व्हेनेझुएलाः 'मी निकोलस मडुरो यांची निष्ठावंत का झाले?'

    • Author, डॅनियल गार्सिया मार्को
    • Role, बीबीसी न्यूज मुंडो

व्हेनेझुएलात या दिवसांमध्ये 'चाविस्ता' म्हणजे सरकारच्या बाजूनं बोलणं अँगेला विलारिअलसाठी सोपं काम नाही. दिवसेंदिवस गहिरं होत चाललेलं आर्थिक संकट, भ्रष्टाचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप सरकारवर होत असले तरी 24 वर्षांची ही तरुणी राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांची कट्टर समर्थक आहे.

23 जानेवारी रोजी जुआन ग्युइडो यांनी स्वतःला अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये राजकीय गोंधळात वाढच झाली आहे.

अँगेलाचं घर व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसच्या गटायर उपनगरात आहे. तिचं कुटुंबही राजकीय विचारसरणींमध्ये विभागलं गेलं आहे. तिची आई 'चाविस्ता' म्हणजे 'चावेज समर्थक' आहे पण वडील मात्र चावेज समर्थक नाहीत.

हे एक मध्यमवर्गिय कुटुंब आहे. अँगेला तिचं समाजशास्त्रातलं शिक्षण पूर्ण करत आहे. एका सार्वजनिक उपक्रमात ती नोकरी करते आणि सध्याच्या सत्ताधारी पीएसयूव्ही म्हणजेच 'युनायटेड सोशालिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएला'ची ती सदस्य आहे.

मडुरो यांच्या सरकारची ती पाठराखण का करते तसंच सध्या देशाला आलेली राजकीय कुंठित अवस्था लवकर संपणार नाही असं तिला का वाटतं, याबद्दल तिनं बीबीसीशी बोलताना सांगितलं

या प्रश्नावर उपाय काय?

ती म्हणते, 'चाविज्मो' हाच चाविज्मोचा खरा शत्रू आहे. (व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेज यांनी ज्या पद्धतीने सरकार चालवले, विचारसरणी मांडली त्याला चाविज्मो म्हटलं जातं.) निवडणुकीसाठी आमच्याकडे उमेदवार नाही.

''या सध्याच्या परिस्थितीवर निवडणूक हेच उत्तर मला दिसतं. नवे नियम, नवी निवडणूक व्यवस्था तयार केली तरी आमचा विजयच होईल.

सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार असलेली खुली निवडणूक घेतली तरी आम्ही जिंकू शकतो. पण हे परदेशातल्या लोकांच्या लक्षातच येत नाही.

त्यांच्या असंतोषाचं भांडवल करणं त्यांना अवघड जाईल. पण आमच्याकडे मात्र शिस्त आहे. आम्ही उमेदवाराची निवड करतो. बास इतकंच! निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्याकडे तळागाळात जाऊन काम करणारं संघटन हवं. मला नाही वाटत विरोधकांकडे ते असेल.

चाविज्मोनं व्हेनेझुएलाचा समाज सांस्कृतीकदृष्ट्या बदलून टाकला आहे. तो चांगल्या अर्थानं की वाईट अर्थानं याची चर्चा मला करायची नाही. पण विरोधी पक्षांमधील लोकांना देशातील बदलते संकेत ओळखता आलेले नाहीत. जसा मडुरो सरकारचा लोकांशी संपर्क तुटला आहे तसा विरोधकांचाही तुटला आहे.''

आर्थिक पेच आणि असंतोष

सध्याच्या परिस्थितीमुळे एक प्रकारचं नैराश्य पसरलं आहे आणि लोक पुन्हा 'चाविज्मो'कडे वळले आहेत. आपल्या समर्थकांपेक्षा जास्त ऊर्जा चाविज्मोनं गमावली आहे.

काही लोक तर म्हणतात, 'ते चाविस्ता आहेत पण तसं सांगताना मला वेदना होतात'. देश सोडून जाणाऱ्या स्थलांतरितांचा चाविज्मोवर विश्वास उरलेला नाही. त्यांना आपला अपेक्षाभंग झाला असं वाटतं. पण चाविज्मोला विरोध करत बसत राहाण्यापेक्षा सर्व बाजूला सारून ते देश सोडत आहेत. ते सगळंच सोडून जातात आणि सगळंच गमावतातही.

विरोधी पक्षांचं राजकारण

व्हेनेझुएलामध्ये सामाजीक ध्रुवीकरण पूर्वीपासूनच होत होतं. ह्युगो चावेज यांनी ते राजकारणात आणलं.

