You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेला असा लागला इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा सुगावा
मंगळवारी इराणने इराकमधली अमेरिकी सैनिकी तळांवर अनेक क्षेपणास्त्रं डागली. इराणने ही कारवाई त्यांचे सर्वोच्च लष्करी अधिकारी जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा 'सूड' उगवण्यासाठी केली.
मात्र, या हल्ल्यांमध्ये एकही अमेरिकी किंवा इराकी नागरिक ठार झालेला नाही, फक्त थोडंफार नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे.
इराणच्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा वेध घेतला. मात्र अमेरिकेला या हल्ल्यांची पूर्वसूचना कशी मिळाली?
याचं उत्तर स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनी दिलं आहे. अमेरिकेच्या 'वॉर्निंग यंत्रणे'ने योग्यपद्धतीने काम केल्याचं ते म्हणाले. अमेरिकेकडे खूप मोठी रडार यंत्रणा आणि अनेक उपग्रह आहेत. यांच्या माध्यमातून जगभरात होणारे क्षेपणास्त्र हल्ले ट्रॅक करता येतात.
या सुसज्ज तांत्रिक व्यवस्थेमुळेच अमेरिकेचं सैन्य क्षेपणास्त्र हल्ल्यातून वाचू शकलं. यावेळी वॉर्निंग सिस्टिमने योग्यपद्धतीने काम केलं. मात्र, काही देश अत्याधुनिक क्षेपणास्त्र निर्मिती करत आहेत. ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र कुठलीच रडार यंत्रणा टिपू शकत नाहीत. अशावेळी अमेरिका काय करणार?
Wired या न्यूज वेबसाईटनुसार अमेरिकेकडे या क्षणाला 4 मिसाईल ट्रॅकिंग इन्फ्रारेड सॅटेलाईट आहेत. याव्यतिरिक्त 2 इन्फ्रारेड मिसाईल डिटेक्शन सिस्टिमदेखील आहेत.
इराणबाबतही यापैकीच एखाद्या उपग्रहाने माहिती पुरवली असेल.
अमेरिकेने याबद्दलची माहिती दिली नसली तरी हे उपग्रह लपून नाहीत. डोंगरांमुळे या रडार यंत्रणा क्षेपणास्त्र तोवर टिपू शकत नाही जोवर क्षेपणास्त्र निश्चित अशा उंचीपर्यंत पोहोचत नाहीत.
जेव्हा एखादं क्षेपणास्त्र डागलं जातं त्यावेळी एक मिसाईल वॉर्निंग सेंटरमध्ये एक अलर्ट येतो. अमेरिकेतील कोलोराडोस्थित यूएस स्पेस कमांड सेंटर हे ऑपरेट करतं.
यानंतर उपग्रहाने टिपलेली माहिती योग्य आहे की नाही, हे संरक्षण तज्ज्ञ तपासतात. क्षेपणास्त्राची ट्रॅजेक्टरी म्हणजेच क्षेपणास्त्र कुठल्या मार्गाने जाणार आणि कशाला धडकणार, हेदेखील हे तज्ज्ञच तपासतात.
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार इराणबाबतीत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की उपग्रहातून मिळालेल्या वॉर्निंगमध्ये त्यांना क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती खूप आधी मिळाली होती.
मात्र, प्रत्यक्षात क्षेपणास्त्र डागल्यावर काही मिनिटंच हाताशी असतात. क्षेपणास्त्राला रोखण्याऐवजी अमेरिकी जवानांना तळ सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र, आणखी एक विशेष बाब इथे दिसतेय. अमेरिकेतील सीएनएन या न्यूज चॅनलचे पत्रकार जेक टॅपर यांनी पेंटॅगॉनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत ट्वीट केलं आहे की इराणने मुद्दाम असंच टार्गेट निवडलं जिथं नुकसान कमी होईल.
अमेरिका आणि युरोपीय सरकारांच्या सूत्रांनी रॉयटर्स या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार कमीत कमी नुकसान व्हावं, यासाठी इराणने मुद्दाम असा हल्ला केल्याचा विश्वास त्यांना वाटतोय. तसंच इराणने हल्ल्यातून बहुतांश अमेरिकी तळांना सुरक्षित ठेवलं जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये.
अमेरिकेची मिसाईल वॉर्निंग सिस्टिम बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी योग्य पद्धतीने काम करतो. इराणजवळही बॅलेस्टिक श्रेणीतील क्षेपणास्त्रच आहेत. ही क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्यांचा मार्ग तपासता येतो. म्हणजे त्याचा मार्ग कोणता असेल,हे शोधता येतं.
मात्र, आता अशी क्षेपणास्त्रही येऊ घातली आहेत जी डागल्यानंतर मधूनच आपला मार्ग बदलू शकतात. काही देशांकडे उत्तम क्षेपणास्त्र तंत्रज्ञानही आहे. या क्षेपणास्त्रांवरचा उपाय अमेरिकेकडे नाही. उदाहरणार्थ कमी उंचीवरून मारा करणारे हायपरसोनिक क्षेपणास्त्र.
हायपरसोनिक उपकरणं आवाजाच्या वेगाच्या पाचपट अधिक वेगाने मारा करतात. त्यांचे दोन प्रकार असतात. एक क्रूज मिसाईल आणि दुसरा एमआरव्ही नावाने ओळखली जाणारी एकप्रकारचं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र.
अमेरिकेला आपली दुबळी बाजू चांगलीच ठाऊक आहे आणि तंत्रज्ञान विकासासाठी ते कायम अग्रेसर असतात. अमेरिकेच्या कुठल्याही शहराला आणि त्यात राहणाऱ्या जनतेला कुठल्याही प्रकारच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून सुरक्षित ठेवेल असा क्षेपणास्त्र विरोधी कार्यक्रम आखणार असल्याचं आश्वासन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिलं होतं.
जानेवारी 2019 मध्ये दिलेल्या या आश्वासनानंतर अमेरिकेने मिसाईल डिफेंस रिव्हू प्रसिद्ध केला. जुनीच धोरणं पुढे कायम ठेवणार असल्याचं या रिव्ह्यूमध्ये सांगण्यात आलं.
बीबीसीचे संरक्षणविषयक पत्रकार जोनाथन मार्कस या रिपोर्टच्या हवाल्याने सांगतात की अमेरिका अनेक बाबतीत इतर देशांच्या पुढे आहे. उदाहरणार्थ इंटेलिजन्स (गुप्तचर संस्था), बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा आणि लढाऊ विमानं.
शस्त्रास्त्र नियंत्रण संघटनेनुसार (Arms Control Organisation - ACO) अमेरिकेजवळ 400 आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)