You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: सोशल मीडियावर चर्चा असलेल्या ऑरेंज जर्सीचं गुपित काय?
इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया ऑरेंज जर्सीत खेळायला उतरणार का?
टीव्हीवर प्रक्षेपित होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सहभागी संघांना दोन रंगांचे किट सादर करावे लागतील असं पत्रक आयसीसीने जारी केलं. या नियमातून स्पर्धा आयोजित करणाऱ्या यजमान देशाला सूट देण्यात आली. उदाहरणार्थ यंदाचा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला एका किटमध्येच खेळण्याची सूट आहे.
आयसीसीच्या पत्रकानंतर बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांनी मुख्य किटसह पर्यायी किट लाँच केलं.
आयसीसीने दोन स्वतंत्र रंगांचे किट असा उल्लेख केला आहे. फुटबॉलमध्ये होम आणि अवे म्हणजेच घरच्या मैदानावर मॅच असताना 'होम जर्सी' तर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळताना 'अवे जर्सी' परिधान करून खेळतात. मात्र आयसीसीने होम आणि अवे जर्सी असा उल्लेख केला नाही.
दरम्यान न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांच्या जर्सीचा रंग अन्य कोणत्याही संघांच्या जर्सीशी मिळताजुळता नसल्याने त्यांना पर्यायी किटची गरज नसल्याचं स्पष्ट झालं.
आयसीसीच्या पत्रकानुसार, निळा आणि हिरवा रंग जर्सीत असणाऱ्या संघांनाच पर्यायी जर्सी परिधान करावी लागेल हे स्पष्ट झालं.
पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार भारतीय संघ अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध ऑरेंज जर्सीत खेळायला उतरेल. कारण अफगाणिस्तान आणि इंग्लंड दोन्ही संघांच्या जर्सी निळ्या रंगाच्या आहेत. मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडिया नेहमीच्या निळ्या रंगाच्या जर्सीतच खेळायला उतरली होती.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या पर्यायी जर्सीबाबत कोणतीही घोषणा केलेली किंवा ट्वीट केलेलं नाही.
मात्र सोशल मीडियावर टीम इंडियाच्या या ऑरेंज जर्सीचे कथित फोटो अनेकांनी सोशल मीडियावरून शेअर केले.
पाकिस्तान संघानेही अद्याप पर्यायी जर्सीबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा पर्यायी जर्सी लाँच केलेली नाही.
दोन्ही संघांच्या जर्सीज एकाच रंगाच्या असतील तर चाहत्यांचा गोंधळ उडू नये म्हणून फुटबॉलसह अनेक खेळांमध्ये दोन जर्सी वापरल्या जातात.
क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नेहमीच्या हिरव्या रंगाच्या जर्सीच्या बरोबरीने पिंक जर्सी वापरली आहे. ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरुकता वाढवण्यासाठीच्या अभियानाला पाठिंबा म्हणून ही जर्सी वापरली जाते.
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पर्यावरण स्नेही हलकया हिरव्या रंगाची जर्सी परिधान करतो.
दरम्यान दक्षिण-आफ्रिका-बांगलादेश सामन्यात दोन्ही संघांच्या जर्सी निळ्याच रंगाच्या होत्या. मात्र बांगलादेशने त्यांची पर्यायी जर्सी वापरली नाही.
टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑरेंज जर्सीसह खेळणार असं वृत्त काही वर्तमानपत्रांनी दिले आहे. जर्सीची निर्मिती करणारी कंपनी नाईके तसंच बीसीसीआय, संघव्यवस्थापन यांच्यातर्फे कोणीही पर्यायी जर्सीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)