लोकशाहीसाठी मतभिन्नता आवश्यक आहे. पण विरोधी पक्षांनी राजकारण सोडून जाण्याचा घेतलेला निर्णय ही मला समस्या वाटते. निकोलस मडुरो यांना आज विरोधक नाही. 2015मध्ये (यावर्षी नॅशनल असेम्ब्लीमध्ये विरोधकांना बहुमत मिळाले), काही लोक म्हणत होते, "त्या वेडसर माणसाला (मडुरो) राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातून बाहेर जाऊ द्या."

त्यानंतर मडुरो यांनी 2017मध्ये 'राष्ट्रीय कॉन्स्टीट्युएंट असेम्ब्ली' (म्हणजे राज्यघटना तयार करण्याचा अधिकार असलेली सभा) तयार करण्याचा प्रस्ताव दिला. पण विरोधकांनी त्यातही सहभाग घेतला नाही. त्यांनी विरोधाची जागा मोकळी सोडून देण्याचा निर्णय घेतला पण राजकारणात अशा मोकळ्या जागा राहात नाहीत.

आम्हाला सध्या हजारो समस्या भेडसावत आहेत. आम्ही जुन्याच प्रश्नांवर चर्चा करत बसलो आहोत आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवर अजून आमची चर्चा वळलेलीही नाही.

प्रगत देशातील समाज गर्भपात, महिलांचे अधिकार अशा विषयांवर चर्चा करत आहेत. काही लोक राजकारणालाच विसरले म्हणून या पातळीपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही.

मानवाधिकारांचे कथित उल्लंघन

नॅशनल गार्ड (व्हेनेझुएलाचे लष्कर) वरील आरोपांची चौकशी सुरू आहे. पण मला वाटतं ही प्रक्रिया व्हेनेझुएलाच्या नेहमीच्या न्यायालयीन व्य़वस्थेत अडकून पडली आहे.

(लोकांचा झालेला) छळ हा व्यवस्थेकडून झाला असेल किंवा तसं सरकारचं धोरण असेल असं मला वाटत नाही.

गरिब भागांमध्ये झालेल्या हत्या सुरक्षा दलांकडून झालेले असतील? यावर्षी येणाऱ्या बातम्यांवर मी विश्वास ठेवत नाही. यावर्षी सगळा प्रश्न फक्त माध्यमांमध्येच आहे असं मला वाटतं. कारण त्या समस्या मला रस्त्यांवर दिसत नाहीत. ते सीरियात झालं. इराकमध्ये झालं. मी कॅराकसमध्ये फिरते तेव्हा ते खरं नसल्याचं मला जाणवतं.

काही प्रदेशामध्ये अमली पदार्थाची तस्करी, भ्रष्टाचारासारखे प्रश्न कित्येक वर्षे होते. या भीतीच्या काळात सर्वात जास्त फायदा गुन्हेगारांनाच झाला असावा असं मला वाटतं.

चाविज्मोमुळं हे प्रश्न सुटले नाहीत. चांगली सामाजीक व्यवस्था निर्माण केल्यामुळं हिंसा कमी होऊ शकते अशी चाविज्मोची धारणा होती. पण तसं झालं नाही. उलट परिस्थिती अधिकच बिघडली. सरकारचं जिथं काहीच चालत नाही असे अनेक प्रदेश आहेत.

सरकारला पाठिंबा देणारे सशस्त्र गट

अशा गटांचं अस्तित्त्व मी नाकारत नाही. पण ते कुठून आले हे परदेशातल्या लोकांना समजत नाही. मी काही त्यांचं समर्थन करत नाही. राजकारण करण्यासाठी तुम्हाला शस्त्राची गरज लागत नाही. पण हे लोक कॅराकाझो (1989 साली सुरक्षा दलांनी दडपलेला उठाव)पासून शस्त्र बाळगत आहेत. व्हेनेझुएलातील राजकारणाची ती पद्धतच आहे. ते (म्हणजे शस्त्र बाळगणं) स्वसंरक्षणासाठी आहे.

मी 23 डी एनेरो या भागात (हा कॅराकसचा गरिब भाग आहे) जाऊन 'त्यांनी' काय करावं हे सांगण्याचं धाडसही करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला व्हेनेझुएला समजून घ्यावा लागेल. पूर्वीच्या सरकारांनी आम्ही लोकशाहीमध्ये अत्यंत चांगल्या स्थितीत होतो आणि 1960 आणि 70 च्या दशकामध्ये तेल व्यवसायाच्या भरभराटीमध्ये आर्थिक स्थैर्य आलं होतं असं सांगितलं होतं.

पण तरिही जुनी कर्ज भागवणं बाकीच आहे. तसेच सीमेवरील तस्करी भरमसाठ चलनवाढ हे काही या देशाला नविन नाही.

मी चाविस्ता का आहे असं विचारलं तर राजकीयदृष्ट्या दुसरं कोणीच (अस्तित्त्वात) नसल्यामुळं मी चाविस्ता आहे असं उत्तर देते.

