You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
1900 वर्षांपूर्वीच्या या ममीत दडलंय काय?
इजिप्तमधील पिरॅमिड आणि ममी हा जगभरात आजही औत्सुक्याचा विषय आहे. नव्या संशोधनात उच्चक्षमतेच्या सिंक्रोटॉन एक्सरेचा वापर करून या ममीच्या अंतरंगाचा उलगडा करण्यात प्रयत्न संशोधक करत आहेत.
ममीला गुंडाळण्यात आलेल्या कपड्याच्या आत काय आहे, याचं त्रिमितीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न संशोधक यावेळी करत आहेत.
ही ममी एका पाच वर्षांच्या मुलीची आहे. या ममीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मृतदेह तर जतन करण्यात आला आहेच, याशिवाय या मुलीच्या चेहऱ्याचं चित्रही ममीच्या मुखावर लावण्यात आलं आहे. याला ममी पोर्ट्रेट म्हणतात.
ममी बनवण्याची इजिप्शियन पद्धती आणि पोर्ट्रेट रेखाटण्याची रोमन पद्धती एकाच प्रकारे ममी पोर्ट्रेटमध्ये दिसते. अशा प्रकारच्या 100 पोर्ट्रेट ममी सध्या सुस्थितीत आहेत.
हे पेंटिंगवरून ही मुलगी पूर्वी कशी दिसत असेल याचा अंदाज बांधता येतो. नव्या संशोधनात ममीला गुंडाळण्यात आलेल्या कापडाला धक्का न लावता, स्कॅनिंगची प्रक्रिया करण्यात येईल. यातून या मुलीचं आयुष्य आणि मृत्यू यावर अधिक प्रकाश टाकता येणार आहे.
मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधले संशोधक मार्क वॉल्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "या मुलीचा मृत्यू पाचव्या वर्षी झाला, हे पाहून वाईट वाटतं. आतापर्यंतचा अभ्यास सांगतो की, ही मुलगी सुदृढ होती. कोणत्यातरी आघाताने तिचा मृत्यू झाला असावा, असं वाटत नाही. मलेरिया किंवा गोवर अशा एखाद्या आजाराने तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे."
या ममीचा शोध 1911मध्ये पुरातत्व संशोधक सर विल्यम फ्लिंडर्स पेट्री यांनी इजिप्तमधील हावारा इथ लावला होता. पुढच्या वर्षी ही ममी शिकागोमध्ये आणण्यात आली.
ही ममी सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच या ममीच्या आत काय आहे, याचा शोध घेतला जात आहे.
ही ममी नार्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी कँपसमध्ये होती. ती प्राथमिक सिटी स्कॅनसाठी शिकागोमधल्या हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आली. आता ती अरगॉन नॅशनल लॅबॉरिटीमध्ये नेण्यात आली आहे.
या स्कॅनिंगसाठी सिंक्रोट्रॉन एक्सरेचा वापर करण्यात येत आहे. या ममीची हाडं आणि दात यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. ममीची प्रक्रिया करताना मेंदू काढण्यात येत असे. मेंदूच्या जागी काय ठेवलं जात होतं, याचाही अभ्यास संशोधकांना करायचा आहे.
ममी निर्मितीची प्रक्रिया, मृतदेह ठेवण्याची पद्धत यावरही संशोधकांना अभ्यास करायचा आहे.
डोकं आणि पायांच्या भोवताली वायरसारखं काही असल्याचंही संशोधकांना आढळलं आहे. पण ही वायर म्हणजे उत्खननावेळी लावण्यात आलेल्या पिना असू शकतील, असंही संशोधकांना वाटतं.
ही प्रयोगशाळा अमेरिकेच्या ऊर्जा विभागाची आहे. या एक्सरेमधून निर्माण होणाऱ्या किरणांच्या साहाय्याने पदार्थाची नॅनोटेक्नॉलॉजीच्या पातळीवर चिकित्सा करता येते.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रा. स्टुअर्ट स्टॉक म्हणाले, "ममीमधील हाडं हा सर्वाधिक महत्त्वाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे."
काळाच्या ओघात हाडांमध्ये कसे बदल होत गेले याचा अभ्यास महत्त्वाचा आहे, असं संशोधकांना वाटतं. आताची मानवी हाडं आणि प्राचीन काळातील मानवी हाडं यात कसा बदल झाला आहे, याचा अभ्यास करता येईल, असं त्यांना वाटतं.
त्याकाळातील लहान मुलांचाही अभ्यास संशोधकांना करायचा आहे. इतिहास विभागातील सहप्राध्यापक टॅको टेरपास्ट्रा म्हणाले, "त्या काळातील अर्ध्यापेक्षा जास्त मुलं त्यांचा दहावा वाढदिवस पाहू शकत नसत. एवढं जीवनमान कमी होतं."
प्रा. वॉल्टन म्हणाले, "या मुलीचं पोर्ट्रेट आणि तुलनात्मकदृष्ट्या महाग दफनविधी लक्षात घेतला तर या मुलीला गावात मोठा मान होता असं लक्षात येतं."
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)