होळी : पैगंबरांच्या हवाल्याने मुस्लिमांना शांततेचं आवाहन

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

महंमद पैगंबर यांच्या जीवनातील एक कथा फार प्रसिद्ध आहे. तिचाच आधार उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगर पोलिसांनी घेतला असून होळीच्या निमित्तानं लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

ती कथा अशी आहे... मक्केत एक वृद्ध महिला नेहमी त्यांच्या अंगावर कचरा टाकत असे. पण ते काहीही न म्हणता कपडे साफ करून पुढे निघून जात. हा प्रकार बरेच दिवस सुरू होता. एक दिवस या वृद्ध बाईनं त्यांच्या अंगावर कचरा टाकला नाही. त्यावर पैगंबरांनी चौकशी केल्यानंतर त्यांना कळाले की ती बाई आजारी होती. त्यानंतर पैगंबर या महिलेच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तिच्या घरी गेले आणि मदतीची तयारी दाखवली. त्यानंतर ही महिला इतकी प्रभावित झाली की तिनं इस्लाम धर्म स्वीकारला.

पश्चिम उत्तर प्रदेशातला मुजफ्फरनगर हा जिल्हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजला जातो. 2013 मध्ये इथं झालेल्या दंगलीत 60 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

होळीच्या पार्श्वभूमीवर इथं पुन्हा हिंसा होऊ नये, या उद्देशानं जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनंत देव यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं असून ते इथल्या मशिदी आणि मदरशांत पाठवण्यात आलं आहे.

या निवदेनात लिहिलं आहे की, "तुम्ही महंमद पैगंबरांच स्मरण करत आगीने आग विझवण्याचा प्रयत्न करू नये. आग विझवण्यासाठी पाण्याची गरज असते. बुद्धिमत्ता आणि संयम यांची साथ सोडू नका, अन्यथा सैतान त्याचं काम करेल. जर एखाद्या लहान मुलाकडून किंवा मोठ्याकडून चूक झाली तर शांतता आणि संयम पाळा आणि होळीच्या शुभदिनावर शांतता कायम ठेवा."

बीबीसीशी बोलताना अनंत देव म्हणाले, "होळी हा हिंदूचा सण आहे. बऱ्याच वेळा रंग अंगावर उडाला किंवा मशीद, मदरशांच्या भिंतीवर रंग लागला तर वाद होतात. मुस्लिमांनी होळीच्या दिवशी संयम राखावा, यासाठी मी हे आवाहन केलं आहे. धार्मिक आणि सामाजिक सौहार्द राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, ही बाब त्यांच्या लक्षात यावी यासाठी मी हे आवाहन केलं आहे."

ते म्हणाले, "जर होळीच्या दिवशी एखाद्या मुस्लीम व्यक्तीच्या अंगावर रंग पडला किंवा एखाद्या भिंतीवर रंग पडला तर वाद होऊ नये. भिंतीवर किंवा अंगावर उडालेला रंग स्वच्छ होऊ शकतो. इतकं औदार्य, संयम, सहनशीलता, धैर्य आणि समज लोकांनी दाखवला पाहिजे. त्यासाठी मी महंमद पैगंबर यांच्या जीवानातील कथा उदाहरणा दाखल दिली आहे. यातून त्यांच्या आचरणाची प्रचीती येते."

हिंदू आणि मुस्लिमांकडून स्वागत

पोलिसांच्या या आवाहनाचं शहारातील हिंदू आणि मुस्लिमांनी स्वागत केलं आहे. मुजफ्फरनगरमध्ये मदरसा चालणारे मुसा कासमी म्हणतात, "महंमद पैगंबरांच्या जीवनतील कथा सांगून लोकांना समजवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आहे, ही चांगली बाब आहे."

पण ते म्हणतात, "असंच आवाहन हिंदूंनासुद्धा करायला हवं होतं. कारण होळी हिंदू साजरी करतात. त्यांना हुल्लडबाजी न करण्याचं आवाहन केलं पाहिजे, कारण मशिदींना झाकून ठेवणं हा काही पर्याय नाही. पण तरीसुद्धा हा प्रयत्न नक्कीच चांगला आहे."

हिंदूंनाही आवाहन करणार

यावर अनंत देव म्हणतात, "रमजान आणि बकरी ईदच्या दिवशी आम्ही अशाच प्रकराचं आवाहन हिंदूंनाही करणार आहोत. बकरी ईदला गटारात रक्त पाहून, कुत्र्याच्या तोंडात हाड पाहून लोक भडकतात. बकरी ईदला आम्ही हिंदूंना संयमाचं आवाहन करणार आहोत."

शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते संजय अरोरा यांनी हे निवेदन वाचलं आहे.

ते म्हणतात, "कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याचं दिशेनं पोलिसांनी चांगल पाऊल उचललं आहे. मी या विषयावर शहरात अनेकांशी बोललो आहे. सर्वांनी याकडे सकारात्मकदृष्टीनं पाहिलं आहे. कुणावर तरी रंग उडाला म्हणून परिस्थिती बिघडू नये. पोलीस अधीक्षकांनी चांगलं पाऊल उचलंलं आहे."

उत्तर प्रदेशातलं धार्मिकदृष्ट्या सर्वांत संवेदनशील शहर म्हणून मुजफ्फरनगरची ओळख आहे. गेल्या काही वर्षांतल्या सर्वांत मोठ्या दंगली इथंच झाल्या होत्या.

धार्मिक हिंसेच्या घटना सर्वसाधारणपणे सणासुदीच्या दिवशीच होतात. ही परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचे हे प्रयत्न म्हणजे चांगली सुरुवाती म्हणून पाहिली जात आहे.

स्थानिक पत्रकार अमित सैनी म्हणतात, "मुजफ्फरनगरमध्ये शांतता टिकवणं पोलिसांच्यादृष्टीनं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांना यात यश आलं आहे. पोलीस शांतता राखण्यासाठी विविध मार्ग शोधत आहे. त्याच दिशेनं हा एक प्रयत्न आहे."

अर्थात पोलिसांचे हे प्रयत्न किती यशस्वी होतात हे होळीनंतरच समजणार आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)