You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानमध्ये काश्मीरचा मुद्दा सतत चर्चेत ठेवण्यामागे इम्रान खान यांची नेमकी अडचण काय?
- Author, हारून रशीद
- Role, ज्येष्ठ पत्रकार, इस्लामाबादहून बीबीसी हिंदीसाठी
काश्मीरचा मुद्दा रेटत, देशाच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेच्या मुद्याला बगल देण्याची खेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान खेळत आहेत.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित केलं.
भारताने जम्मू काश्मीर राज्याला असणारा विशेष दर्जा काढून ऐतिहासिक चूक केली आहे. या निर्णयाने काश्मीरच्या लोकांना स्वातंत्र्याची एक मोठी संधी प्राप्त झाली आहे, असं इम्रान म्हणाले.
भारताच्या निर्णयाने काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला आहे असं इम्रान यांनी सांगितलं. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी भाजप पक्षावर टीका करण्याऐवजी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्र सोडलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेमुळे काश्मीरप्रश्नी पाकिस्तानशी चर्चा करण्याचं टाळलं जात आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताला हिंदूराष्ट्र करायचं आहे, असं इम्रान म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कट्टरतावादी संघटना आहे असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांविरुद्ध आहे, असं पाकिस्तानला जगाला सांगायचं आहे.
इम्रान खान यांना भारतात एक खलनायक हवा आहे, ज्याच्यावर सगळा दोषारोप करता येईल. नरेंद्र मोदी सरकारला काश्मीरमध्ये शांतता नांदावी असं वाटत नाही, असं याद्वारे पाकिस्तानला म्हणता येईल.
इम्रान खान यांनी भारतात लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी नरेंद्र मोदी जिंकतील, असं भाकीत वर्तवलं होतं. मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले तर भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
म्हणूनच इम्रान मोदींच्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करत नाहीत, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करतात. असं करून ते पाकिस्तानात ते राजकीय फायदा उठवू इच्छितात. त्यांच्या बोलण्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टरतावादी संघटना आहे हे जगाला मान्य होईल असं त्यांना वाटतं.
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
पाकिस्तान आर्थिक तंगीला सामोरा जात आहे. या प्रश्नाला बगल देण्यासाठी इम्रान खान जाणीवपूर्वक काश्मीर आणि कलम 370चा मुद्दा रेटत आहेत. जेणेकरून सरकारवर होणारी टीका कमी होईल.
मात्र असं करून आर्थिक मुद्यावरचं लक्ष विचलित होईल असं मला वाटत नाही. कारण पाकिस्तान या समस्येने दररोज व्हिवळतो आहे.
मला असं वाटतं की ते पाकिस्तानला आशा दाखवून काश्मीरचा मुद्दा सहज सोडणार नाही असं ते सांगू पाहत आहेत.
त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे की आठवड्यातून अर्धा तास काश्मीरचा विचार करा. घरातून, कार्यालयातून बाहेर पडून भारताविरुद्ध आवाज उठवा असंही त्यांनी म्हटलं आहे.
इम्रान यांना हे एक राजकीय अभियान म्हणून चालवायचं आहे. काश्मीरच्या मुद्यावर अद्यापपर्यंत सर्वसामान्य पाकिस्तानचे नागरिक म्हणावं इतक्या संख्येने बाहेर पडलेले नाहीत. आतापर्यंत भारताला होणारा विरोध, टीका धार्मिक संघटनांकडून होते आहे.
भारत किंवा काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानमध्ये मोठं प्रदर्शन झालेलं नाही.
संयुक्त राष्ट्रांत जाण्यापूर्वी भारतावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दडपण आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सव्वाअब्ज मुसलमानांचं संयुक्त राष्ट्राकडे लक्ष आहे. संयुक्त राष्ट्र काश्मीरला मदत करतो की नाही याकडे त्यांचं लक्ष एकवटलं आहे.
काश्मिरी माणसं अडचणीत आहेत आणि त्यांना आधार देणं आपलं काम आहे. मी स्वत: काश्मीरचा राजदूत होऊन हा प्रश्न जगासमोर मांडेन. 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र बैठकीत काश्मीरची स्थिती जगाला सांगेन, असंही ते म्हणालेत.
पाकिस्तान कोणत्या थराला जाणार?
हे सगळं प्रकरण युद्धाच्या दिशेने गेलं तर दोन्ही देशांकडे आण्विक अस्त्रं आहेत आणि पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा अर्थ थेट युद्ध असा काढला जात आहे. मात्र पाकिस्तान युद्धाचा पर्याय स्वीकारेल असं वाटत नाही.
पाकिस्तान युद्ध लढण्याच्या स्थितीत नाही असे संकेत मिळत आहेत याचं कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत आहे. युद्ध त्यांना परवडू शकत नाही.
भारत, पाकिस्तान प्रशासित काश्मीर हिसकावून घेईल अशी भीतीही इम्रान यांना वाटत आहे.
पाकिस्तानला भारतापासून धोका आहे असं इम्रान वारंवार जगाला सांगत आहेत. दोन्ही देशांकडे आण्विक अस्त्रं आहेत. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला केला तर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात.
एकाकी पाकिस्तान
संयुक्त अरब अमिरातीपाठोपाठ बाहरीनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलं आहे. इस्लामी देशांमध्ये पाकिस्तान पिछाडीवर पडला आहे. इस्लामी देशांचा पाठिंबा नसताना बाकी देशांचा पाठिंबा मिळण्याची गोष्ट दूरच.
भारत मोठी बाजारपेठ हे अन्य देशांना माहिती आहे. प्रत्येक देशाचं हित यामध्ये आहे. पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करण्याचं टायमिंग अनोखं आहे.
पाकिस्तान यामुळे दुखावला आहे की आता त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. दुसऱ्या देशांना आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, सध्या या आघाडीवर भारत वरचढ ठरताना दिसतो आहे.
इम्रान खान राजकीय मोहीम म्हणून काश्मीरचा मुद्दा पुढे रेटू पाहत आहेत. मात्र त्यांच्याकडे अन्य पर्यायही आहेत. काश्मीरच्या मुद्यावरून टोकाला जाऊ अशी इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याची भाषा आहे. कोणत्याही थराला म्हणजे नेमकं कुठपर्यंत हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
पाकिस्तान पुन्हा कट्टरतावादाला खतपाणी घालणार का? यासाठी डावपेच तयार आहेत का?
पाकिस्तानवर एफएटीएफसह आंतरराष्ट्रीय संघटनांचा दबाव आहे. पाकिस्तान कोणता पर्याय निवडणार हे पाहणं रंजक आहे.
ही एक मोठी लढाई आहे. आठवडा-दहा दिवसात यावर कायमस्वरुपी तोडगा निघेल असं मला वाटत नाही. आता सगळ्यांचं लक्ष इम्रान संयुक्त राष्ट्रांत काश्मीरच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे आहे.
(बीबीसी प्रतिनिधी अभिमन्यू कुमार साहा यांनी केलेल्या बातचीतवर आधारित.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)