You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Queen's Speech: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचं भाषण एवढं का महत्त्वाचं?
- Author, टॉम एजिंगटन
- Role, बीबीसी न्यूज
राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचं ब्रिटनच्या संसदेत भाषण होत आहे. शिष्टाचारांचा भाग असलेल्या या भाषणाला आता एवढं महत्त्व का प्राप्त झालं आहे?
विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं सरकार पुढच्या वाटचालीसाठी काय धोरण आखणार, याचे महत्त्वाचे मुद्दे राणींच्या या भाषणात असतील. गुन्हेगारी, स्थलांतर, आरोग्य आणि पर्यावरणाशी निगडित महत्त्वाची धोरणांवर राणी या भाषणात बोलतील.
ब्रेक्झिटनंतर युरोपियन युनियनच्या नागरिकांचा युनायटेड किंगडममध्ये मुक्त संचार थांबवणे आणि लोकांना अधिक जलद आरोग्य सेवा देण्यासारखे महत्त्वाचे 22 कायदे या संसदेच्या सत्रात चर्चिले जाण्याची शक्यता आहे.
त्यातील काही मुद्दे राणींच्या भाषणात मांडले जातील, त्यानंतर त्यांनी मांडलेल्या मुद्यांवर चर्चा होईल. त्यानंतर मतदान घेतलं जातं. सरकारने हे मतदान गमावलं, असं क्वचितच घडतं. मात्र बोरिस जॉन्सन यांचा सत्ताधारी पक्ष हे मतदान गमावण्याची चिन्हं आहेत. तसं झालं तर सरकार अल्पमतात जाईल आणि निवडणुका वेळेआधीच आयोजित कराव्या लागतील.
राणींचं भाषण म्हणजे काय?
राणीच्या भाषणाद्वारे सरकारला आगामी काळात आपला प्राधान्यक्रम काय असेल, यासंदर्भात दिशा मिळते.
संसदेचं सत्र आणि पर्यायाने संसदेचं वर्षभराचं कामकाज राणीच्या भाषणाने सुरू होतं. राणीचं भाषण हा संसदीय शिष्टाचाराचा महत्त्वाचा भाग आहे. भाषणाआधी मिरवणूक निघते. निवासस्थानाहून म्हणजे बकिंगहम पॅलेसहून राणी वेस्टमिन्स्टरसाठी एका खास बग्गीतून रवाना होतात.
प्रथेनुसार राणीच्या भाषणापूर्वी 'हाऊस ऑफ कॉमन्स'च्या सदस्यांना हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये बोलावलं जातं. ही जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याला 'ब्लॅक रॉड' म्हटलं जातं. ब्लॅक रॉड हाऊस ऑफ कॉमन्सच्या दरवाज्यापाशी पोहोचतो, तेव्हा खासदार त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करतात. दरवाजा तीनवेळा ठोठावल्यानंतरच तो उघडला जातो. 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये कुठलाही शाही हस्तक्षेप न होऊ देण्याचं आणि आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक ही परंपरा आहे.
भाषणादरम्यान राणीकडून काही कायद्यांचा उल्लेख केला जातो. ही विधेयकं संसदेने पारित करावीत, असं सरकारला वाटतं. परंपरेनुसार खासदार आणि सभागृहातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे जाहीर केलं जातं.
सर्वसाधारपणे, राणीचं भाषण दरवर्षी एकदाच होतं. मात्र 21 जून 2017पासून राणीचं भाषण झालेलंच नाही. कारण आधीच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना असं वाटत होतं की संसदेच्या सत्राने दोन वर्ष ब्रेक्झिटवर लक्ष केंद्रित करावं.
राणींचं भाषण लिहितं कोण?
राणीचं भाषण मंत्रीमंडळ सदस्य लिहितात. राणी या भाषणाचं वाचन हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या पीठासीनावरून करते.
साधारणत: हे भाषण 10 मिनिटांचं असतं. प्रस्तावित विधेयकं, अन्य घोषणा म्हणजे परराष्ट्र धोरण, असं सगळं या भाषणात असतं.
राणी यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणी हे भाषण करू शकतं का?
राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी हे 64 वेळा भाषण केलं आहे. 1959 आणि 1963 मध्ये राणी या भाषणासाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत, कारण त्या तेव्हा गरोदर होत्या. त्यावेळी लॉर्ड चान्सलर यांनी त्यांचं भाषण वाचून दाखवलं होतं.
भाषणावर मतदान होतं का?
हो.
भाषण झाल्यानंतर काही तासात, सर्व खासदार भाषणावर चर्चा करण्यासाठी पुन्हा सभागृहात जमतात.
दोन खासदार स्वागतपर भाषण करतात. पंतप्रधान भाषण करतात. युकेची ध्येयधोरणं काय असतील, यासंदर्भात ते आराखडा मांडतात.
विरोधी पक्ष नेत्याला बोलण्याची संधी मिळते. त्यानंतर अन्य खासदारांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळते.
भाषणावर चर्चा 'हंबल अड्रेस' साधारण पाच दिवस चालते.
चर्चेच्या अखेरीस मतदान होतं. हे प्रतीकात्मक असतं कारण सरकार हे मतदान हरण्याची शक्यता कमी असते.
या मतदानात सरकारवर पराभवाची नामुष्की ओढवली तर?
राणींच्या भाषणावरचं मतदान गमावलं तर त्याचा अर्थ सरकारचा नवीन कायदे संमत करण्याचा प्रस्ताव संसदेने धुडकावला आहे.
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून बोरिस जॉन्सन यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सातवेळा मतदानात पराभव पत्करला आहे. सध्याच्या घडीला, विरोधी पक्षातील प्रत्येक खासदाराने सरकारविरोधात मतदान केलं तरी 45 मतांनी सरकारचा पराभव होऊ शकतो.
राणींच्या भाषणावरचं मतदान गमावल्यास बोरिस जॉन्सन यांच्यावर पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव असेल.
सरकारचा या मतदानात पराभव झाल्यास सार्वत्रिक निवडणुका वेळेआधीच होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्यासाठी आग्रह धरू शकतात, जेणेकरून सगळे खासदार त्यावर मत नोंदवू शकतात.
पर्यायाने, सरकार निवडणुका लवकर घेण्याची घोषणा करू शकतं. मात्र त्यासाठी दोन-तृतीयांश खासदारांची संमती आवश्यक आहे.
राणींच्या भाषणावर मतदान सरकारने शेवटचं कधी गमावलं होतं?
1924 मध्ये सरकारवर अशी नामुष्की ओढवली होती. त्यावेळी पंतप्रधानपद कॉन्झरर्व्हेटिव्ह पक्षाच्या स्टॅन्ले बाल्डविन यांच्याकडे होतं. राजे जॉर्ज पंचम यांच्या भाषणानंतरच्या मतदान सरकारला पराभव पत्करावा लागला होता. आधीच्या महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी बहुमत गमावलं होतं.
तेव्हा बाल्डविन यांनी राजीनामा दिला आणि अल्पमतातील मजूर पक्षाचं सरकार सत्तेत आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)