फेसबुक लिब्रा : मार्क झुकरबर्ग आता बिटकॉईनसारखं चलन आणून काय करू पाहत आहेत?

- Author, रॉरी सेलन-जोन्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
फेसबुकच्या मन्लो पार्क मुख्यालयातली एखादी लहानशी टीम काही काळासाठी कशावरतरी काम करते आणि मग त्याचा नाद सोडून दुसरं काहीतरी हाती घेतलं जातं - त्यातला हा प्रकार नाही, अशी कुजबूज आहे. हे प्रकरण वेगळं आहे.
जगभरातील लोकांमध्ये संपर्काचं एक नवं माध्यम तयार केल्यानंतर फेसबुक आता अख्ख्या जगासाठी एक नवीन चलन निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय. हे फेसबुकचं आणि पैशाचंही भविष्य आहे.
फेसबुकच्या लिब्रा नावाच्याया नवीन क्रिप्टोकरंसीद्वारे फेसबुक मेसेंजर तसंच व्हॉट्सअॅपवरून लोक एकमेकांना पैसे पाठवू शकतील.
यामध्ये पेमेंट्सच्या क्षेत्रातील पेपॅल आणि व्हिसा, टॅक्सी अॅप कंपन्या उबर आणि लिफ्ट, काही मोठे गुंतवणूकदार, असे सगळे दिग्गज सहभागी आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि फायनान्सच्या जगतातल्या सगळ्या सुपरहिरोंनी एकत्र येऊन हा खूपच महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय. त्यामुळे टेक्नॉलॉजीमधला ऍव्हेंजर्स एन्डगेम काहींना वेडेपणाचाही वाटू शकतो.

फोटो स्रोत, Facebook
आत्ताच्या चलन प्रणालीतील अनेक चुका दुरुस्त करत अब्जावधी लोकांना पैशांच्या वापरासाठीचं अधिक स्वातंत्र्य देण्याचा हा प्रयत्न असल्याचं फेसबुकच्या डेव्हिड मार्कस यांनी सांगितलं. पण लिब्राविषयी अनेक प्रश्नं विचारले जात आहेत.
आणि एवढे प्रश्नं की आता अमेरिकेच्या एका खासदाराने विनंती केली आहे की US संसदेने या प्रकल्पाची सुरक्षितता तपासल्याशिवाय फेसबुकने हा प्रकल्प सामन्यांसाठी लाँच करू नये.
"मी फेसबुकला विनंती करते की त्यांनी आम्हाला आधी हे क्रिप्टोकरंसी कितपत सुरक्षित आहे, हे पडताळू द्यावं. नंतर नियमन संस्थांच्या शिफारसींनुसार कंपनीने याबाबतीत पुढे जावं," असं डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार मॅक्सीन वॉटर्स म्हणाल्या.
त्यातल्या त्यात आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे - कशाला? म्हणजे नवीन जागतिक चलनाची गरज काय आहे? आणि आपल्याला ते खरंच फेसबुककडून हवंय का?
हे चलन कुणासाठी?
लिब्रा मिशन स्टेटमेंटमध्ये असं म्हटलंय की जगभरातल्या 1.7 अब्ज लोकांकडे बँक खाती नाहीत आणि त्यांना त्यांच्या नातेवाईकांना पैसे पाठवणं खूप खर्चिक पडतं, त्यामुळे ही नवीन कामी येईल. पण यामुद्द्यावर आधीच केनियामधील एम-पेसा (Mpesa) किंवा वर्ल्डरेमिट (WorldRemit) सारखे टेक्नॉलॉजी स्टार्टअप काम करत आहेत.
पण या मार्गाने हवाला किंवा मनी लाँडरिंगसारखे प्रकार होऊ नये, यासाठी लोकांची पडताळणी न करता क्लिष्ट बँकिंग व्यवहार लिब्रामध्ये कशाप्रकारे पार पडतील, तेसुद्धा अगदी स्वस्तात, हे मात्र अजून स्पष्ट नाही.
"मनी लाँडरिंगसाठीच्या नियमांचं पालन करणं हे सर्वात कठीण आणि खर्चिक भाग आहे," असं मनी ट्रान्सफर व्यवसायातील काही कंपन्यांसाठी काम केलेल्या एका व्यक्तीने सांगितलं.
