You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जाहीर सभेत 'ड्रोन हल्ला', व्हेनेझुएला राष्ट्राध्यक्ष 'थोडक्यात बचावले'
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माड्युरो एका कार्यक्रमात झालेल्या ड्रोन हल्ल्यातून बचावले आहेत. हा कोलंबियाने रचलेला आपल्या हत्येचा कट होता, असा आरोप माड्युरो यांनी केला आहे.
राजधानी कारकासमध्ये व्हेनेझुएलाच्या लष्कराच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माड्युरो बोलत होते जेव्हा काही स्फोटकं असलेल्या ड्रोन्सचा स्फोट झाला.
या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर सुरू होतं. त्यात स्पष्टपणे दिसून येतं की, अचानक मोठा आवाज आला आणि माड्युरो यांच्यासह मंचावर उपस्थित सर्वजण वर बघू लागले. याच वेळेस प्रसारणात ऑडिओ ठप्प झाला.
यानंतर थोड्या वेळाने मंचासमोर उभे असलेले सैनिक अचानक पळू लागले.
या संशयित हल्ल्यात राष्ट्राध्यक्षांना कुठलीही इजा झाली नाही, पण सात जवान जखमी झाले. व्हेनेझुएलन अधिकाऱ्यांनी सांगितलं की याप्रकरणी अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, कोलंबियाने माड्युरो यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत ते फेटाळले आहेत.
गोंधळात गोंधळ
"माड्युरो यांच्या हत्येचा हा प्रयत्न होता," असं दूरसंचार मंत्री जॉर्ज रॉड्रिग्ज म्हणाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेले दोन ड्रोन्सचा माड्युरो यांच्यापासून काही अंतरावर स्फोट झाला.
"एक काहीतरी वस्तू उडत आली आणि माझ्याजवळ तिचा स्फोट झाला, त्यानंतर काही क्षणातच दुसरा स्फोट झाला," माड्युरो नंतर राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले.
या स्फोटानंतर लगेच त्यांच्या सुरक्षारक्षकांनी बुलेटप्रूफ संरक्षणाने त्यांचा बचाव केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर झळकले.
आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेतल्या काही गटांकडे तसंच कोलंबियाकडे बोट दाखवलं आहे.
"मला काहीच शंका नाही" की कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष ज्वान मॅन्युएल सँटोस "यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता," असं माड्युरो म्हणाले. त्यांनी याआधीही अमेरिकेवर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा दिला नव्हता.
दरम्यान, दूरसंचार मंत्री रॉड्रिग्ज यांनी देशातल्या उजव्या विचारसरणीच्या विरोधकांकडे बोट दाखवलं आहे.
"ते निवडणुकीतही हरले आणि आता पुन्हा," रॉड्रिेग्ज म्हणाले. मे महिन्यात व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या ज्यात माड्युरो यांची आणखी सहा वर्षांसाठी प्रमुखपदी निवड झाली होती.
पण विरोधी पक्ष व्होलंटाद पॉप्युलर पार्टीचे नेते हॅस्लर इंग्लेसियास म्हणाले, "काय चाललं आम्हालाच नाही माहिती. हे जरा संशयास्पदच आहे... कारण जे विरोधकांनी गेल्या वीस वर्षांत करायचा प्रयत्न केला नाही, ते आज का करतील?"
सुरक्षा यंत्रणा आजूबाजूच्या भागाची तपासणी करत आहेत.
दरम्यान, Soldiers in T-shirts या एका छोट्या गटाने सोशल मीडियावर या कथित हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्ही दोन स्फोटकं लादलेले ड्रोन्स उडवले होते, पण सैन्याने ते गोळ्या मारून खाली पाडले.
त्यांनी या दाव्याचा कुठलाही पुरावा दिेलेला नाही.
गोंधळात गोंधळ वाढवत, आता घटनास्थळी असलेल्या अग्निशमन दलाने सरकारने दिलेल्या माहितीवर शंका व्यक्त केली आहे. "खरंतर एका शेजारच्या घरात गॅस टँकचा स्फोट झाला होता," असं तीन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असोसिएटेड प्रेस (AP)या वृत्तसंस्थेला सांगितलं. त्यांनी आणखी काही सांगण्यास नकार दिला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)