You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: भारत वि. अफगाणिस्तान: रोमहर्षक लढतीत भारताचा विजय
अफगाणिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात भारताचा 11 धावांनी विजय झाला. मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली.
वर्ल्ड कप स्पर्धेत पाच सामन्यात पाच पराभव पदरी पडलेल्या अफगाणिस्तानने टीम इंडियाला 224 धावांवरच रोखलं. छोट्या पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा निम्मा संघ माघारी परतला आहे. त्यांची 5 बाद 130 अशी अवस्था आहे.
गुलबदीनने 27 तर हझरतुल्ला झाझाईने 10 धावा केल्या. रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी पडझड थांबवत सनसनाटी विजयासाठी पायाभरणी केली आहे.
जसप्रीत बुमराहने एका ओव्हरमध्ये दोन विकेट्स मिळवत अफगाणिस्तानला अडचणीत टाकलं. युझवेंद्र चहलने अशगर अफगाणला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कर्णधार विराट कोहलीने 67 तर केदार जाधवने 52 धावांची खेळी केली आहे. अफगाणिस्तानतर्फे गुलबदीन नईब आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहम्मद शमीने हझरतुल्ला झझाईला त्रिफळाचित केलं. त्याने 10 धावा केल्या. रशीद खान, मोहम्मद नबी, रहमत शाह आणि मुजीब उर रहमान या फिरकी चौकडीने टीम इंडियाच्या बॅटिंगला वेसण घातली.
अफगाणिस्तानने सातत्याने विकेट्स मिळवत टीम इंडियाला अडचणीत टाकलं आहे. रशीद खानने महेंद्रसिंग धोनीला बाद केलं. 52 चेंडूत 28 धावांची संथ खेळी करून धोनी परतला. कोहली बाद झाल्यानंतर धोनीकडून टीम इंडियाला अपेक्षा होत्या. टीम इंडियाने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे.
भारत आणि अफगाणिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. मात्र मोहम्मद नबीने त्याला बाद केलं. विराटने 67 धावांची खेळी केली.
रशीद खानच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं. रहमत शहाच्या गोलंदाजीवर स्विप करण्याचा विजयचा प्रयत्न फसला. त्याने 29 धावा केल्या.
मुजीब उर रहमानने रोहित शर्माला बाद केलं. आफ्ताब आलमच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलला जीवदान मिळालं. याचा फायदा उठवत राहुलने सावधपणे खेळण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप करण्याचा राहुलचा प्रयत्न हझरतुल्ला झाझाईच्या हातात जाऊन विसावला.
मोठी खेळी करण्याची संधी असताना राहुलने विकेट गमावली.
पहिल्यावहिल्या विजयासाठी संघर्ष करणाऱ्या अफगाणिस्तानसमोर भन्नाट फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचं आव्हान आहे.
टीम इंडियाने 4 मॅचेस खेळल्या असून त्यापैकी तीन जिंकले आहेत तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे एकूण 7 गुण भारताकडे आहेत.
दुसरीकडे, अफगाणिस्तानने स्पर्धेत आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, मात्र त्यांची गुणांची पाटी कोरी आहे. त्याशिवाय, संघ, व्यवस्थापन, बोर्ड यांच्यातला बेबनाव उघड झाल्यामुळे अफगाण कॅम्पमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे.
खेळपट्टी आणि हवामान
साऊथहॅम्पटनची खेळपट्टी बॅटिंगला पोषक आहे. टॉस जिंकून धावांचा डोंगर उभारायचा आणि या धावसंख्येचा बचाव करणं हे टीम इंडियाचे डावपेच असू शकतात.
हेड टू हेड
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांसमोर आलेले नाहीत. मात्र या संघांमध्ये आजवर दोन वनडे झाल्या आहेत. यापैकी एक टीम इंडियाने जिंकली आहे तर दुसरी मॅच टाय झाली होती. टाय मॅचचा इतिहास लक्षात घेता टीम इंडिया अफगाणिस्तानला कमी लेखणार नाही.
ऋषभ खेळणार का?
शिखर धवन स्पर्धेबाहेर गेल्याने टीम इंडियात विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानविरुद्ध केएल राहुल सलामीला आला होता. चौथ्या क्रमांकावर राहुलऐवजी विजय शंकरच्या नावाला पसंती देण्यात आली होती. मात्र हाणामारीची षटकं लक्षात घेऊन, हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. विजय सहाव्या क्रमांकावर खेळला होता.
पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत विजयने गोलंदाजीत चमक दाखवली होती. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदला माघारी धाडण्याचं कामही विजयनेच पार पडलं होतं. त्यामुळे विजय शंकर अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल अशी चिन्हं आहेत.
दुसरीकडे आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ऋषभ पंत संधी मिळणार का, याविषयी उत्सुकता वाढली आहे. ऋषभ पंतचा समावेश करायचा झाला तर त्याला संघात कसं फिट करायचं हा यक्षप्रश्न आहे. ऋषभचा समावेश झाल्यास टीम इंडियाची फलंदाजी बळकट होऊ शकते, मात्र त्यासाठी संघाचं स्थिर समीकरण बदलावं लागेल.
भुवीऐवजी शमी
मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे भुवनेश्वर कुमार दोन ते तीन सामने खेळू शकणार नाही. भुवीच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी संघात परतेल. टीम इंडियाने दोन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनर अशा संरचनेसह खेळण्याचा निर्णय घेतल्याने शमीला संघाबाहेर बसावं लागलं होतं.
भुवी दुखापतग्रस्त झाल्याने आता शमीला संधी मिळेल. सातत्याने विकेट्स मिळवण्यात शमी वाकबगार आहे.
बुमराह आणि शमीची जोडी अफगाणिस्तानसाठी अडचणीची ठरू शकते. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
रोहित-राहुलची जोडी
शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आता सलामीवीराच्या भूमिकेत पक्का झाला आहे. ढगाळ वातावरणात, स्विंग होणाऱ्या परिस्थितीत चांगल्या गोलंदाजीसमोर कामगिरीत सातत्य राखण्याचं आव्हान राहुलसमोर आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत राहुलने 57 धावांची खेळी करत तसंच रोहितबरोबर सलामीला शतकीय भागीदारी करत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.
रोहित शर्मा उत्तम फॉर्मात असून, त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी आहे. राहुल-रोहित ही सलामीची जोडी आणि विराट कोहली या त्रिकुटाकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत.
अफगाणिस्तानची अधोगती
या स्पर्धेत संघ म्हणून अफगाणिस्तानची कामगिरी सर्वसाधारण झाली आहे. रन्स आणि विकेट्स अशा दोन्ही आघाड्यांवर अफगाणिस्तानचा संघ अपयशी ठरला आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असणारा रशीद खान सपशेल अपयशी ठरला आहे. मुजीब उर रहमानलाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
गुलबदीन नईबकडे स्पर्धेच्या काही दिवस आधी नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. या जबाबदारीला तो अद्याप सरावलेला नाही हे स्पष्ट होतं आहे.
हशमतुल्ला शाहिदी आणि हझरतुल्ला झाझाई यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
संघ
भारत: विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, विजय शंकर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
अफगाणिस्तान: गुलबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अशगर अफगाण, दावलत झाद्रान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झाझाई, इक्रम अलिखिल, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शेनवारी.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)