ब्रेक्झिटमुळे बदलणाऱ्या 7 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

ब्रिटन आणि युरोपीय युनियन हे औपचारिकरीत्या वेगळे झाले आहेत. भारतीय वेळेनुसार आज सकाळी साडे चार वाजता ब्रिटन युरोपीय युनियनमधून बाहेर पडलं आहे.

युरोपियन युनियनचा ब्रिटन 47 वर्षं सदस्य होता.

शुक्रवार, 31 जानेवारी 2020 रोजी युनायटेड किंगडम (UK) आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता युरोपीय महासंघातून बाहेर पडले.

मात्र, युरोपीय महासंघातून बाहेर पडल्याबरोबर युके 11 महिन्यांच्या ट्रान्झिशन पिरेडमध्ये जाईल. याचा नेमका अर्थ काय आणि युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यामुळे काय फरक पडणार आहे, बघूया.

या ट्रान्झिशन पिरेडमध्ये म्हणजेच संक्रमण काळात UK युरोपीय महासंघाच्याच नियमांचं पालन करेल आणि युरोपीय महासंघाला निधी देईल. काही गोष्टी तशाच राहणार आहेत. मात्र, काही गोष्टी आमूलाग्र बदलतील.

सुरुवातीला बघूया काय बदलणार?

1. युरोपीय संसदेतील युकेचे खासदार आपली खासदारकी गमावतील

निगेल फराज हे ब्रेक्झिटचे म्हणजेच युकेने युरोपीय महासंघातून बाहेर पडावं, या बाजूचे खंदे पुरस्कर्ते आहेत. ते सध्या युरोपीय संसदेचे सदस्य आहेत. खासदारकी गमावणाऱ्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे.

याचं कारण युरोपीय महासंघातून बाहेर पडताच EUच्या सर्व राजकीय संस्था आणि एजन्सीजमधून UK बाहेर पडेल.

दरम्यान, संक्रमण काळात युके युरोपीयन कोर्ट ऑफ जस्टिसच्या निर्णयांना बांधिल राहिल. कुठल्याही कायदेशीर वादावर शेवटचा शब्द युरोपीयन कोर्टाचा असणार आहे.

2. युरोपीय महासंघ परिषदांमध्ये सहभागी होता येणार नाही

युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या युरोपीय महासंघाच्या परिषदांमध्ये UKला सहभाग घेता येणार नाही. विशेष आमंत्रण दिलं तरच युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन भविष्यातल्या अशा एखाद्या परिषदेला उपस्थित राहू शकतील.

EUच्या बैठकांनाही यापुढे ब्रिटीश मंत्र्यांना उपस्थित राहता येणार नाही.

3. व्यापार धोरण बदलणार

UK जगातील इतर राष्ट्रांसोबत वस्तू आणि सेवांच्या व्यापाराविषयी नवीन नियम आखू शकणार आहे. मात्र, एखाद्या राष्ट्रासोबत व्यापारविषयक नवीन धोरण आखण्यात आलं तरीदेखील ट्रान्झिशन पिरेड संपेपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार नाही.

याशिवाय EUसोबतदेखील नवे व्यापार नियम आखावे लागणार आहेत. जेणेकरून ट्रान्झिशन पिरेड संपल्यानंतर UK च्या नागरिकांना कुठलंही अतिरिक्त शुल्क भरावं लागू नये.

4. UKच्या पासपोर्टचा रंग बदलणार

जवळपास तीस वर्षांपूर्वी UKच्या पासपोर्टचा रंग बदलण्यात आला होता. पूर्वी तो निळा होता. त्यानंतर तो बरगंडी रंगाचा करण्यात आला. मात्र ब्रेक्झिटनंतर UK आपल्या पासपोर्टचा रंगही बदलणार आहे. पूर्वीचा निळा रंग पुन्हा लागू होईल. सर्व पासपोर्ट बदलण्यासाठी जवळपास सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे.

5. ब्रेक्झिट नाणी

ब्रेक्झिटच्या स्मृतीप्रित्यर्थ 50 पेनीची (UKचे 50 पैसे) जवळपास तीस लाख नाणी शुक्रवारी चलनात येतील. यावर 31 जानेवारी ही तारीख असणार आहे. तसंच त्यावर 'Peace, prosperity and friendship with all nations' हे ब्रिदवाक्यही कोरण्यात आलं आहे.

मात्र या नाण्यांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ब्रेक्झिटच्या विरोधात असणाऱ्या अनेकांनी आम्ही ही नाणी स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

यापूर्वी 31 ऑक्टोबर रोजी UK युरोपीय महासंघातून बाहेर पडणार होता. मात्र, ती तारीख पुढे ढकलण्यात आली.

