Brexit: ब्रिटनच्या अपयशावर युरोपियन महासंघ नाराज, पुढचा पर्याय काय?

ब्रिटनच्या संसदेमध्ये ब्रेक्झिटचा प्रस्ताव पुन्हा एकदा फेटाळण्यात आला. ब्रिटीश संसदेनं ब्रेक्झिट फेटाळल्यानंतर युरोपियन महासंघाच्या नेत्यांनी तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त करत ब्रेक्झिटचा प्रस्ताव फेटाळला जाणं निराशाजनक असल्याचं म्हटलं.

ब्रेक्झिटवर तोडगा काढण्यात आलेल्या अपयशाबद्दल अनेकांनी युकेला जबाबदार धरलं आहे. ब्रेक्झिटवर ब्रिटनच्या संसदेमध्ये काय निर्णय येणार याची त्यांना कल्पना होती. ब्रेक्झिट प्रस्ताव फेटाळला जाण्याची भीतीही त्यांना वाटत होती.

ब्रिटनच्या संसदेत ब्रेक्झिटवर निर्णय झाल्यानंतर युरोपमधील अनेक नेत्यांनी ट्वीट करून त्यांची निराशा व्यक्त केली. युरोपियन महासंघ आणि युकेमधील लोकांवर आणि व्यापारावर होणाऱ्या परिणामाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ब्रेक्झिट प्रस्ताव फेटाळून लावल्यानं महासंघ आणि युकेमधील लोक तसंच व्यापार वेदनादायक निराशेला सामोरे जातील असं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक्झिटबद्दल युरोपियन महासंघाच्या वतीनं वाटाघाटी करणाऱ्या मायकल बर्निअर यांनी युरोपचा कल नेमक्या शब्दांत मांडला. युरोपियन महासंघानं आपल्याकडून शक्य तितके प्रयत्न केले. या प्रश्नावर तोडगा काढणं युकेच्याच हातात होतं. आता या मुद्द्यावर आमच्याकडून कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत.

संसदेला विश्वासात न घेता मांडलेला प्रस्ताव

वाटाघाटी सुरू होण्यापूर्वीच ब्रिटीश संसदेनं काही ठरवलं नव्हतं. नेमकं कोणत्या प्रकारचं ब्रेक्झिट अपेक्षित आहे, याबद्दलही संसदेत कोणतीही चर्चा घेण्यात आली नव्हती. ब्रेक्झिट प्रस्तावावर खासदारांचं मत हे अंतिम असणार हे माहिती असूनही त्यांना विश्वासात घेण्याची तसदी घेतली गेली नाही, असं युरोपियन महासंघाचं म्हणणं आहे.

ब्रिटनच्या संसदेत थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट प्रस्तावावरून जो काही सावळागोंधळ झाला, त्यावरही युरोपियन युनियननं आश्चर्य व्यक्त केलं. ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधानांनी मुदतवाढ मागितल्यानंतरही पुन्हा काही आठवड्यांसाठी ब्रेक्झिट पुढे ढकलण्यात काय अर्थ होता, असा प्रश्नही युरोपियन महासंघानं उपस्थित केला आहे.

युरोपियन युनियनच्या कायद्यांनुसार थेरेसा मे यांनी मुदतवाढीसाठी औपचारिक परवानगी मागणं आवश्यक होतं. युरोपियन महासंघातील 27 नेत्यांनी एकमतानं त्यांच्या विनंतीला परवानगी दिल्यानंतरच मुदतवाढ मिळू शकली असती.

ब्रेक्झिटबद्दल युरोपियन महासंघातही मतभेद

ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्यासाठी युकेला काय सवलत द्यायची आणि कोणत्या अटींवर याबद्दल युरोपियन युनियनच्या नेत्यांमध्येही चर्चा झाली नव्हती. थेरेसा मे यांचा ब्रेक्झिट प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर बुधवारी राजदूतांच्या पातळीवर ही चर्चा सुरू झाली.

आतापर्यंत युरोपियन महासंघाकडून ब्रेक्झिटच्या मुदतवाढीसंदर्भात करण्यात आलेली सार्वजनिक विधानं ही वाटाघाटींचा एक भाग होती.

युरोपियन संसदेच्या आगामी निवडणुकांमध्ये युकेलाही आपला उमेदवार देण्यासाठी भाग पाडणं किंवा युकेचा महासंघातून बाहेर पडण्याचा प्रस्ताव 21 महिन्यांनी पुढं ढकलणं हा ब्रिटनच्या खासदारांवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नांचा भाग होता. या दबावतंत्रामुळं पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट प्रस्तावाच्या बाजूनं मतदान होईल, अशी आशा युरोपियन महासंघाला होती.

मात्र या प्रयत्नाला फारसं यश आलं नाही. ब्रेक्झिटचा प्रस्ताव या टप्प्यावर येईपर्यंत जर्मनी, फ्रान्स, आर्यलंड आणि अन्य युरोपियन देशांमधील प्राधान्यक्रमही बदलले होते.

युरोपियन महासंघातील देशांमध्येही अनेक मतभेद आहेत. जर्मनीला युकेला आपल्या नजरेसमोर ठेवायचं असलं, तरी सरकारनं आपल्या देशातील समस्यांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असं जर्मनीतील राजकीय नेत्यांचं मत आहे. फ्रान्सला कधी एकदा ब्रेक्झिट पार पडेल आणि हा घोळ संपेल असं वाटत आहे.

पुढचा पर्याय काय?

ब्रेक्झिट प्रस्तावावर नवीन सवलती मागण्यासाठी थेरेसा मे या पुढील आठवड्यात ब्रसेल्समधील युरोपियन महासंघाच्या नेत्यांच्या शिखर परिषदेला गेल्या तर काय? यावेळी युरोपियन महासंघातील नेत्यांमध्ये वेगवेगळी मतं पहायला मिळतील. नेत्यांना आपल्यामधील मतभेद बंद दरवाजा आड ठेवण्यात यश मिळालं, तरी त्याचा परिणाम पहायला मिळेलच.

युरोपियन महासंघातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मते महासंघ आणि युकेमधील चर्चा फार पुढे जाऊ शकणार नाही.

जर युरोपियन महासंघाला ब्रेक्झिटबद्दलच्या आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायचा असेल, तर तो एक राजकीय निर्णय असेल. महासंघातील 27 सदस्या देशांच्या नेत्यांनी मान्यता दिल्यानंतरच हा निर्णय प्रत्यक्षात येऊ शकतो.

ब्रेक्झिटचा प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर बर्निअर यांनी ट्वीट करून आपली चिंता व्यक्त केली. युकेमधील काही खासदारांमध्ये एक 'धोकादायक भ्रम' पहायला मिळत आहे. युरोपियन महासंघ आणि युकेमध्ये अजूनपर्यंत वेगळं होण्यासाठी अधिकृत करार झालेला नसतानाही काही खासदार ब्रेक्झिटनंतर युकेला स्थित्यंतराचा वेळ मिळू शकतो, असं दिवास्वप्नं पाहत असल्याचं बर्निअर यांनी म्हटलं होतं.

ब्रेक्झिटबद्दलचा टोकाचा प्रस्ताव टाळण्याची युरोपियन महासंघाची इच्छा असली, तरी त्यासाठी कोणतीही किंमत मोजायची त्यांची तयारी नाहीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)