You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुर्कस्तानात पुन्हा एर्डोगन यांची सत्ता, AK पार्टीलाही स्पष्ट बहुमत
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी आवश्यक स्पष्ट बहुमत मिळवल्याचं तुर्कस्तानच्या निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलं आहे.
रविवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या टप्प्यात एर्डोगन यांनी अजिंक्य आघाडी मिळवल्याचं आयुक्त सादी गुवेन यांनी सांगितलं.
तुर्कस्तानमध्ये रविवारी मतदान झाल्यानंतर लागेच मतमोजणी सुरुवात झाली. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार 99 टक्के मतमोजणी झाल्यानंतर एर्डोगन यांनी 53 टक्के मतं मिळवली असून त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी मुहर्रम इन्स यांनी 31 टक्के मते मिळवली आहेत.
राष्ट्राध्यक्षपद काबीज करण्यासाठी किमान 50 टक्के मतांची गरज असते.
या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदाबरोबरच संसद प्रतिनिधींचीही निवडणूक झाली होती. यातही एर्डोगन यांनी त्यांच्या AK पार्टीने बहुमत मिळवल्याचं सांगितलं आहे.
तुर्कस्तानने संपूर्ण जगाला लोकशाहीचा एक धडा दिला आहे, असं एर्डोगन यावेळी म्हणाले.
या निकालानंतर या प्रदेशावरच्या राजकारणावर नक्कीच मोठा प्रभाव पडणार आहे.
तुर्कस्तानमध्ये या निवडणुकानंतर एक नवी राज्यघटना अमलात येणार आहे, ज्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या हाती आणखी शक्ती दिल्या जाणार आहेत.
टीकाकारांनी या तरतुदीला विरोध केला आहे. एका राज्यकर्त्याच्या हाती घटनात्मकरीत्या एवढी शक्ती देणं धोक्याचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. काही अपायकारक घडल्यास त्याला रोखण्यासाठी तुर्कस्तानच्या राज्यघटनेत पुरेशी तरतूद नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)