You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण-अमेरिका: सुलेमानींना मारून ट्रंप पुन्हा निवडणूक जिंकतील?
- Author, अॅन्थोनी झुरकेर
- Role, नॉर्थ अमेरिकन रिपोर्टर
इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांची अमेरिकेने ड्रोनद्वारे हत्या केली. या घटनेचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडसाद उमटतील, यात शंका नाही.
हल्ली जगात घडणाऱ्या कुठल्याही घटनेचे अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडसाद उमटत आहेत. त्यात सुलेमानी यांची हत्या ही तर एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे.
या हत्येनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढतोय. इराण या हत्येचा सूड कसा उगवतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाची तीव्रता किती असेल, यावर या घटनेचे दीर्घकालीन परिणाम अवलंबून असणार आहेत.
याचा परिणाम अमेरिकेने इराकमधून सैन्य माघारी बोलवण्यात झाला तर राजकारणाला कलाटणी मिळू शकते.
मात्र, डेमोक्रेटिक पक्षाची प्रायमरी निवडणूक आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर याचे काही परिणाम संभवतात.
युद्धकाळातील राष्ट्राध्यक्ष?
अमेरिकेचा इतिहास बघितला तर असं दिसतं की मोठ्या परराष्ट्र धोरण संकटाचा सामना करणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षाला आजवर जनतेचं समर्थन मिळालं आहे. अल्पकाळासाठी का असेना पण अशा राष्ट्राध्यक्षांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळालेला दिसतो.
1991च्या पहिल्या आखाती युद्ध काळात (गल्फ वॉर) अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश सीनिअर यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. तर 9/11 नंतरच्या कारवाईमुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांच्या लोकप्रियतेनेही पूर्वीचे सर्व विक्रम मोडले होते.
या सर्व मोठ्या सैन्य कारवाया होत्या. मात्र, जेव्हा कारवाया छोट्या असतात तेव्हा त्यातून किती राजकीय फायदा (किमान निवडणुकीपुरता) मिळाला, हे ओळखणं कठीण असतं.
2011 मध्ये बराक ओबामांनी लिबियावर हवाई हल्ले केले होते. त्यावेळी त्यांच्या लोकप्रियतेत कुठलाही बदल झाला नाही. ट्रंप यांच्या अध्यक्षपदाच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांची लोकप्रियता जवळपास स्थिर राहिली आहे. मात्र, सीरियाने केलेल्या रासायनिक अस्त्राच्या वापरला प्रत्युत्तर म्हणून ट्रंप यांनी सीरियाच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला होता. त्यावेळी त्यांच्या लोकप्रियतेत किंचित वाढ झाल्याचं दिसलं.
सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिकेत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, त्यावरून जनतेत उभी फूट असल्याचं स्पष्ट जाणवतं. ट्रंप यांच्या यापूर्वीच्या अनेक निर्णयांवरही अमेरिकी जनतेमध्ये अशीच फूट दिसली होती. काहींनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. मात्र, कुठलीही कारवाई करताना राष्ट्राध्यक्ष 'काळजीपूर्वक योजना आखत नाहीत,' असंही काहींचं म्हणणं आहे.
ट्रंप यांना कुठलाही मोठा युद्ध विजय मिळालेला नाही किंवा त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेना मोठा रक्तरंजित लढाही दिलेला नाही. त्यामुळे ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर मत व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा त्याचा अंतिम परिणामही जवळपास तसाच असेल, अशी शक्यता आहे.
रिपब्लिकनांचा पाठिंबा
ट्रंप यांनी यापूर्वी वादग्रस्त किंवा भडकाऊ कृतीतून राजकीय फायदा लाटला आहे. तसाच सुलेमानी यांच्या हत्येच्या कारवाईतूनही त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.
हफिंग्टन पोस्टने केलेल्या सर्वेक्षणात 83% रिपब्लिकन मतदारांनी या कारवाईचं समर्थन केलं आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्षांचे समर्थक या कारवाईचा राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी वापर करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हल्ल्याच्या परिणामांविषयी चिंता व्यक्त करणाऱ्यांवर ट्रंप यांचे समर्थक 'तुमचं जे नुकसान झालं, त्याबद्दल दिलगीर आहोत' अशी भोचक टीका करत आहेत.
अमेरिकेतील पुराणमतवाद्यांद्वारे चालवण्यात येणाऱ्या Babylon Bee या विडंबनात्मक वेबसाईटने डेमोक्रेट्स अमेरिकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहू इच्छितात, असं लिहित डेमोक्रेटिक समर्थकांची टर उडली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोगाचा खटला सुरू आहे. या महाभियोगाच्या प्रक्रियेवरून अमेरिकी मतदारांचं लक्ष वळवण्यासाठीसुद्धा पश्चिम आशियात सुरू असलेल्या या नाट्याचा वापर केला जाऊ शकतो. ट्रंप यांनी सोमवारी सकाळी जे काही ट्वीट केले, त्यावरून याची कल्पना येते.
एका ट्वीटमध्ये ते म्हणतात, "मी अत्यंत व्यस्त असताना आपल्या इतिहासातील या सर्वांत मोठ्या राजकीय लबाडीवर वेळ घालवणं, खूप क्लेषदायक आहे."
