You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
न्यूझीलंड मशीद हल्ला : मृत मुस्लिमांच्या नातेवाईकांना पंतप्रधान अशा भेटल्या
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च इथं 2 मशिदींमध्ये झालेल्या हल्ल्यात 50 जणांचा बळी गेल्यानंतर जगभरातून दुःख व्यक्त होत आहे. पण या घटनेनंतर एका छायाचित्र नकारात्मक वातावरणात आशेचं किरण जागृक करत आहे.
हा फोटो आहे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांचा. देशात मुस्लीम आणि निर्वासित यांच्याबद्दल तयार होत असलेल्या तिरस्काराच्या वातावरणात आर्डन या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना भेटून जगासाठी मानवतेचा संदेश दिला आहे.
या मुस्लीम कुटुंबीयांना भेटताना त्यांनी हिजाब परिधान केला होता. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची गळाभेट घेतली. त्यावेळी आर्डन यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. या फोटोवर ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'दहशतीच्या या काळात राजकारणातील मानवी चेहरा,' असा उल्लेख अनेकांनी केला आहे.
अनेकांनी उजव्या विचारांच्या राजकारण्यांनी जेसिंडा यांच्याकडून कारुण्य आणि प्रेम यांचे धडे घ्यावेत असा सल्लाही दिला आहे.
जेसिंडा आर्डन यांचे विचार
पीडित कुटुबीयांना भेटल्यानंतर त्या म्हणाल्या, "आपण विविधता, करुणा आणि दयेचे प्रतिनिधित्व करतो. जे लोक ही मूल्य मानतात त्या सर्वांचा हा देश आहे. ज्या निर्वासितांना गरज आहे, त्यांचाही हा देश आहे."
या भाषणानंतर जेसिंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या. गेल्या वर्षी पंतप्रधानपदावर असताना त्यांनी मुलीला जन्म दिला होता आणि संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेला त्या त्यांच्या बाळाला घेऊन गेल्या होत्या. एक महिला आणि एक आई असूनही आपण मोठी जबाबदारी सांभाळू शकतो, हा संदेश त्यांनी जगभरातील महिलांना दिला होता.
कोण आहेत जेसिंडा?
जेसिंडा 2017ला न्यूझीलंडच्या पंतप्रधान झाल्या. त्यावेळी झालेल्या निवडणुकांत देशात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यांना न्यूझीलंड फर्स्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. 28व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा पक्षात प्रभाव वाढत गेला. सुरुवातीला त्या डाव्या पक्षांशी संबंधित होत्या. न्यूझीलंडच्या पंतप्रधान हेलन क्लार्क यांच्या कार्यालयात त्यांनी काम केलं आहे. शिवाय ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे.
"उपाशी मुलं आणि या मुलांचे अनवाणी पाय पाहिले आणि मला राजकारणात येण्याची गरज भासू लागली," असं त्यांनी म्हटलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)