You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन यांना मोठा झटका
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसप तय्यब अर्दोगान यांच्या पक्षाला राजधानी इस्तंबूलच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत परभव पत्कराला लागला आहे. एर्डोगन यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
इस्तंबूल शहराच्या महापौर निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून मुख्य विरोधी पक्षाचे उमेदवार अक्रम इमामोग्लू यांना 54% मतं मिळाली आहे.
इस्तंबूलच्या महापौरपदासाठी मार्च महिन्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये धक्कादायक निकाल लागल्याने सत्ताधारी एके पक्षाने या निवडणुकांवर आक्षेप घेतला. त्यामुळे ही निवडणूक रद्द ठरवण्यात आली आणि पुन्हा निवडणुका झाल्या.
पण याही वेळी विरोधी पक्षाचे उमेदवार अक्रम इमामोग्लू विजयी ठरलेत. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी पंतप्रधान बिनाली यिलड्रीम यांनी आपला पराभव मान्य केलाय. यिलड्रीम हे 2016 ते 2018 या कालावधीत तुर्कस्तानचे पंतप्रधान होते.
तर राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन यांनी विजयी इमामोग्लू यांचं अभिनंदन केलंय.
पण असं असलं तरी हा पराभव तुर्कस्तानातले गेल्या काही वर्षांतले सर्वांत शक्तीशाली नेते मानल्या जाणाऱ्या एर्डोगन यांच्यासाठी धक्कादायक मानला जातोय.
कारण 'इस्तंबूल जिंकणाराच टर्कीवर राज्य करतो,' हे मत त्यांनीच यापूर्वी व्यक्त केलं होतं. शिवाय पहिल्या निवडणुकीनंतर त्याचे निकाल अमान्य करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्याचा त्यांचा निर्णय चुकल्याचंही यातून सिद्ध झालं.
ही शहर आणि देशासाठीही नवी सुरुवात असल्याचं इमामोग्लू यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. "इस्तंबूलच्या इतिहासातलं एक नवं पान उलटलं जात असून यावर न्याय, समानता आणि प्रेमाची नोंद असेल."
असं म्हटलं जातंय की या विजयासोबत आता विरोधी रिपब्लिकन पीपल्स पार्टीने राष्ट्राध्यक्षांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच या पक्षाला इतका मोठा विजय मिळाला आहे.
मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये इमामोग्लू यांचा 13,000 मतांनी निसटता विजय झाला होता. पण यिलड्रीम यांनी हा पराभव मान्य करायला नकार दिला. या प्रक्रियेदरम्यान मतं पळवण्यात आली आणि अनेक मतपेट्यांवर लक्ष ठेवणाऱ्या निरीक्षकांना अधिकृत परवानगीच देण्यात आलेली नव्हती असा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. यानंतर इलेक्शन बोर्डाने पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
एके पक्षाच्या या पराभवामुळे आता पक्षातले मतभेद समोर येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे इमामोग्लू यांचा विजय साजरा करण्यासाठी त्यांचे शेकडो समर्थक त्यांचं वर्चस्व असणाऱ्या बेसिक्तासमध्ये जमले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)