हाँगकाँग ते काश्मीर: प्रत्येक आंदोलनात दिसणाऱ्या Guy Fawkes मास्कची गोष्ट

मास्क

फोटो स्रोत, Getty Images

हाँगकाँग सरकारने आंदोलकांच्या मुखवटे किंवा मास्क घालण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी लाखो आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं.

हाँगकाँगच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी कॅरी लॅम यांनी सरकारविरोधातील असंतोष रोखण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातील आणीबाणी कायद्याचा वापर करण्याचं ठरवलं.

1 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनात हिंसाचार घडल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनादरम्यान 14 वर्षांच्या मुलाच्या पायाला गोळी लागली. सध्या त्याला तिएन मुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

आंदोलनकर्यांनी पेट्रोल बॉम्बसह हल्ला केल्यामुळे केलेल्या प्रतिकारादरम्यान तरूण जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

सध्या हाँगकाँगमधली निदर्शनं बऱ्यापैकी थांबली असली तरी काही भागात अजूनही तणावाचं वातावरण आहे.

शुक्रवारी काय घडलं?

मास्कवर बंदी घोषित झाल्यानंतर अचानक आंदोलनकर्ते रस्त्यावर गोळा झाले. निदर्शनात सहभागी होण्यासाठी अनेक जण आपल्या कार्यालयातून निघाले. पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करताच काही कट्टर आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद केले. चिनी झेंड्याला आग लावली. तर मेट्रो स्टेशन, बाजारपेठा बंद करण्यात आल्या.

मास्क

फोटो स्रोत, EPA

मास्कवर बंदी घातल्याच्य निर्णयाचा उघड विरोध दर्शवत आंदोलनकर्त्यांनाही मास्क घालण्यास प्रोत्साहित केले. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली असून दर आठवड्याला होणारी ही आंदोलनं सरकारची डोकेदुखी बनत चालली आहेत. त्यामुळे शहर उद्ध्वस्त होत चाललं असून हे रोखण्यासाठीच स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओळख उघड होणार

70 वर्षांपासून सुरू असलेल्या कम्युनिस्ट सरकारचा विरोध करण्यासाठी एकत्र आलो असल्याचं संतप्त आंदोलकांचं म्हणणं होतं. शेकडो आंदोलकांनी चेहऱ्यावर मास्क लावलं होतं. पण इथून पुढे आंदोलक आपला चेहरा लपवू शकणार नाहीत. अनोळखी असणं ही या आंदोलनातली महत्त्वाची बाब होती. पण आणीबाणीच्या कायद्यामुळे त्यांच्यावर निर्बंध येणार असल्याचं अनेकांना वाटतं.

पण हे मास्क आले तरी कुठून? आणि प्रत्येक आंदोलनात एकसारखेच मास्क का दिसतात?

'व्ही फॉर व्हेन्डेट्टा' मास्कबद्दल थोडंसं

गाय फॉक्स (Guy Fawkes) मास्क हे 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' चित्रपटापासून लोकप्रिय झाले. प्रस्थापित सरकारच्या विरोधाचं ते प्रतीक मानले जातात. जगभरात अनेक आंदोलनात याचा वापर करण्यात आला आहे. या मास्कमागची कहाणी जाणून घेऊ...

गाय फॉक्स (Guy Fawkes) मास्क हे 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' चित्रपटापासून लोकप्रिय झाले.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, गाय फॉक्स (Guy Fawkes) मास्क हे 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' चित्रपटापासून लोकप्रिय झाले.

न्यूयॉर्कपासून लंडनपर्यंत, सिडनीपासून बुकारेस्टपर्यंत जगभरात प्रस्थापित नेते, बँका, आर्थिक संस्था यांच्याविरुद्ध निदर्शनं केली जातात. टीव्हीवर ही आंदोलनं बारकाईने पाहणाऱ्या प्रेक्षकांना यामध्ये एक गोष्ट दिसून आली असेलच.

या आंदोलनात सहभागी होणारे आपल्या चेहऱ्यावर एक विचकट हास्य आणि छोट्या मिशा असलेलं मास्क लावतात.

विकीलिक्सचा संस्थापक ज्यूलियन असांजसुद्धा लंडन स्टॉक एक्सचेंज निदर्शनात सहभागी होण्यासाठी अशाच एका मास्कसह आला होता. पोलिसांनी त्याचा विरोध केल्यानंतर त्याने तो हटवला.

पहिल्यांदा हे मास्क 2008 मध्ये एका हॅकर समूहाने वापरलं होतं. पण त्यानंतर जगभरातील विविध आंदोलनात ते लोकप्रिय झालं.

ऑगस्ट 2018च्या एका आंदोलनादरम्यान काश्मीरमध्येही हे मास्क दिसून आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑगस्ट 2018च्या एका आंदोलनादरम्यान काश्मीरमध्येही हे मास्क दिसून आले होते.

हे मास्क 2006 मध्ये आलेल्या 'व्ही फॉर व्हेंडेट्टा' या चित्रपटात वापरण्यात आलं होतं. त्यामध्ये काही लोक एक चळवळ उभी करण्यासाठी एकत्र येतात आणि याचा वापर करतात. हा चित्रपट एका कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीत एका काल्पनिक फॅसिस्ट पक्षाचं राज्य संपवण्यासाठी लोक गाय फॉक्स यांना आपलं प्रेरणास्थान मानतात आणि म्हणून त्यांच्या नावाचं हे मास्क घालतात.

ब्रिटीश ग्राफिक्स कलाकार डेव्हिड लॉइड यांनी या मास्कचं मूळ चित्र रेखाटलं होतं. त्याचा वापर कादंबरीमध्ये करण्यात आला. लॉयड या मास्कची तुलना चे गव्हेरासोबत करतात. "अल्बर्टो कॉरडा यांनी काढलेल्या त्यांच्या फोटोनंतर चे गव्हेरा हे जगभरातील तरुणांचे फॅशन सिंबॉल बनले होते. गाय फॉक्स यांचा तो मास्क तसाच एक ब्रँड बनला आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)