आणि हे प्रश्नं फक्त केनियामधल्या बँक खाती नसलेल्या फेसबुक युजर्ससाठीच नाहीत तर अमेरिका आणि ब्रिटनसारख्या प्रगत आणि मोठ्या बाजारपेठांमध्येही लागू होतील. या देशांमध्येही कुणाचं खातं कोणतं, याची खातरजमा करण्यासाठी एक ओळखपत्र असं नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images
जर लिब्रामुळे लोकांना फोनवरून एखादा मेसेज पाठवण्यासारख्याच सोप्या पद्धतीने पैसे पाठवता आले, तर ते खूपच आकर्षक ठरेल. पण ते स्वस्तात आणि सुरक्षितपणे करणं, हेच मोठं आव्हान असेल.
हा खरंच जागतिक प्रोजेक्ट आहे का?
जगभरात आपल्या प्रतिमेवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांमुळे यंदा फेसबुक जरासं सावध खेळतंय. त्यांनी लिब्रा हा जागतिक कंपन्यांनी मिळून केलेला एक प्रकल्प असून आपण त्याचा एक भाग असल्याचं आवर्जून सांगितलं आहे.
फेसबुकने त्यांची इंटरनॅशनल अॅक्सेस स्कीम - इंटरनेट.ऑर्ग अशीच जागतिक प्रयत्नांतून करण्यात आलेलं उद्दिष्टं म्हणून सर्वांसमोर आणल्याचं टीकाकार लक्षात आणून देतात. पण नंतर यावरून वाद निर्माण झाले. भारतामध्ये फ्रीबेसिक्स नावाने आलेला हा प्रकल्प फक्त फेसबुकला प्रमोट करण्यासाठीच निर्मित करण्यात आला आहे, अशी टीका झाली. तेव्हापासून या प्रोजेक्टमधले इतर भागीदार यापासून दूर गेले.
लिब्रातून फेसबुकला पैसे कसे मिळणार?
यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी 'माफक' फी आकारण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलंय. उगाचच इथून तिथे पैसे पाठवून नेटवर्क स्पॅमिंग करण्यात येऊ नये म्हणजे हे करण्यात येत असल्याचं फेसबुकने म्हटलंय.
कॅलिब्रा या आपल्या उपकंपनीमार्फत फेसबुक काही कालांतराने युजर्सना इतर वित्तीय सेवा देईल, असाही अंदाज आहे.
पण यातून कंपनीला खरा फायदा होईल जेव्हा लोक अधिकाधिक वेळ फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर घालवतील, कारण मग त्यांना जास्त जाहिराती दाखवता येतील.
भागीदारांना यातून काय मिळणार?
या लिब्रा नेटवर्कमध्ये पैसे पाठवण्यासाठीचा एक भागीदार होण्यासाठी पेपॅल, मास्टरकार्ड आणि व्हिसा यांनी प्रत्येकी एक कोटी डॉलर्स मोजले असल्याचं सांगण्यात येतंय. तसं पाहिलं तर ही एक विचित्र गोष्ट आहे की या कंपन्या अशा एका प्रकल्पामध्ये सहभागी होऊ इच्छितात, ज्याची सुरुवात करणारी कंपनी आपण त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने त्याच क्षेत्रात काम करणार असल्याचा दावा करतेय.
पण या नेटवर्कमध्ये येणाऱ्या सगळ्या माहितीचा (डेटा) अॅक्सेस त्यांना मिळेल. यावरून त्यांना कुठे, किती खर्च होतोय, याविषयीची माहिती मिळेल.
ही क्रिप्टोकरन्सी कशी? आणि ब्लॉकचेनची गरज कशासाठी
फेसबुकचं असं म्हणणं आहे की फेसकॉईन ऊर्फ लिब्रामध्ये बिटकॉईनचे सगळे फायदे असतील, पण यातले तोटे टाळले जातील. मूळ क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच लिब्राही जागतिक पातळीवर असेल आणि बिटकॉईनप्रमाणेच तात्काळ काम करेल. पण यासोबतच लिब्रा सुरक्षित आणि स्थिर असेल. आणि हे उत्खननावर अवलंबून नसल्याने याचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही.
पण बिटकॉईनचे टीकाकार डेव्हिड जेरार्ड म्हणतात की लिब्राची अंमलबजावणी एक क्रिप्टोकरन्सी म्हणून का करण्यात येत आहे किंवा त्यासाठी ब्लॉकचेनची गरज का आहे, हे स्पष्ट नाही. कारण ब्लॉकचेनमध्ये या व्यवहारांमध्ये कुणाला बदल करता येणार नसले तरी ते सगळ्यांना पाहता येतील.
