इम्रान खान: 'काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतासोबत युद्ध होऊ शकतं'

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून इम्रान खान यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक आघाडीवर दिवाळखोर देशांच्या यादीत समावेश होण्यापासून पाकिस्तान थोडक्यात बचावला आहे. मात्र अजूनही हे संकट पूर्णपणे दूर झालेलं नाहीये.

दुसरीकडे काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.

भारत सरकारनं जम्मू-काश्मिरची स्वायत्तता रद्द केल्यानंतर पाकिस्ताननं जगभरातल्या प्रत्येक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित केला. पण पाकिस्तानला यात म्हणावं तसं यश मिळालं नाही.

इम्रान खान यांना त्यांचे विरोधक 'यू-टर्न' पंतप्रधान म्हणतात. निवडणुकीत त्यांनी नवीन पाकिस्तान घडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात काहीच ठोस काम दिसत नाही.

"काश्मीरचा मुद्दा लक्षात घेतल्यास भारताविरोधात युद्ध होऊ शकतं," असं अल-जझीरा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी म्हटलं.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्ध होऊ शकतं का? दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये मोठा संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न इम्रान खान यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, "होय, दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकतं."

पाकिस्तानचे चीनशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण भारतासोबतचे संबंध तणावाचे आहेत.

या मुलाखतीमध्ये काश्मिरसंबंधी बोलताना इम्रान खान यांनी म्हटलं,"काश्मीरमध्ये गेल्या 6 आठवड्यांपासून 80 लाख मुस्लीम कैदेत आहेत. पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप करून भारत जगाचं लक्ष या मुद्द्यावरून विचलित करत आहे. पाकिस्तान स्वत:हून कधीच युद्धाची सुरुवात करणार नाही. याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. मी शांतताप्रिय माणूस आहे. मला युद्ध आवडत नाही. युद्ध कोणत्याच समस्येचं समाधान नाही, असं मला वाटतं."

'आम्हाला दिवाळखोर बनवण्याचे प्रयत्न'

त्यांनी म्हटलं, "दोन अण्वस्त्रधारी देश एकमेकांना भिडले तर काय होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्राकडे गेलो. जगातल्या सगळ्या प्रमुख व्यासपीठांवर आम्ही हा मुद्दा उपस्थित करत आहोत. आम्हाला यावर राजकीय तोडगा हवा आहे. पण युद्ध झालं तर हे प्रकरण भारतीय उपखंडापुरतं मर्यादित राहणार नाही. संपूर्ण जगावर याचा परिणाम होईल."

"आम्ही भारताशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण भारतानं आम्हाला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीत टाकण्याचे प्रयत्न केले. पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश झाला असता तर आमच्यावर अनेक निर्बंध लागले असते. भारत आम्हाला दिवाळखोर घोषित करण्यासाठी प्रयत्न करत आहे," असा आरोप इम्रान खान यांनी केला.

"भारत सरकारनं स्वत:च्या राज्यघटनेतील कलम 370 रद्द केलं आहे. भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदतील प्रस्तावाविरोधात जात बेकायदेशीररित्या काश्मिरचा स्वायत्त दर्जा रद्द केला आहे. या प्रस्तावात काश्मिरमध्ये जनमत घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भारतानं केवळ आंतरराष्ट्रीय कायदाच नव्हे, तर देशाच्या राज्यघटनेचं उल्लंघन केलं आहे," असंही इम्रान यांनी म्हटलं.

जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि यात कुणाचाही हस्तक्षेप मान्य करणार नसल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे.

इम्रान यांनी त्यांच्या सरकारच्या 1 वर्षाच्या कार्यकाळाविषयी सांगताना म्हटलं, "आम्ही त्या गोष्टी केल्या आहेत, ज्या मागच्या कोणत्याच सरकारनं केल्या नाहीत. पण रोम एका दिवसात तयार झालं नाही, अशी म्हण आहे. म्हणजे तुम्हाला मोठा बदल घडवून आणायचा असेल, तर तो एका दिवसात होत नाही. त्यासाठी वेळ लागतो. कोणत्याही सरकारच्या कामकाजाचं मूल्यांकन किमान 5 वर्षांनंतर होऊ शकतं. आमच्यासाठी पहिलं वर्ष सर्वांत कठीण होतं. पण लोकांना आता बदल जाणवत आहे. देश आता योग्य मार्गावर आहे."

'यू-टर्न न घेणारे मूर्ख असतात'

विरोधकांच्या टीकेवर इम्रान म्हणाले, "ते मला यू-टर्न पंतप्रधान म्हणतात, तेव्हा मला त्याचा आनंद होतो. कारण यू-टर्न न घेणारे लोक मूर्ख असतात. मूर्ख माणसं रस्त्यात आलेल्या अडथळ्यावर जाऊन आदळतील. पण बुद्धिवान माणूस आपल्या रणनीतीत सुधारणा घडवून आणतो."

काश्मीरच्या मुद्द्यावर भारत चर्चा करणार नसेल, तर पाकिस्तान काय करेल? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं, की आम्ही संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. यातून काहीतरी तोडगा निघेल, अशी आशा आहे. जगभरातल्या सगळ्या शक्तिशाली देशांशी आम्ही संपर्क करत आहोत. ज्या देशांना भारत म्हणजे बाजारपेठ वाटत आहे, त्यांना हे समजत नाहीये, की त्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर याचा परिणाम फक्त भारतावर नाही, तर संपूर्ण जगावर होईल."

अफगाणिस्तानमधी भूमिका

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि अमेरिकेदरम्यानची शांतताविषयक चर्चा रद्द झाल्याबद्दल इम्रान खान यांनी रशिया टुडेला मुलाखतीत भाष्य केलं. पाश्चिमात्य देशांकडून निधी मिळत राहावं यासाठी कट्टरपंथीयांना पाकिस्तान आश्रय देत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी फेटाळून लावला.

रशिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी म्हटलं,"अमेरिकेच्या नेतृत्वात पाकिस्ताननं दहशतवादाविरोधातल्या लढाईत सहभाग घेतला, तेव्हा देशातल्या 70 हजार लोकांनी जीव गमावला आणि 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालं. पण आम्हाला केवळ 20 ते 30 अब्ज डॉलरची मदत मिळाली."

"या युद्धात पाकिस्तानचं जितकं नुकसान झालं, तितकं दुसऱ्या कोणत्या देशाचं झालं नाही. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, अशीच पाकिस्तानची भूमिका आहे. आमच्या पूर्वीच्या अनेक सत्ताधाऱ्यांनी अफगाणिस्तान युद्धात सहभाग घेतला, हे दुर्भाग्य आहे. 9/11मध्ये आमची कोणतीही भूमिका नसताना आम्ही हे युद्ध का लढत आहोत?" असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)