लोकसभा निवडणूक 2019 : 23 मे रोजी निकाल, 7 टप्प्यांत

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. सतराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होईल.

11 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. दुसऱ्या टप्पा 18 एप्रिलला, तिसरा टप्पा 23 एप्रिलला पार पडेल. चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे रोजी होईल. सहावा टप्प्यासाठी 12 मे आणि सातव्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होईल.

मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. सोळाव्या लोकसभेचा कालावधी 3 जूनला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचं, सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं.

निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही अरोरा यांनी जाहीर केलं. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिलला 7 मतदारसंघात, 18 एप्रिलला 10 मतदारसंघात, 23 एप्रिलला 14 मतदारसंघात तर 29 एप्रिलला 17 मतदारसंघात मतदान होईल.

पत्रकार परिषद इथे पाहू शकता -

पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघात मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 97 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 115 मतदारसंघ तर चौथ्या टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. पाचव्या टप्प्यांत 7 राज्यांतील 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यांत 7 राज्यांतील 59 मतदारसंघ आणि सातव्या टप्प्यांत 8 राज्यांतील 59 मतदारसंघात मतदान घेतलं जाईल.

आंध्र, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दमण-दीव, लक्षद्वीप, दिल्ली, चंदीगडमध्ये एकाच टप्प्प्यांत मतदान होणार आहे. कर्नाटक, मणिपूर, त्रिपुरा-दोन टप्प्यांत, आसाम-छत्तीसगढ-तीन टप्प्यांत, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा-चार टप्प्यांत मतदान होईल.

"जानेवारीपासून आम्ही निवडणुकांसंबंधी तयारी सुरू केली होती. आमच्या टीमने राज्यांचा दौरा करून निवडणूक घेण्यासंबंधीच्या तयारीचा आढावा घेतला. राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी तसंच पोलिस यंत्रणांसोबत चर्चा केली. केंद्रीय गृह मंत्रालयासोबतही बैठका घेण्यात आल्या," असं अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून सर्व पक्षांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. "मी राजकीय पक्ष आणि सर्व उमेदवारांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. आपण जरी वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित असलो, तरी आपला उद्देश हा भारताचा विकास आणि प्रगती आहे," असं पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

  • निवडणुकीचं वेळापत्रक तयार करताना राज्य शैक्षणिक मंडळांच्या परीक्षांचं वेळापत्रक, धार्मिक सण-उत्सव, हवामान यांचाही विचार करण्यात आहे.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 90 कोटी मतदार मतदान करतील. 2014 च्या तुलनेत यंदा 7 कोटी मतदार वाढले आहेत. अठरा-एकोणीस वर्षांचे दीड कोटी मतदार यंदा पहिल्यांदाच मतदान करतील. 8 कोटी 43 लाख नवीन मतदार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
  • यंदा 10 लाख पोलिंग बूथ स्थापन केले जातील. 2014 साली पोलिंग स्टेशनची संख्या 9 लाख होती. प्रत्येक पोलिंग बूथवर EVM चा दुरुपयोग टाळण्यासाठी VVPAT चा वापर केला जाईल.
  • EVM च्या सुरक्षेसाठीही काटेकोर बंदोबस्त केला जाणार आहे. EVM चं जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार आहे.
  • संवेदनशील भागांमध्ये सुरक्षेसाठी CRPF चे जवान तैनात केले जातील.
  • मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगानं हेल्पलाईन नंबर दिला आहे. 1950 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही, हे पाहिलं जाईल.
  • आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगानं अँड्रॉइट अॅप तयार केलं आहे. तक्रार केल्यानंतर 100 मिनिटांत संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळेल. तक्रार करणाऱ्या व्यक्तिला आपली ओळख गुप्त ठेवायची असेल, तर त्याला तशीही सवलत देण्यात येणार आहे.
  • माध्यमांचा सहभाग हा निवडणुकांमध्ये महत्त्वाचा. त्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी माध्यमांनी सकारात्मक भूमिका बजावण्याचं आवाहन अरोरा यांनी केलं.
  • सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचारावर निवडणूक आयोगाची नजर राहील. सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वं बनविली आहेत. फेसबुक आणि गुगलनंही सोशल मीडियावरील कन्टेन्टवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं अरोरा यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकाही सोबतच

लोकसभा निवडणुकीबरोबरच अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, सिक्किम आणि ओडिशा इथल्या विधानसभा निवडणुकाही होतील. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या बरोबर होणार नाहीत, अशी घोषणा अरोरा यांनी केली. जम्मू काश्मीरमध्ये निरीक्षण समिती पाठवली जाणार आहे, असं अरोरा यांनी सांगितलं.

राजकीय नेत्यांचे ट्वीट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'हुकूमशाही प्रवृत्तीच्या आणि संघराज्यविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्याची वेळ आता आली आहे,' असं ट्वीट केलं. नोटबंदी, बेरोजगारी, व्यापाऱ्यांचं नुकसान, वेगवेगळ्या समुदायांमध्ये वाढलेली तेढ याबद्दल उत्तरं मागण्याची हीच वेळ आहे, असंही केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर ट्वीट केलं. 130 कोटी भारतीय अधिक चांगल्या सरकारसाठी पात्र आहेत. नवीन सरकारनं घटनेचा सन्मान करावा. लोकशाही मूल्यांचा मान ठेवत सर्व समाजांची काळजी घ्यावी, असं मायावतींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सुरू झालेल्या विकासाच्या प्रक्रियेला अधिक गती देऊया, असं ट्वीट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी राज्यांत विधानसभा निवडणुका घेतल्या जात नसल्याबद्दल टीका केली आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुका वेळेवर होत नाहीयेत. पंतप्रधान मोदींच्या खंबीर नेतृत्वाची स्तुती करताना ही गोष्ट पण लक्षात घेणं आवश्यक आहे, असं ओमर अब्दुल्लाह यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)