डेमोक्रेटिक पक्षाची बाजू
इराक युद्धानंतर डेमोक्रेटीक पक्ष तुलनेने युद्धविरोधी मताचा राहिला आहे. त्यामुळे डेमोक्रेटीक पक्षाचा विचार करता सुलेमानी यांच्यावर केलेला हल्ला पक्षांतर्गत युद्धविरोधी चळवळीला बळ देणारा ठरू शकतो.
सुलेमानी यांच्यावरील हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डेमोक्रेटीक पक्षात आघाडीवर असलेले बर्नी सँडर्स यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली होती.
आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "व्हिएतनामबद्दलचं माझं मत योग्य होतं. इराकबद्दल माझं मत योग्य होतं. इराणबरोबर युद्ध होऊ नये, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी कुणाचीही माफी मागत नाही."
अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीच्या रिंगणात असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या आणखी एक नेत्या तुलसी गॅबार्ड यांनीही या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सुलेमानी यांच्यावर केलेला हल्ला 'अॅक्ट ऑफ वॉर' आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या राज्यघटनेचं उल्लंघन झालं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मात्र, इतर डेमोक्रेटिक उमेदवारांचं मत वेगळं आहे. त्यांनी आखाती देशांमध्ये अमेरिकी सैन्याविरोधातल्या प्रॉक्झी युद्धाला सुलेमानी यांच्या पाठिंब्याचा निषेध केला आहे. तर दुसरीकडे ते हल्ल्याच्या मनिषेवरही टीका करत आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार असलेले आणखी एक डेमोक्रेटिक नेते पेटे बटिजेज म्हणतात, "हा निर्णय कसा घेतला आणि याच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आपण सज्ज आहोत का, हे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात." एलिझाबेथ वॉरेन या डेमोक्रेटीक नेत्या आहेत. त्यांनी सुलेमानीला 'खुनी' म्हटलं आहे. तर डेमोक्रेटीक पक्षाच्या अॅमी क्लोबुचर यांनी आखातात अमेरिकन सैन्यदलांच्या सुरक्षेतविषयी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग यांनी बर्नी सँडर्स यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात, "एका ज्येष्ठ सिनेटरने हल्ल्याला 'हत्या' म्हणणं संतापजनक आहे."
ते पुढे म्हणतात, "त्या माणसाचे (सुलेमानी) हात अमेरिकी नागरिकांच्या रक्ताने माखले आहेत. त्या जनरलला ठार करून आपण चूक केली, असं कुणालाही वाटेल, असं मला वाटत नाही."
इराणचा मुद्दा पेटला तर इराणविरोधात सैन्य बळाच्या वापराच्या मुद्द्यावरून नेत्यांमध्ये उभी फूट पडू शकते.
बिडेन यांच्यासमोरील आव्हान
हफिंग्टन पोस्टने केलेल्या सर्वेक्षणात सुलेमानीवरील हल्ला डेमोक्रेटिक पक्षनेते आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेले जो बिडेन यांच्यासाठी चांगली बातमी घेऊन आला आहे. इराणविषयक धोरणाबाबत 62% लोकांनी जो बिडेन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर सँडर्स आणि वॉरेन यांच्या इराणविषयक धोरणाला 47% मतदारांनी पसंती दिली आहे.
बिडेन यांना मिळत असलेला प्रतिसाद आश्चर्यकारक नाही. बिडेन यांना परराष्ट्र धोरणाचा मोठा अनुभव आहे. ते आठ वर्षं उपाध्यक्ष होते. तसंच ते सिनेटच्या फॉरेन रिलेशन्स कमिटीचे दीर्घकाळ सदस्य होते.
मात्र, इतका चांगला बॅकरेकॉर्ड असूनही त्याला वादाची पार्श्वभूमी आहे. बिडेन यांनी 2003 च्या इराक युद्धाला पाठिंबा दिला होता. मात्र, या युद्धाची बाजू मांडताना बरेचदा त्यांची वक्तव्यं गोंधळलेली असायची.
शनिवारी लोया प्रांतात एका मतदाराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बिडेन म्हणाले होते की त्यांनी इराक युद्धाला परवानगी दिली असली तरी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ज्या प्रकारे हा संघर्ष हाताळला, त्याला त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता.
इराक युद्ध सुरू होण्याआधी आणि नंतरही बिडेन यांनी युद्धाचं समर्थन केलं होतं. मात्र, 2005 साली त्यांनीच याबद्दल खंतही व्यक्त केली होती.
इराक युद्धाला समर्थन देण्याची आपली कृती योग्य होती, हे सांगण्याचा ते जेवढा प्रयत्न करतील तेवढंच प्रसार माध्यमं त्यातल्या त्रुटी दाखवून देतील. यातून विरोधकांच्या हाती बिडेनविरोधात आयतं कोलीतच मिळणार आहे.
एकंदरीतच अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात सुरू असलेला महाभियोगाचा खटला आणि सुलेमानी यांची हत्या या दोन मुद्द्यांमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वातावरण पेटणार, हे नक्की. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील इतर इच्छुक उमेदवारांसाठी ही नक्कीच वाईट बातमी आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचाराच्या राजकारणात आखाड्यात उशिरा उतरणे उमेदवारासाठी फायदेशीर ठरत असतं. मात्र, इराणचं संकट बघता आधीच खूप उशीर झालेला असू शकतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)