"साध्या कल्पनांना एखादं जादूई मार्केटिंग रूप देण्यासाठी साधारणपणे 'ब्लॉकचेन' शब्द वापरला जातो," ते म्हणतात. "पण लिब्रा ही सेवा लोकांकडून वापरली जाणार आहे, त्यामुळे ती वापरण्याजोगी आणि सोयीची आहे का, यावरून ती यशस्वी होते का पडते, ते ठरेल. "
कोणी यावर विश्वास का ठेवावा?
केंब्रिज अॅनालिटिका आणि इतर डेटा स्कँडल्स झाल्यानंतरही कुणी लिब्रा का वापरावं, हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. लोक त्यांच्या पैशांच्या बाबतीत फेसबुकवर विश्वास ठेवतील का? किंवा एखादं जागतिक चलन चालवण्यासाठी फेसबुकला महत्त्वाचं स्थान देतील का?
फेसबुकचं असं म्हणणं आहे की त्यांची कॅलिब्रा ही उपकंपनी आर्थिक आणि सामाजिक डेटा हा वेगळा ठेवणार असून ही सेवा वापरणाऱ्यांना त्यांच्या पैसे खर्च करण्याच्या सवयींवरून जाहिराती दाखवण्यात येणार नाहीत.
शिवाय हा मार्क झुकरबर्गचा जगावर राज्य करण्याचा प्रयत्न नसून जागतिक कंपन्यांनी एकत्र येऊन केलेला प्रयोग आहे, हे मुख्य कारण सांगितलं जातंय.
"यासाठी फेसबुकने पुढाकार घेतलाय, हे खरं आहे, " मार्कस मला सांगतात. "पण जेव्हा पुढच्या वर्षी लिब्रा मार्केटमध्ये दाखल होईल, तेव्हा हा फेसबुकच्या मालकीचा प्रोजेक्ट नसेल. आम्हाला इतर भागीदारांएवढेच हक्क असतील."
फेसबुकचं असं म्हणणं आहे की तुमचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल, पण तुम्ही व्हिसा, पेपॅल, उबर आणि इतरांवर विश्वास ठेवा. म्हणून मग जर कधी त्यांनी लिब्राचं कोणतं विशेष नाणं आणायचं ठरवलंही, तरी त्यावर मार्क झुकरबर्ग असेलच असं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
क्रिप्टोकरन्सी - एक घटनाक्रम:
ऑक्टोबर 2008: एका श्वेतपत्रिकेत बिटकॉईनचं वर्णन 'एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पाठवण्यात येणारं इलेक्ट्रॉनिक चलन' असं करण्यात आलं होतं. हा व्हाईट पेपर लिहिणाऱ्या सातोषी नाकामोटोची खरी ओळख कधीच सार्वजनिक झाली नाही.
जानेवारी 2009:बिटकॉन अस्तित्त्वात आलं. जेनेसिस ब्लॉकची (ब्लॉकचेनमधील पहिला ब्लॉक) निर्मिती. एका आठवडयानंतर विंडोज पीसीजसाठीचं सॉफ्टवेअर प्रसिद्ध करण्यात आलं. याच्या मदतीने बिटकॉनचं ट्रेडिंग करता येणं शक्य होतं. यानंतर सातोषी नाकामोटोने हॅल फिन्ने नावाच्या डेव्हलपरला 10 बिटकॉईन्स पाठवत पहिला व्यवहार केला.
ऑक्टोबर 2011: लाईटकॉईन नावाची दुसरी क्रिप्टोकरन्सी अस्तित्त्वात आली. बिटकॉईनच्या तुलनेत याचे व्यवहार लवकर होत होते.
फेब्रुवारी 2014: जगातलं सर्वात मोठं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज झालेल्या एमटी गॉक्सने दिवाळखोरी जाहीर करत हॅकर्सनी हजारो बिटकॉईन्सवर डल्ला मारल्याचं जाहीर केलं.
जुलै 2015: क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेमध्ये इथेरेम दाखल. ही डिजिटल करन्सी होती.
डिसेंबर 2017: फेसबुकचे सह-संस्थापक कॅमेरॉन आणि टायलर विंकलव्हॉस हे पहिले बिटकॉईन अब्जाधीश असल्याचं जाहीर करण्यात आलं. 2013पासून त्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. त्याच महिन्यामध्ये बिटकॉईनने तेव्हापर्यंतचा सर्वोच्च दर गाठला. हा दर होता 19,783 डॉलर्स.
डिसेंबर 2018: बिटकॉईनच्या दरात घसरण. बिटकॉईनने 3,300 डॉलर्सची पातळी गाठली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








