीच्या आधी जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत साथीदरम्यान जन्मलेल्या मुलांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असल्याचं यामध्ये आढळलं.

मुलांवरही झाला परिणाम

1918-19च्या दरम्यान जन्मलेल्या मुलांनी औपचारिकपणे नोकरी करणं वा कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची शक्यता कमी होती असं युके आणि ब्राझीलमधल्या अभ्यासात आढळलं.

एक अभ्यास असंही म्हणतो की या साथीच्या दरम्यान या महिलांना सहन कराव्या लागलेल्या तणावाचा परिणाम त्यांच्या गर्भाच्या विकासावर झाला.

1915 ते 1922 या काळात अमेरिकेत जन्मलेल्या लोकांच्या लष्करात दाखल होण्याच्या आकडेवारीवरुन असं लक्षात आलं की या लोकांची उंची इतरांच्या तुलनेत 1मिलीमीटर कमी होती.

वसाहतवादाचा विरोध

1918 पर्यंत भारत ब्रिटीश वसाहत झाल्याला जवळपास शतक उलटलं होतं. त्याचवर्षी मे महिन्यात स्पॅनिश फ्लू भारतात आला. भारतातल्या ब्रिटीश नागरिकांपेक्षा भारतीयांना याचा फटका जास्त बसला.

आकडेवारीनुसार हिंदुंमधल्या खालच्या जातींमधला मृत्यूदर दर 1000 लोकांमागे 61.6 च्या पातळीवर गेला होता. युरोपामध्ये हा दर 1000 लोकांमागे 9 पेक्षाही कमी होता.

या संकट काळामध्ये ब्रिटीश सरकारने योग्य प्रशासन केलं नसल्याची टीका भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यांनी केली होती. 'यंग इंडिया' मधून 1919 मध्ये ब्रिटीश अधिकाऱ्यांवर टीका करण्यात आली. महात्मा गांधी 'यंग इंडिया' प्रकाशित करत.

याच्या संपादकीय लेखात असं लिहीलं होतं, " इतक्या भीषण आणि विनाशकारक साथीच्या दरम्यान भारत सरकारने दाखवलेला बेजबाबदारपणा हा इतर कोणत्याही देशामध्ये झालेला नाही."

पहिल्या महायुद्धामुळे तेव्हा जगामध्ये अनेक देश एकमेकांचे शत्रू झाले होते. पण या काळात एकमेकांना साथ देणं गरजेचं असल्याचा मुद्दा या साथीमुळे पुन्हा दिसून आला.

1923मध्ये लीग ऑफ नेशन्सने 'हेल्थ ऑर्गनायझेशन'ची सुरुवात केली. युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी लीग ऑफ नेशन्स ही संस्था अस्तित्त्वात होती.

या हेल्थ ऑर्गनायझेशनने आंतरराष्ट्रीय साथ रोखण्यासाठी एक नवीन प्रणाली तयार केली. आणि अधिकाऱ्यांऐवजी वैद्यकीय क्षेत्रातले लोक याचं काम पाहात. त्यानंतर 1948मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रगती

या साथीनंतर सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देण्यात आला. आणि याद्वारे 'सोशलाईज्ड मेडिसिन'चा विकास झाला.

सार्वजनिक आणि केंद्रित आरोग्य प्रणाली तयार करणारा रशिया हा पहिला देश होता. 1920मध्ये त्यांनी ही यंत्रणा स्थापन केली. इतर देशांनीही हाच मार्ग अवलंबला.

लॉरा स्पिनी लिहीतात, "1920च्या दशकात अनेक देशांनी आरोग्य मंत्रालयं स्थापन केली किंवा मग त्यामध्ये अमुलाग्र बदल केला. हा स्पॅनिश फ्लूच्या साथीचा थेट परिणाम होता. या काळात सार्वजनिक आरोग्य प्रमुखांना कॅबिनेट बैठकींमध्ये घेतलं जात नसे किंवा मग ते पैसे आणि मनुष्यबळासाठी दुसऱ्या विभागांवर अवलंबून होते."

लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग

ही गोष्ट आहे दोन शहरांची. सप्टेंबर 1918मध्ये वॉर बॉण्ड्सच्या प्रमोशनसाठी अमेरिकेच्या शहरांमध्ये परेड्सचं आयोजन करण्यात येत होते. आधीपासून सुरू असलेल्या युद्धासाठी याद्वारे पैसा गोळा केला जात होता.

स्पॅनिश फ्लूला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेतल्याच दोन शहरांनी अगदी वेगळे उपाय अवलंबले.

फिलाडेल्फियाने आपले कार्यक्रम सुरू ठेवले पण सेंट लुईस शहरातले सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले.

एका महिन्यानंतर फिलाडेल्फियामध्ये या साथीमुळे 10,000 लोक दगावले होते. तर दुसरीकडे सेंट लुईसमधल्या बळींचा आकडा 700 पेक्षाही कमी होता.

'सोशल डिस्टन्सिंग' साथ रोखण्यासाठी किती परिणामकारक ठरू शकतं, हे या आकडेवारीवरून दिसून येतं.

ज्या शहरांनी लोकांच्या एकत्र येण्यावर, थिएटर, शाळा सुरू राहण्यावर बंदी आणली तिथला बळींचा आकडा कमी असल्याचं 1918मध्ये अमेरिकेच्या अनेक शहरांत करण्यात आलेल्या अभ्यासातून दिसून आलं.

शिवाय ज्या शहरांनी कठोर उपाययोजना केल्या तिथे या साथीनंतर आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सावरण्याचा वेगही जास्त असल्याचं अमेरिकेच्या अर्थशास्त्रज्ञांच्या एका टीमला आढळलं.

स्पॅनिश फ्लूमधून आपण काय शिकलो?

स्पॅनिश फ्लूमधून शिकलेले अनेक धडे कदाचित आपण विसरून गेलोय.

पहिल्या महायुद्धाचं सावट या साथीवर असल्याने या साथीची तितकीशी चर्चा झाली नाही. अनेक सरकारांनी युद्धादरम्यान माध्यमांच्या वार्तांकनावर निर्बंध आणल्यानेही हे झालं असण्याची शक्यता आहे.

योग्यरितीने वार्तांकन न झाल्यामुळे या जागतिक साथीचा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये उल्लेख नाही.

वैद्यकीय इतिहासतज्ज्ञ मार्क होनिग्सबॉम लिहितात, "2018मध्ये स्पॅनिश फ्लूच्या या जागतिक साथीला शंभर वर्षं पूर्ण झाली. एड्सचा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी आढळतो. पण स्पॅनिश फ्लूचा उल्लेखही दिसत नाही. कुठेही डॉक्टर्स वा नर्सेच्या कबरीजवळ मानवंदना देण्यात आली नाही किंवा त्यांना श्रद्धांजली देणारे समारंभ झाले नाहीत. 1918च्या या साथीचा ना कादंबरीत उल्लेख आढळेल वा गाण्यांमध्ये."

पण याला काही अपवाद आहेत. यापैकीच एक - एडवर्ड मंच यांचं स्पॅनिश फ्लूचं सेल्फ पोर्टेट. या आजाराशी लढा देत असताना नॉर्वेच्या मंच यांनी हे पोर्ट्रेट काढलं होतं.

पण एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या 1924च्या आवृत्तीत 20व्या शतकातल्या महत्त्वाच्या घटनांच्या यादीत या साथीचा उल्लेखही नसल्याचं होनिग्सबॉम सांगतात. इतिहासाच्या पुस्तकात या साथीचा पहिला उल्लेख 1968मध्ये करण्यात आल्याचं ते सांगतात.

आणि आता कोव्हिड 19च्या साथीमुळे लोकांना पुन्हा एकदा 1918मधल्या या भीषण साथीची आठवण आलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)