You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुत्र्याला घोरपडीपासून वाचवण्यासाठी वृद्ध जोडप्यानं घातला जीव धोक्यात
आपल्या आवडत्या कुत्र्याला वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियातल्या वृद्ध जोडप्याने आपला जीव धोक्यात घातला. एका महाकाय घोरपडीच्या तावडीतून आपल्या कुत्र्याला त्यांनी सोडवलं. घोरपडीशी झालेल्या झटापटीत आजी-आजोबा जखमी झाले आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एका वृद्ध जोडप्यावर घोरपडीनं (गोएन्ना) हल्ला केला आहे. या घोरपडीपासून आपल्या कुत्र्याला वाचवण्याचा ते प्रयत्न करत असताना ही घटना घडली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
भारतात ज्या घोरपडी आढळतात त्याच वंशाच्या पण भिन्न प्रजातीच्या घोरपडी ऑस्ट्रेलियात आढळतात. भारताला घोरपडींना बेंगॉल मॉनिटर लिझार्ड असं म्हणतात तर ऑस्ट्रेलियातील गोएन्नांना ऑस्ट्रेलियन मॉनिटर म्हणतात. या घोरपडी भारतात आढळणाऱ्या घोरपडींच्या तुलनेत महाकाय असतात.
Queenslandमधील या हल्ल्यात 70 वर्षं वयाच्या आजोबांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
60 वर्षांच्या आजींच्या पायाला दुखापत झाली असून त्यांनाही दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे.
या हल्ल्यात जोडप्याच्या कुत्र्याला Jack Russellला गंभीर दुखापत झाली आहे.
गोएन्नाची लांबी 2 मीटरपर्यंत असू शकते. असं असलं तरी गोएन्नाच्या बहुतेक प्रजातींची लांबी 1 मीटरच्या आत असते. गोएन्ना क्वचितच माणसांवर हल्ले करतात.
हा एक भयंकर आणि विचित्र हल्ला होता, असं या घटनेचं वर्णन बचाव पथकाच्या टीमनं केलं आहे.
"या माणसाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याच्या उजव्या पायाचं हाड मोडल्याची शक्यता आहे. त्याच्या पायाच्या जखमेवरून गंभीर रक्तस्त्राव झाला आहे. त्याला खूप वेदना होत होत्या," असं रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यानं ABC न्यूजला सांगितलं.
"कधीकधी गोएन्ना उग्र रूप धारण करतात. हे त्या जोडप्याचं नशीब की, त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली नाही," दुसऱ्या एका कर्मचाऱ्यानं ABC न्यूला सांगितलं.
पण, हे काही नियमितपणे आढळत नाही, असं ते पुढे म्हणाले.
सुरुवातीला हा कुत्रा मरण पावला, असं म्हटलं जात होतं. पण नंतर ABC न्यूजनं सांगितलं की, कुत्रा हल्ल्यातून बचावला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)