You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनमध्ये उईघूर मुस्लीम समुदायाला खरंच धोका आहे का?
चीनमध्ये काही अल्पसंख्याक मुस्लिमांना द्वेषपूर्ण वागणूक देण्याच्या प्रकरणावरून सरकारवर प्रचंड टीका होत आहे. या समुदायातील अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीला ऑगस्ट महिन्यात माहिती मिळाली की उईघूर तसंच इतर काही मुस्लीम समुदायातील लोकांना पश्चिम झिनजिआंग भागात ताब्यात घेण्यात आलं आहे. तिथे त्यांना "पुनर्शिक्षित" केलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
उईघूर कोण आहेत?
उईघूर हे बहुतांशी मुस्लीम आहेत. पश्चिम चीनमधील झिनजिआंग भागात साधारण 1.1 कोटी उईघूर आहे. सांस्कृतिकदृष्ट्या ते स्वतःला मध्य आशियाई भागातल्या लोकांशी साम्य असणारे सांगतात, आणि त्यांची भाषाही टर्कीच्या भाषेशी मिळतीजुळती आहे.
मात्र गेल्या काही दशकांत चीनच्या बहुसंख्याक हान चिनी लोकांनी झिनजिआंग भागात स्थलांतर केलं आहे. हा समुदाय तिथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाल्याने, आता उईघूर समुदायाला त्यांची संस्कृती आणि अस्तित्व धोक्यात असल्याची भीती वाटत आहे.
झिनजिआंग काय आहे?
हा भाग चीनच्या पश्चिम टोकाला आहे आणि हा देशाचा सगळ्यांत मोठा प्रांत आहे. या भागाच्या सीमेवर भारत, अफगाणिस्तान आणि मंगोलिया या देशांची सीमा आहे. तिबेटसारखाच हा स्वायत्त भाग आहे. याचा अर्थ कागदोपत्री तिथे स्वतंत्र प्रशासन आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्रीय सरकारकडून त्यांच्यावर अनेक बंधनं आहेत.
बीबीसीला आतापर्यंत कळलं?
या भागात प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे तिथून माहिती मिळवणं खूप अवघड आहे. मात्र आम्ही कसंतरी तिथे जाऊन आलो. तिथे आम्हाला अनेक छावण्या आणि पोलिसांचा फौजफाटा दिसला. त्या अधिकाऱ्यांनी सर्वांच्या फोनमध्ये काही संवेदनशील मजकूर तर नाही ना, याची खात्री केली.
बीबीसीच्या न्यूजनाईट कार्यक्रमात काही माजी कैद्यांची मुलाखत घेण्यात आली, ज्यांनी या भागातून कसातरी पळ काढला.
"आम्हाला तिथे झोपू द्यायचे नाही. आम्हांला तिथे कितीतरी तास टांगून ठेवायचे आणि मग आम्हाला मारहाण व्हायची. त्यांच्याकडे जाड रबराचे आणि लाकडाचे दंडुके होते. वायरपासून त्यांनी चाबूक तयार केले होते. टोचण्यासाठी सुया होत्या. नखं उपटण्यासाठी प्लायलर्स होते. ही सगळी शस्त्रं टेबलावर ठेवलेली असायची. कधीही त्यांचा वापर व्हायचा. मी अनेकदा लोकांना किंचाळताना ऐकलं आहे." असं ओमीर नावाच्या एका माजी कैदीने सांगितलं.
अझत नावाच्या आणखी एकाने सांगितलं, "ती रात्रीच्या जेवणाची वेळ होती. कमीत कमी 1,200 लोक रिकामे प्लॅस्टिकचे वाटं हातात घेऊन उभे होते. जर जेवण हवं असेल तर चीनच्या बाजूचे गाणे म्हणायची सक्ती होती. ते अगदी रोबोटसारखे वागत होते, जणू त्यांच्यात आत्मा वगैरे नव्हताच. त्यांच्यापैकी अनेकांना मी ओळखायचो. आम्ही एकत्र जेवायचो. पण आता ते असं वागत होते जणू काही ते जे करत आहे त्यांची त्यांना जाणीवच नव्हती. कार अपघातात वगैरै स्मृती गेल्यावर जशी अवस्था होते, तशी त्यांची अवस्था झाली होती."
मग उईघूर हिंसाचाराचं काय?
याशिवाय झिनजिआंग भागात आणि त्याभोवताली झालेल्या अनेक हल्ल्यांसाठी फुटीरतावाद्यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. या प्रदेशाची राजधानी असलेल्या उरुमकी शहरात जवळजवळ 200 लोक दंगलींमध्ये ठार झाले आहेत. यांच्यापैकी बहुतांश लोक हान चिनी समुदायाचे होते.
फेब्रुवारी 2017मध्ये पाच लोकांचा भोसकून खून करण्यात आल्यावर इथे गस्त वाढवण्यात आली होती.
चीनचं काय म्हणणं आहे?
ऑगस्ट 2018मध्ये जिनिव्हामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या एका सभेत चीनने अशी कुठलीही शिबिरं असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे.
मात्र झिंजिआंग भागातील लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी काही केंद्रं उभारण्यात आल्याचं दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सप्टेंबरमध्ये पत्रकारांना सांगितलं.
चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की "सरकार वांशिक कट्टरवाद्यांवर कारवाई करत आहे. हा सर्वांत योग्य मार्ग नसला तरी तो आवश्यक मार्ग आहे. जगातील इतर देशांनी फक्त टीकाच केली आहे, इतर कोणतीही कारवाई केलेली नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)