You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर कोण येणार?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
तब्बल सोळा वर्षांनंतर टीम इंडियासमोर वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचं आव्हान उभं ठाकलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी साकारणाऱ्या शिखर धवनच्या बोटाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याने धवन तीन आठवडे तरी खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे.
यामुळे धवनऐवजी कोणाला संधी मिळणार याविषयी चर्चा सुरू झाली मात्र प्रत्यक्षात संघ व्यवस्थापनाने धवनला संघातच ठेवण्याचा निर्णय घेतला. आयसीसी स्पर्धांमध्ये दिमाखदार कामगिरी नावावर असणाऱ्या धवनला गमावणे टीम इंडियाला परवडणारं नाही. दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत इंग्लंडला रवाना झाला आहे. मात्र तो अधिकृतरीत्या टीम इंडियाचा भाग नाही.
शिखरची जागा कोण घेणार?
शिखरच्या बोटाला झालेली दुखापत गंभीर असल्याने तो पुढचे 2-3 सामने खेळू शकणार नाही. शिखर नसल्याने चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या लोकेश राहुलला बढती मिळण्याची शक्यता आहे. राहुलने पदार्पणाच्या लढतीत सलामीला येत शतकी खेळी साकारली होती. मात्र त्यानंतर राहुलची बॅटिंग पोजिशन सातत्याने बदलत गेली आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये राहुलने सलामीवीर म्हणून छाप उमटवली आहे. शिखर-रोहित जोडी पक्की असल्याने वर्ल्ड कपमध्ये राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात येत होतं मात्र आता तो सलामीला परतेल अशी चिन्हं आहेत.
चौथ्या क्रमांकावर कोण?
वर्ल्ड कप संघ निवडीपूर्वी आणि नंतरही चौथ्या क्रमांकाबाबत प्रचंड चर्चा होती. ऋषभ पंतच्या नावाला पसंती मिळेल असं चित्र असताना दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांनी बाजी मारली होती. लोकेश राहुलला सलामीला बढती मिळाल्यास, चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा टीम इंडियासमोरचा यक्षप्रश्न आहे. विजय शंकर अष्टपैलू खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आवश्यक तंत्रकौशल्य त्याच्याकडे आहे. याव्यतिरिक्त तो बॉलिंग करू शकतो. त्याचं क्षेत्ररक्षण उत्तम आहे.
दुसरीकडे दिनेश कार्तिकचा पर्याय टीम इंडियाकडे आहे. कार्तिककडे प्रचंड अनुभव आहे. तो कामी येऊ शकतो. मात्र कार्तिक बॉलिंगमध्ये योगदान देऊ शकत नाही. महेंद्रसिंग धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवलं जाऊ शकतं. तसं झालं तर रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळू शकतं. फॉर्म बघता हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर खेळवावं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिखर नसल्यामुळे टीम इंडियाच्या बॅटिंग समीकरणांमध्ये बदल होणार हे निश्चित. मॉट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट तसंच जेम्स नीशाम यांनी भन्नाट वेग हे अस्त्र परजलं आहे. त्यांच्याविरुद्ध सावधपणे खेळावं लागेल.
गोलंदाजीत सुधारणा आवश्यक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने 352 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने तीनशेची वेस ओलांडली होती. मॅचच्या एका टप्प्यात ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणापुढे भारतीय गोलंदाज निरुत्तर वाटत होतं. न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीत सुधारणेची आवश्यकता आहे.
युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक ठरू शकतात. न्यूझीलंडच्या फलंदाजांची फिरकीविरुद्ध होणारी अडचण लक्षात घेता रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे.
न्यूझीलंडचा संघ जोरात
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या संघाने तीनपैकी तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यांनी अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यावर विजय मिळवला आहे. मॉट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन झंझावाती फॉर्मात आहेत. प्रचंड वेग आणि अचूकतेच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे.
जेम्स नीशामने बांगलादेशविरुद्ध पाच विकेट्स घेत कारर्कीदीतील सर्वोत्तम प्रदर्शनाची नोंद केली होती. ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम आणि मिचेल सँटनर या तिघांची साथ मिळते आहे. त्यामुळे भारतीय संघाला न्यूझीलंडच्या गोलंदाजांपासून सावध रहावं लागेल.
मार्टिन गप्तील आणि कॉलिन मुन्रो हे धडाकेबाज सलामीवीर न्यूझीलंडसाठी महत्त्वाचे आहेत. रॉस टेलर आणि केन विल्यमसन ही अनुभवी जोडगोळी न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा आहे. या दोघांची भारताविरुद्धची कामगिरी उत्तम आहे. टॉम लॅथमवर विकेटकीपिंग आणि बॅटिंग अशा दोन्ही जबाबदाऱ्या आहेत.
हेड टू हेड
भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड कपमध्ये सातवेळा समोरासमोर आले आहेत. भारतीय संघाने 3 तर न्यूझीलंडने 4 विजय मिळवले आहेत. त्यामुळे पारडं जवळपास समसमान आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना 2003 मध्ये झाला होता. तीन वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांसमोर आहे.
एकूण आकडेवारीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 106 सामने झाले आहेत. भारताने 55 तर न्यूझीलंडने 45 सामने जिंकले आहेत.
खेळपट्टी आणि वातावरण
नॉटिंगहॅमच्या मैदानावर या वर्ल्ड कपमध्ये तीन मॅचेस झाल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा 105 धावांतच ऑलआऊट झाला होता. दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानने 348 धावांचा डोंगर उभारला होता.
तिसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 बाद 38 स्थितीतून 288 धावांची मजल मारली. नॉटिंगहॅमची खेळपट्टी बॅट्समन आणि बॉलर्स दोघांनाही साथ देणारी आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. सूर्य तळपत राहून सामना व्हावा अशी टीम इंडियाची अपेक्षा आहे.
संघ
भारत-विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी दिनेश कार्तिक, विजय शंकर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार
न्यूझीलंड-केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, कॉलिन मुन्रो, टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, इश सोधी, मॅट हेन्री, टीम साऊदी.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)