You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान: हिंदू शिक्षकावर ईशनिंदेचा आरोप करत शाळेची तोडफोड
पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात एका हिंदू शिक्षकावर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला आहे.
या आरोपानंतर जमावाने संबंधित शिक्षकाच्या शाळेच्या इमारतीत तोडफोड केली. ही शाळा खासगी असून शाळेच्या मालकांच्या घरावरही हल्ला करण्यात आला आहे.
संतप्त जमावाने एका मंदिराची तोडफोड केल्याचा दावाही काही पाकिस्तानी पत्रकारांनी तसंच वेबसाईट्सनी केला आहे.
शाळेतल्या हिंदू शिक्षकांनी शिकवताना प्रेषित मोहम्मदांचा अपमान केल्याचा आरोप शनिवारी (14 सप्टेंबर) नववीतल्या एका विद्यार्थ्याने केल्याचं पत्रकार अली हसन यांनी सांगितलं.
या मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर ईश निंदा कायद्याच्या कलम 295 C नुसार कारवाई करत या शिक्षकाला अटक करण्यात आली.
या अटकेच्या निषेधार्थ रविवारी धार्मिक संघटनांनी जिल्ह्यामध्ये बंद पुकारला आणि अनेक ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले. घोटकीमधल्या कामकाजावर या आंदोलनाचा परिणाम झाला. अशाच एका निदर्शनादरम्यान एका गटाने शाळेच्या इमारतीवर हल्ला केला. तर दुसऱ्या एका गटाने शाळेच्या मालकांच्या घरावर हल्ला केला.
"हिंदू मंदिराची आणि शाळेची तोडफोड करणाऱ्या, हातात लाठी - काठ्या घेतलेल्या आंदोलकांचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत," असं पाकिस्तानी न्यूज वेबसाईट 'डॉन'ने म्हटलंय.
'अल्पसंख्याकांविरोधातली हिंसा क्रूर'
या प्रकरणातले आरोपी नूतन मल हे पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात येत आहे. गुंडगिरी करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध खटले दाखल करण्यात येतील, असं ट्वीट सिंध पोलिसांचे अतिरिक्त महानिरीक्षक जमील अहमद यांनी केलं आहे.
पाकिस्तानातल्या मानवाधिकार आयोगानेही या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी म्हटलंय, "प्रशासनाने हिंसा थांबवण्यासाठी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे. शेअर करण्यात आलेला व्हीडिओ अंगावर काटे आणणारा आहे. अल्पसंख्याक समाजातल्या कोणत्याही सदस्यासोबत जमावाने केलेली हिंसा क्रूर आणि अस्वीकारार्ह आहे."
टोरांटोमध्ये राहणारे पत्रकार अनीस फारुकी यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर करत म्हटलं आहे, "घोटकीमध्ये मुसलमानांच्या जमावाने हिंदूंवर आणि त्यांच्या देवळांवर हल्ला केला. भारतात एखाद्या मशिदीबाबत असं घडलं असतं तर पाकिस्तानने तातडीने भूमिका घेतली असती. याबाबतीतही ईशनिंदेचा गुन्हा दाखल करण्यात येणार का?"
यातील कोणत्याही व्हीडिओच्या सत्यतेची शहानिशा बीबीसीने केलेली नाही.
या प्रकरणातल्या आरोपी शिक्षकाविरोधात शनिवारी (14 सप्टेंबर) FIR दाखल करण्यात आला असून रविवारी (15 सप्टेंबर) त्यांना अटक करण्यात आल्याचं पाकिस्तानातल्या सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP)चे नेते आणि सिंध प्रांताचे माहिती आणि श्रम मंत्री सईद घनी यांनी सांगितलं आहे.
या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात येईल आणि आरोप खरे असल्याचं सिद्ध झाल्यास कायदेशीर खटला चालवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. लोकांनी शांतता पाळावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.
आपल्याला लोकांच्या भावनांचा आदर आहे, पण एखाद्या व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला आरोपी ठरवता येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
घोटकी शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंची संख्या सुमारे 30 टक्के आहे. तर एकूण जिल्ह्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या 20 ते 25 टक्क्यांदरम्यान आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)