भ्रष्टाचाराचे आरोप

व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. कारण इथं कायदेशीर गोष्टींची कमतरता आहे.

पैसे नसल्यामुळं आम्हाला भ्रष्टाचाराचा त्रास होत आहे. पण ज्यावेळेस भरपूर पैसे होते तेव्हा भरपूर भ्रष्टाचारही होता. आता पैसे नसल्यामुळं भ्रष्टाचार दिसायला लागला आहे.

गेल्या 20 वर्षांमध्ये PDVSAमध्ये (व्हेनेझुएलाची सरकारी तेलकंपनी)भ्रष्टाचार सुरू आहे. पण त्याचवेळेस मोफत सार्वजनिक शिक्षणही उपलब्ध करून देण्यात आलं होतं.

मी चाविस्ता का आहे?

कारण ते (इतर चाविस्ता) माझ्यासारखेच आहेत असं मला वाटतं. ते लोक माझा आदर करतात. मी माझ्या ब्लॉगवर काहीही पोस्ट करू शकते आणि त्यामुळं माझ्यावर हल्ला होत नाही.

प्रश्न, तंटे असले तरी आम्ही आमच्या देशाबद्दल एकच स्वप्न आणि स्पष्ट चित्र उराशी बाळगून आहोत. मला राजकारण नेहमीच आवडायचं आणि चाविज्मोनं मी शाळेत असताना राजकारणाचं दार उघडून दिलं.

विरोधी पक्षांमध्ये अत्यंत असहिष्णू लोक आहेत. असं नाही की आम्ही सगळे चांगले लोक आहोत आणि ते वाईट.

मी हुकुमशाहीला पाठिंबा देते म्हणून मी मरावं असं माझ्या कुटुंबातील काही लोकांना वाटतं.

ते चाविस्तांना गुन्हेगार, क्रूर, वाईट आणि समान हितसंबंधांचा गट मानतात, त्यातली मी नाही. जर विरोधक जास्त मोकळे असते तर कदाचित मी चाविज्मो नसते.

मी स्वतःला डावी समजते. मी मार्क्सवादी नाही. मी डावी समाजवादी आहे. सार्वजनिक संपत्तीवर माझा विश्वास आहे. चाविज्मोपेक्षा मी वेगळ्या डाव्या विचारांची आहे. पण माझे विचार सर्वात जास्त चाविज्मोच्या जवळ जातात.

चाविज्मोची टीकाकार

मला वाटतं चाविज्मो हा एखाद्या पुतळ्यासारखा अभंग आहे. ते दुसऱ्यांचे विचार स्वीकारत नाहीत. म्हणूनच तो इतका शक्तीहीन झाला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर जे तरूण मातृभूमीसाठी काम करतात तेच खरे तरूण मानणं.

तरूण लोकांनी मातृभूमीसाठी काम केलंच पाहिजे असं नाही. आमची पिढी ही 'सोनेरी पिढी' आहे असं चावेज म्हणायचे.

त्यानं अनेक विद्यापीठं सुरू केली. तिथं पंचविशीच्या उंबरठ्यावरील माझ्यासारखी अनेक मुलं शिकली, ज्यांना स्वतःची कार असावीशी वाटते. मी स्वतः काम करते. कार घेण्याइतके पैसे मिळवू शकते.

पण आता साधं जेवण मिळवण्यासाठीही पगार पुरत नाही. कुटुंबांबाबत चाविज्मो अत्यंत परंपरावादी आहे. प्रत्येक बाईनं 'आई' झालंच पाहिजे असं त्यांना वाटतं. मला हे आवडत नाही.

जर तुम्ही प्रगतीशील आहात किंवा डावे आहात तर त्यात .बदल होण्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल. चाविज्मोमध्ये महिलांचं प्रमाण सर्वाधीक आहे मात्र त्यांचे सामाजीक कार्यक्रम केवळ मातांनाच आधार देतात.

अमेरिकेचा लष्करी हस्तक्षेप

सध्याची स्थितीचे काही गंभीर परिणाम होतील, असं नाही वाटत. अमेरिकच्या हल्ल्याचं लॅटिन अमेरिकेत विनाकारण स्तोम माजवलेलं आहे आणि ते आमच्या देशावर स्वारी करतील असं सगळ्यांना वाटतं.

अमेरिकेला या देशात नक्कीच रस आहे तसंच ते दबावही आणत आहेत. पण व्हेनेझुएलामध्ये सीरिया, लिबियासारखा सुन्नी-शिया तीव्र द्वेष नाही.

आम्ही इथं एकमेकांना मारत नाही. पुर्वीपेक्षा इथं आता असहिष्णुता वाढली आहे पण आम्ही काही एकमेकांना मारत सुटलेलो नाही. भविष्यातही तसं होणार नाही. निवडणुका हेच त्यावर उत्तर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)