त्यावेळीदेखील 31 ऑक्टोबर तारीख असलेली नाणी तयार करण्यात आली होती. मात्र, ब्रेक्झिटचा मुहूर्त पुढे गेल्याने ती नाणी वितळून नवीन नाणी तयार करण्यात आली आहेत.

6. UKचा ब्रेक्झिट विभाग बंद होणार

UK-EU वाटाघाटी आणि नो-डील ब्रेक्झिटच्या तयारीचं कामकाज बघणारा विभाग ब्रेक्झिट दिनापासून बंद होईल.

ब्रिटनच्या माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी मे 2016 मध्ये या विभागाची स्थापना केली होती.

पुढच्या वाटाघाटीसाठी UKची टीम डाउनिंग स्ट्रीटवरून कामकाज बघेल. डाउनिंग स्ट्रीट हे पंतप्रधानांचं मुख्यालय असलेलं ठिकाण आहे.

7. जर्मनी गुन्हेगारांना UKला हस्तांतरित करणार नाही

जर्मनीमध्ये पळून गेलेल्या गुन्हेगारांना पुन्हा UKला पाठवणं शक्य होणार नाही. यामागचं कारण म्हणजे जर्मनीच्या राज्यघटनेनुसार युरोपीय महासंघातील राष्ट्र वगळता जर्मनी आपल्या नागरिकांचं इतर कुठल्याही राष्ट्राला प्रत्यार्पण करत नाही.

स्लोव्हानियासारखी इतर काही राष्ट्रदेखील हाच पवित्रा घेतील का, हे अजून स्पष्ट नाही.

मात्र, ट्रान्झिशन पिरेडमध्ये युरोपीयन अरेस्ट वॉरंट ग्राह्य धरलं जाईल, असं UKच्या गृहखात्याने म्हटलं आहे. म्हणजेच अकरा महिन्यांच्या संक्रमण काळात UK मध्ये गुन्हा करून जर्मनीला पळून गेलेला आरोपी UKच्या हवाली करतील.

आता बघूया ब्रेक्झिटनंतर काय बदलणार नाही.

ब्रेक्झिटनंतर लगेच संक्रमण काळ सुरू होणार असल्याने किमान 31 डिसेंबर 2020 पर्यंत काही गोष्टी अजिबात बदलणार नाही.

1. प्रवास

फ्लाईट्स, ट्रेन आणि बोटसेवा पूर्वीसारखीच सुरू राहील. पासपोर्टच्या बाबतीत सांगायचं तर ट्रान्झिशन पिरेडमध्ये UKच्या नागरिकाला EUच्या नागरिकांच्या रांगेत उभं राहता येईल.

2. ड्रायव्हिंग लायसन्स आणि पाळीव प्राण्यांचा पासपोर्ट

ही दोन्ही कागदपत्र व्हॅलिड असेपर्यंत ग्राह्य धरली जातील.

3. युरोपीय आरोग्य विमा कार्ड

हे कार्ड असणाऱ्या UKच्या नागरिकाला अपघात किंवा आजारात सरकारी खर्चात वैद्यकीय सेवा उपलब्ध होते. हे कार्ड युरोपीय महासंघाच्या कुठल्याही राष्ट्रात (स्वित्झरलँड, नॉर्वे, आयलंड आणि लिंक्टेनशाईनमध्येही) ग्राह्य मानलं जातं. संक्रमण काळातही हे कार्ड असणाऱ्या व्यक्तीला सर्व वैद्यकीय सेवा सवलतीच्या दरात पुरवली जाईल.

4. युरोपीय महासंघात वास्तव्य करणे आणि नोकरी करणे

ट्रान्झिशन पिरेडमध्ये EUमध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे. म्हणजेच EUमधल्या कुठल्याही राष्ट्रात वास्तव्य आणि नोकरी करणारे यापुढेही करू शकतील. त्याचप्रमाणे युरोपीय महासंघातील कुठल्याही राष्ट्राच्या नागरिकाला UKमध्ये नोकरी करण्याचं आणि वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य असेल.

5. निवृत्ती वेतन

युरोपीय महासंघात राहणाऱ्या UKच्या नागरिकांच्या निवृत्ती वेतनावर काहीही परिणाम होणार नाही. पेंशन पूर्वीप्रमाणे सुरू राहील आणि त्यात होणारी वार्षिक वाढही मिळेल.

6.बजेटमध्ये हातभार

संक्रमण काळात युरोपीय महासंघाच्या अर्थसंकल्पाला UK हातभार लावणार आहे. याचाच अर्थ युरोपीय महासंघाच्या अनुदानावर सुरू असलेल्या योजनांसाठी यापुढेही UK निधी पुरवणार आहे.

7. व्यापार

UK आणि EU यांच्यातल्या व्यापारावर ब्रेक्झिटनंतरच्या संक्रमण काळात कुठलाही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)