व्हेनेझुएला संकट : संयुक्त राष्ट्रांनी दिला धोक्याचा इशारा

संयुक्त राष्ट्रांनी व्हेनेझुएला धोक्याचा इशारा दिला असून व्हेनेझुएलातील स्थलांतरितांचं संकट हे 2015मध्ये निर्माण झालेल्या भूमध्यसागरी देशातल्या परिस्थिती सारखं गंभीर बनत असल्याचं म्हटलं आहे.

व्हेनेझुएलाची आर्थिकस्थिती बिकट होत चालल्याने अनेक लोक देश सोडू लागले आहेत. व्हेनेझुएलाच्या आजूबाजूच्या देशांनी सीमेवरील निर्बंध कठोर करायला सुरुवात केली आहे. पेरू या देशानंही शनिवारी सीमेवरील निर्बंध लादले आहेत.

2014पासून जवळपास 20 लाख नागरिकांनी व्हेनेझुएला सोडलं आहे.

व्हेनेझुएलामधील आर्थिक संकटामुळे तिथं अन्नधान्य, औषधं, जीवनावश्यक वस्तू मिळणंही कठीण झालं आहे. वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियाही होत नसल्याने लोक देश सोडू लागले आहेत. देशातच अडकून पडण्याची भीती निर्माण होत असल्याने अनेक जण बाहेर पडू लागले आहेत.

18 वर्षांचा जोनाथन झांब्रानो यांनी एएफपीला सांगितलं की, अनेक नागरिक पेरूकडे जात असून तो स्वतः गेली 5 दिवस चालत आहे.

शुक्रवारी अडीच हजार लोकांनी पेरूची सीमा ओलांडली असल्याचं या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. तसेच अनेक जण इक्वेडोर ओलांडून पेरूमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पासपोर्ट असल्याशिवाय पेरूमध्ये प्रवेश करता येणार नाही, असा नियम शनिवारपासून अंमलात येत आहे. यापूर्वी फक्त व्हेनेझुएलाच्या नागरिकांना ओळखपत्रावर पेरूमध्ये प्रवेश मिळत होता. त्यामुळे शुक्रवारी अनेक जण पेरूमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.

इक्वेडोरनेही असाच नियम केला होता. पण न्यायालयाने हा नियम संचाराच्या स्वातंत्र्याबद्दल असलेल्या प्रांतिक करारांचा भंग करणारा आहे, असा आदेश दिला आहे.

'मदत करणं कठीण'

व्हेनेझुएलाच्या नागरिकांना पेरू आणि इक्वेडरमध्ये स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.

सीमेवर कपड्यांच्या व्यवसाय करणाऱ्या जीयानेला जारामिलो म्हणाल्या, "व्हेनेझुएलातील नागरिकांबद्दल आम्हाला दुःख वाटतं. पण ते पेरूच्या नागरिकांचा रोजगार हिरावून घेत आहेत."

अशीच प्रतिक्रिया इक्वेडोरच्या गेरॅडो गुटैरेझ यांनी दिली. ते म्हणाले, "थोड अंतर चालतानाही व्हेनेझुएलातील 10 लोक दिसतात. आर्थिकदृष्ट्या मागास देशाला अनेक लोकांना मदत करणं शक्य होत नाही."

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनचे प्रवक्ते जोएल मिलमान म्हणाले, "या प्रदेशाला मदतीची गरज आहे, हेच या सर्व घटनांतून दिसून येते. भूमध्यसागरी देशांमध्ये ज्या पद्धतीने संकट निर्माण झालं तसंच संकट इथं निर्माण होतं असल्याचं दिसतं. कठीण वेळेचे रूपांतर कधी संकटात होईल हे सांगता येत नाही, म्हणून त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे."

इक्वेडर इथं सप्टेंबर महिन्यात 14 देशांची प्रांतिक परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समन्वय समिती स्थापन्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)