You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Abhinandanची सुटका हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची प्रतिमा उजळवणारा निर्णय?
- Author, साद मोहम्मद
- Role, राजकीय विश्लेषक, बीबीसी हिंदीसाठी पाकिस्तानहून
14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPFच्या तुकडीवर हल्ला केला. त्यानंतर 26 ते 28 फेब्रुवारीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांवर हवाई कारवाई केली.
या कारवाईदरम्यान भारताचं एक मिग विमान पाकिस्तानात कोसळलं आणि या विमानाचे पायलट अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घेतलं.
पण पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत घोषणा की "शांततेचा संदेश म्हणून" भारतीय पायलटला सोडण्यात येईल आणि शुक्रवारी रात्री अभिनंदन भारतात परतलेही.
इम्रान खान यांनी उचललेलं हे पाऊल त्यांची प्रतिमा उंचावण्यास मदत करू शकतं का, हा प्रश्न आहे.
26 ते 28 फेब्रुवारीदरम्यानच्या कारवाईवर एकीकडे भारताच्या राजकीय नेतृत्वानं तातडीनं कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही. तर दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान याप्रकरणी सातत्यानं माध्यमांसमोर येत होते आणि प्रत्येक वेळी त्यांची भाषा युद्ध न करण्याची, शांततेचीच होती.
इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान यापूर्वी झालेल्या युद्धांचा आणि त्यातून झालेल्या हानीचा उल्लेख केला होता.
गुरुवारी संसदेत बोलताना त्यांनी क्युबा क्षेपणास्त्र संकटाचं उदाहरण दिलं. (सोव्हिएत युनियननं अमेरिकेविरोधात क्युबाविरोधात आपली क्षेपणास्त्र तैनात केली होती.)
हा तो काळ होता, जेव्हा संपूर्ण जगासमोर युद्धाचं संकट उभं होतं. एका बाजूला अमेरिका आणि रशियात तणाव निर्माण झाला होता. दुसरीकडे भारत-चीन दरम्यानही युद्ध सुरू होतं.
या सर्व पार्श्वभूमीवर इम्रान सातत्यानं हेच सांगत होते, की युद्ध हा कोणत्याही प्रश्नावरचा तोडगा नाही. त्यामुळे अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय हा इम्रान यांचं सकारात्मक पाऊल आहे.
अभिनंदन यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, ते केवळ युद्धबंदी आहेत आणि आपल्या देशासाठी काम करत होते. त्यामुळे अभिनंदन यांना सोडण्याचा इम्रान खान यांचा निर्णय राजकीयदृष्ट्या वाखाणण्याजोगा आहे.
या निर्णयामुळं भारत-पाकिस्तान संबंध सुधारू शकतात. या निर्णयामुळे इमरान यांच्या नेतृत्वाची उंची निश्चितच वाढली आहे.
इम्रान यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं
इम्रान खान माध्यमांना सामोरं जायला अजिबातच कचरत नाहीत. पंतप्रधान बनल्यापासून ते नियमितपणे माध्यमांशी संवाद साधताना दिसतात.
पंतप्रधान बनण्यापूर्वीही इम्रान खान आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी होते, एक यशस्वी क्रिकेटर होते. ज्या-ज्या देशांमध्ये क्रिकेट खेळलं जातं, त्या-त्या देशांमध्ये इमरान यांच्या नावाला वलय आहे. आपल्या या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीचा ते पुरेपूर फायदाही करून घेतात.
ते लोकांचे नेते आहेत आणि आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेत राजकारणात यशस्वीही झाले आहेत.
सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जो तणाव आहे, त्याचा परिणाम पाकिस्तानवरही झाला आहे. त्यामुळं इम्रान खान सरकारला सध्याच्या परिस्थितीत शांतता हवी आहे.
जे प्रश्न आहेत, ते चर्चेच्या माध्यमातून सोडविले जावेत, अशी पाकिस्तानी पंतप्रधानांची इच्छा आहे. ते कोणतीही प्रक्षोभक वक्तव्यं करत नाहीयेत. ते मनापासून बोलत आहेत.
पुलवामा घटनेनंतर इमरान यांनी दहशतवादावरसुद्धा चर्चा व्हायला हवी, ही भारताची अटही मान्य केली.
पश्चिम सीमेवरील कट्टरतावाद्यांसोबत पाकिस्तानचा संघर्ष सुरूच आहे. कदाचित त्यामुळेच युद्ध नको. चर्चेतूनच तोडगा काढला जावा, अशी काहीशी पाकिस्तानी लष्कराचीही भावना आहे.
इमरान खान यांचा सकारात्मक विचार
इमरान पाकिस्तानला ज्या मार्गावरून नेऊ इच्छितात, तो योग्य आहे. अफगाणिस्तानसोबतचा संघर्ष संपविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अफगाणिस्तानमधील तणाव निवळून परिस्थिती सामान्य रहावी, हाच त्यांचा उद्देश आहे. अफगाणिस्तानमधली 'न संपणारी' लढाई संपविण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचीही इच्छा आहे.
कर्तारपूर कॉरिडॉर शीख धर्मियांसाठी खुला करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शीख भाविकांना व्हिसाशिवाय इथं येऊन दर्शन घेता यावं, यासाठी केलेला हा चांगला प्रयत्न होता.
इम्रान पाकिस्तानचे पंतप्रधान होऊन पाचच महिने झाले आहेत. या काळात त्यांनी पाकिस्तानची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी प्रयत्न केले. पुढील दोन-तीन वर्षांत पाकिस्तानचा विकास दर सुधारला तर इम्रान यांच्या कामाची पावतीच मिळेल.
सध्या तरी आपण त्यांनी उचललेली पावलं सकारात्मक आहेत, हे निश्चितपणे म्हणू शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)