You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने प्रसिद्ध केले 'UFO' व्हीडिओ पण गूढ कायम
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने "हवेत दिसणाऱ्या काही अस्पष्ट वस्तूंचे" तीन व्हीडियो प्रसिद्ध केले आहेत.
हे व्हीडियो प्रथम 2007 आणि 2017 साली लीक झाले होते, त्यामुळे हे व्हीडियो खरे आहेत की नाही, याबद्दल "लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी" हे व्हीडियो प्रसिद्ध केल्याचं पेंटॅगॉनने म्हटलं आहे.
यातले दोन व्हीडियो 'न्यू यॉर्क टाईम्स' वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. तर तिसरा व्हीडियो संगीतकार टॉम डिलाँग यांच्या संस्थेने लीक केला होता.
हे व्हीडियो पहिल्यांदा लीक झाले, तेव्हा यात एलियन (परग्रहावरचे लोक) दिसल्याचं काही लोकांनी म्हटलं होतं. सामान्य भाषेत आकाशात दिसणाऱ्या अशा वस्तूंना Unidentified Flying Objects (UFO) किंवा उडत्या तबकड्या म्हटलं जातं.
व्हीडियो मध्ये काय दिसतं?
न्यू यॉर्क टाईम्सनुसार यातला एक व्हीडियो अमेरिकी नौदलातल्या दोन फायटर पायलट्सने बनवला आहे. या व्हीडियो मध्ये एक गोल वस्तू प्रशांत महासागराच्या वर (जवळपास 160 किमी दूर) आकाशात उडताना दिसतेय.
तर इतर दोन व्हीडियो 2015 सालचे आहेत. या दोन व्हीडियो मध्ये दोन वस्तू हवेत उडताना दिसत आहेत.
यातल्या एका व्हीडियोत एक वस्तू आकाशात गोल-गोल फिरताना दिसते. तसंच या व्हीडियो मध्ये एका पायलटचा आवाजही ऐकू येतोय. तो म्हणतोय, "अरे इकडे बघ! हे गोल-गोल फिरतंय!" (Look at that thing, dude! It's rotating!)
पेंटॅगॉनने आपल्या निवेदनात म्हटलं आहे, "आम्ही या तिन्ही व्हीडियोंची तपासणी केली आहे आणि त्यानंतरच आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो आहोत की हे व्हीडियो सार्वजनिक केल्याने कुठल्याही प्रकारची संवेदनशील माहिती बाहेर जाणार नाही आणि एअर स्पेसमध्ये आमच्या सैन्याचंही नुकसान होणार नाही."
या निवेदनात पुढे म्हटलं आहे, "हे व्हीडियो खरे आहेत, हे सांगण्यासाठीच संरक्षण मंत्रालय हे व्हीडियो प्रसिद्ध करत आहे. व्हीडियोमध्ये दिसणाऱ्या वस्तू अजूनही अस्पष्ट आहेत आणि म्हणूनच त्यांना 'unidentified' मानलं जात आहे."
पेंटॅगॉनने व्हीडियो प्रसिद्ध केल्यानतंर गायक डिलॉग यांनी ट्वीट करत आपल्या संस्थेच्या (Stars Acadamy of Art and Sciences) शेअरहोल्डर्सचे आभार मानले आहेत आणि यापुढे या क्षेत्रातल्या संशोधनासाठी निधी पुरवण्याची आशा व्यक्त केली आहे.
ते लिहितात, "या क्षेत्रात संशोधनासाठी मी यापुढेही फंडिंग करू शकेन, अशी आशा मी व्यक्त करतो. यापुढे आणखी प्रश्नांची उत्तरं मिळतील, अशी आशा आपण करूया."
संगीतकार टॉम डिलाँग यांनी काही लोकांसोबत मिळून 2017 साली UFO आणि पॅरानॉर्मल हालचालींच्या अभ्यासासाठी या संस्थेची स्थापना केली होती.
बीबीसीचे संरक्षण प्रतिनिधी जोनाथन मार्कस यांचं विश्लेषण
लोकांना कायमच गूढ गोष्टींविषयी कुतूहल आणि आकर्षण वाटत आलं आहे आणि UFO या संकल्पनेत तर गूढ खचून भरलं आहे. आपल्या जगापेक्षा वेगळ्या जगाचं अस्तित्व ते सरकारने विशेषतः अमेरिकी सरकारने रचलेलं षड्यंत्र, या सर्वांमुळे उडत्या तबकड्यांविषयी सर्वांमध्येच आकर्षण दिसून येतं.
हजारो वर्षांपासून मानव आकाशाकडे बघून त्यात दिसणाऱ्या गूढ वस्तूंची उकल करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, आधुनिक युगात UFOविषयी पहिल्यांदा चर्चा झाली 1947 साली. त्यावर्षी मेक्सिकोमध्ये एका शेतकऱ्याला काही अवशेष दिसले. सुरुवातीला त्याला फ्लाईंग डिस्क म्हणजेच उडती तबकडी म्हटलं गेलं. मात्र, त्यानंतर सोव्हिएत युनियनवर पाळत ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गुप्त 'बलून प्रोग्राम'चा तो भाग असल्याचं मानलं गेलं.
अमेरिकेतल्याच नेवाडामध्ये अॅडव्हान्स एअरक्राफ्टसाठीचा टेस्टिंग बेस आहे. या भागाला 'एरिया 51' म्हणतात. मात्र, या ठिकाणी UFO रिसर्च सेंटर असल्याचीही बरीच चर्चा झाली. अशा कॉन्स्पिरसी थेअरी लिहिणाऱ्यांच्या मते अमेरिकी सरकार या ठिकाणी अॅडव्हान्स एलियन टेक्निकचा सराव करतं.
कालांतराने या विचित्र समजुतीवरही पडदा पडला. मात्र, 2017 साली पेंटॅगॉनने स्वतः मान्य केलं की UFOचा शोध घेण्यासाठी त्यांनी एक मोठा कार्यक्रम हाती घेतला होता. पण हा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे.
अमेरिकी नौदल आता या वस्तूंचा उल्लेख UFO किंवा फ्लाईंग डिस्कऐवजी 'Unidentified Ariel Phenomenon' असा करणं पसंत करते. नाव बदललं तरी लोकांच्या मनात असलेला मूळ प्रश्न मात्र कायम आहे. प्रश्न आहे - ब्रह्मांडात आपण खरंच एकटे आहोत का?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)