साई इंग विन: तैवानच्या नव्या राष्ट्राध्यक्षांमुळे चीनची खदखद का वाढली?

फोटो स्रोत, Getty Images
तैवानमध्ये शनिवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या साई इंग विन विजयी झाल्या आहेत. या निकालाकडे चीनचं बारकाईने लक्ष होतं. साई इंग विन निवडून आल्याने चीनची खदखद वाढली आहे.
निवडणुकांमध्ये खरा मुकाबला डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे साई इंग विन आणि कुओमिनटांग पक्षाचे खान ग्वो यी यांच्यात होता. तैवानच्या विद्यमान राष्ट्राध्यक्ष साई इंग विन आता दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
चीन आणि तैवानचे संबंध दुरावलेले आहेत. साई इंग विन यांना हीच स्थिती असावी असं वाटतं. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी खान ग्वो यी यांना तैवान आणि चीनमधील संबंध सुरळीत व्हावेत असं वाटतं.
दोन वर्षांपूर्वी साई इंग यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र शनिवारी झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचं पारडं जड दिसतं आहे. हाँगकाँगमध्ये सुरू असलेलं आंदोलन हे यामागचं कारण असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं.
साई इंग विन यांनी हाँगकाँगमध्ये होणाऱ्या आंदोलनांला पाठिंबा दिला होता. तैवानमध्ये संसदेच्या निवडणुका होणार असून, साई इंग यांच्या पक्षाकडे बहुमत आहे.
राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांमध्ये एक कोटी 90 लाख तैवानचे नागरिक मतदान केलं आहे.
तैवान आणि चीनमध्ये नेमका वाद काय?
पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि रिपब्लिक ऑफ चायना (तैवान) यांना एकमेकांची स्वायतत्ता मान्य नाही. दोन्ही देश स्वत:ला अधिकृत चीन मानतात. मुख्य चीन आणि तैवान द्वीपसमूह यांचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचा दावा केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
आपण ज्याला चीन म्हणतो त्याचं अधिकृत नाव 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' आहे. ज्याला आपण तैवान म्हणतो त्याचं अधिकृत नाव 'रिपब्लिक ऑफ चायना' आहे. दोन्ही देशांच्या नावात चीन आहे.
व्यावहारिकदृष्ट्या तैवान द्वीपसमूह 1950पासून चीनच्या मुख्य भूभागापासून स्वतंत्र आहे. चीनला मात्र तैवानचं अस्तित्व बंडखोर असल्यासारखं वाटतं. आम्ही स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण आहोत असं तैवानचं धोरण आहे. तैवानने चीनमध्ये स्वत:ला विलीन करावं असं चीनला वाटतं. याकरता बळाचा वापर करावा लागला तरी चालेल अशी चीनची भूमिका आहे.
तैवानला स्वतंत्र देश म्हणून वागवणाऱ्या कोणत्याही देशाशी चीन संबंध ठेवत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर तैवानला स्वतंत्र देश म्हणून मानणाऱ्या देशांची संख्याही कमी आहे. मात्र अनेक देशांचे तैवानशी व्यापारी संबंध आहेत.
चीनशी संबंधांवर परिणाम
चीनशी दुरावलेले संबंधांची स्थिती कायम राखण्यावर साई इंग यांचा भर असणार आहे. तैवानच्या स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वाला धक्का लावण्याची त्यांची इच्छा नाही.
गेल्या वर्षी जून महिन्यात हाँगकाँग इथे सुरू असलेल्या आंदोलनावेळी त्या म्हणाल्या होत्या, "तैवानच्या सार्वभौमतेला आणि या देशाची लोकशाही कमकुवत करणारे राजकीय पक्ष अपयशी ठरतील."
हाँगकाँगच्या धर्तीवर एक देश-दोन व्यवस्था अशा व्यवस्थेचं त्या समर्थन करत नाहीत. असं धोरण कालबाह्य आणि चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
तैवानने हाँगकाँगकडून बोध घ्यायला हवा. तैवानच्या स्वातंत्र्यावर भर दिला नाही तर जे आमच्याकडे आहे तेही हिरावून घेतलं जाईल असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, EPA
दुसरीकडे त्यांचे विरोधक खान ग्वो यी यांचा चीनप्रती धोरण नरमाईचं आहे. चीन आणि तैवान यांच्यात सलोख्याचे संबंध असावेत असं त्यांना वाटतं. यामुळे तैवानची आर्थिक स्थिती सुधारेल असं त्यांना वाटतं.
मात्र तैवानने चीनचा भाग व्हावा असं त्यांनाही वाटत नाही.
1949 मध्ये साम्यवादी शासन येण्यापूर्वी केएमटीचं चीनवर राज्य होतं. खान ग्वो यी यांनी हाँगकाँग आणि चीनचा दौराही केला होता. तो दौरा चांगलाच गाजला होता.
तैवानच्या स्वतंत्र होण्याची औपचारिक घोषणा सिफलिसपेक्षा धोकादायक असेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
साई इंग विन यांनी देशाची अर्थव्यवस्था ढासळवली असा आरोप खान करतात. चीनशी संबंध दुरावल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत तिसरे उमेदवार पीपल्स फर्स्ट पार्टीचे जेम्स सूंग आहेत. चीनमध्ये लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईपर्यंत चीन आणि तैवान यांच्यातील संबंध जैसे थे राखले जावेत असं त्यांना वाटतं.
निवडणुकीतले अन्य मुद्दे
तैवानच्या स्वातंत्र्याबरोबरीने निवडणुकीत आर्थिक मुद्दा अग्रणी आहे. साई इंग विन यांच्या कार्यकाळात तैवानची आर्थिक प्रगती झाली आहे. मात्र निर्यातीत घट झाली आहे. सर्वसाधारण वेतन श्रेणी घसरली आहे.
आशिया खंडात समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा तैवान पहिला देश ठरला होता. हा निर्णय घेतल्यानंतरच्या या पहिल्याच निवडणुका आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. मात्र संसदेने विशेष कायदा करून न्यायालयाच्या निर्णयाचं पालन होईल याची खबरदारी घेतली. हा निर्णय म्हणजे समानतेच्या दृष्टीने टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल असल्याचं साई इंग विन यांना वाटतं.
उमेदवारांची पार्श्वभूमी
63वर्षीय साई इंग विन या राजकारण्यात येण्यापूर्वी प्राध्यापक होत्या. अमेरिकेतील कॉरनल विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि तैवानमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे.

फोटो स्रोत, Reuters
समलैंगिक विवाहाला मान्यता, भाषिक अधिकार आणि अन्य मुद्यांवर त्यांनी जनमत आपल्याकडे आकर्षित केलं आहे.
62वर्षीय खान ग्वो यी सध्या गॉशीऊंगचे महापौर आहेत. जनआंदोलन आणि जनमानसाशी नाळ असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची अनेक टोपणनावं आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








